
Byju’s Alpha: अमेरिकन कंपनीने दिलेले 9,800 कोटी कर्ज वसुल करण्यासाठी Byju’s ला खेचले कोर्टात
Byju’s Alpha: देशातील सर्वात मोठ्या एडटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या बायजूच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कर्जदार आणि बायजू यांच्यात अनेक महिन्यांच्या चर्चेनंतरही, सुमारे 9,800 कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रश्न सुटलेला नाही. याप्रकरणी बायजू यांच्यावर आता खटला सुरू आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ग्लास ट्रस्ट कंपनी आणि गुंतवणूकदार टिमोथी आर. पोहल यांनी बायजू अल्फा, टँजिबल प्ले आणि रिजू रवींद्रन यांच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे.
ज्या दोन कंपन्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे त्या थिंक अँड लर्न प्रायव्हेटच्या युनिट्स आहेत, बायजू रवींद्रन हे थिंक अँड लर्नचे संचालक आहेत.
बायजूवर काय आरोप आहेत?
बायजूवर 500 दशलक्ष डॉलर लपवल्याचा आरोप आहे. गुरुवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत ही माहिती समोर आली आहे. कंपनीवर नियंत्रण कोणाचे असावे, यावरूनही हे प्रकरण आहे.
कर्जदारांचा दावा आहे की या वर्षाच्या सुरुवातीला डिफॉल्टमुळे, त्यांच्याकडे त्यांचे प्रतिनिधी, टिमोथी आर. पोहल यांना प्रभारी ठेवण्याचा अधिकार आहे.
अमेरिकेची कॉर्पोरेट राजधानी विल्मिंग्टन येथील न्यायालयात या महिन्याच्या सुरुवातीला हा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे सुनावणी निश्चित केली आणि खटला जलदगतीने चालवावा का असे विचारले.
डेलावेअर चॅन्सरी कोर्टाचे न्यायाधीश मॉर्गन झर्न यांनी रवींद्रन बायजू यांचे गुरुवारी होणारी सुनावणी जनतेसाठी बंद करण्याचे आवाहन नाकारले.
अलिकडेच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) अंतर्गत रवींद्रन बायजू आणि त्यांची कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणात बेंगळुरूमधील 2 कार्यालये आणि घरात झडती आणि जप्तीची कारवाई केली होती.
कारवाईत असे दिसून आले की कंपनीला 2011-2023 दरम्यान 28,000 कोटी (अंदाजे) थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. पुढे, कंपनीने याच कालावधीत परदेशातील थेट गुंतवणुकीच्या नावाने परदेशीत अंदाजे 9,754 कोटी पाठवले होते.