ट्रस्ट व सेवाभावी संस्थाच्या प्राप्तिकर अर्जाचे नवे निकष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Criteria for Income Tax Application of Trusts and Charitable Institutions

ट्रस्ट व सेवाभावी संस्थाच्या प्राप्तिकर अर्जाचे नवे निकष

अर्थसंकल्पातील बदलांनंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ता.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिसूचना क्रमांक ७/२०२३ अंतर्गत प्राप्तिकर सुधारित ‘नियम १६ सीसी’ आणि ‘नियम १७ बी’ जारी केले आहेत. स्वयंसेवी संस्थांसह (एनजीओ) ट्रस्ट किंवा धर्मादाय संस्थांद्वारे ‘कलम १२ ए’ किंवा ‘कलम १०(२३ सीई)’ अंतर्गत सुधारित निकषांवरील आधारित अर्ज ‘१० बी’ किंवा ‘१० बीबी’ सादर करणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती एक एप्रिल २०२३ पासून अंमलात आली.

या दुरुस्तीने करांचा लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या फॉर्मची निवड ‘नोंदणीच्या कलमाऐवजी ’ ‘एकूण उत्पन्नाच्या’ निकषांतर्गत बदलण्यात आली आहे. दुरुस्तीपूर्वी, फॉर्म क्रमांक ‘१० बी’ कायद्याच्या ‘१२ ए’ अंतर्गत नोंदणीकृत ट्रस्ट किंवा संस्थेद्वारे दाखल करणे आवश्यक होते, तर ‘१० (२३ सी)’ अंतर्गत मान्यताप्राप्त संस्था किंवा निधी यांनी त्यांचे लेखापरीक्षण अहवाल ‘१० बीबी’ फॉर्ममध्ये सादर करणे आवश्यक होते.

दुरुस्तीनंतर, ट्रस्ट किंवा संस्था किंवा विश्‍वस्तनिधी किंवा हॉस्पिटल, किंवा विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास ‘कर लेखापरीक्षण अहवाल’ सादर करण्यासाठी फॉर्म ‘क्रमांक १० बी’ वापरणे आवश्यक आहे.

ट्रस्ट किंवा संस्थेने ‘एफसीआरए २०१०’ अंतर्गत परकी योगदानाची रक्कम प्राप्त केली असेल किंवा संस्थेच्या उत्पन्नाचा काही भाग भारताबाहेरील क्रियाकलापांसाठी खर्च केला असेल, तर अशा ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांचे उत्पन्न नाममात्र किंवा पाच कोटी रुपयांच्या आता असले, तरी फॉर्म क्रमांक ‘१० बी’ मध्ये ‘कर लेखापरीक्षण अहवाल’ सादर करणे बंधनकारक झाले आहे.

असे ट्रस्ट किंवा संस्था कायद्याच्या कलम ‘१० (२३ सी)’ अंतर्गत मान्यताप्राप्त आहे, की नाही वा ‘कलम १२ ए’ अंतर्गत नोंदणीकृत आहे किंवा नाही हे तपासण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न पाच कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यास ‘कर लेखापरीक्षण अहवाल’ सादर करण्यासाठी फॉर्म क्रमांक ‘१० बीबी’ वापरणे आवश्यक झाले आहे.

या संदर्भात, हे लक्षात घेण्याजोगे आहे, की परकी योगदानाची रक्कम जमा होणे किंवा भारताबाहेर संस्थेच्या उत्पन्नातील खर्च करणे यासाठी कोणतीही किमान मर्यादा रक्कम ठरविण्यात आलेली नाही.

एखाद्या ट्रस्टला किंवा संस्थेला परकी योगदान म्हणून एक रुपयादेखील मिळाला असेल किंवा भारताबाहेर त्याच्या उत्पन्नाची नाममात्र रक्कम खर्च केली असेल, तर त्याला फॉर्म क्रमांक ‘१० बी’ मध्येच ‘कर लेखापरीक्षण अहवाल’ द्यावा लागेल, तर लहान ट्रस्ट किंवा संस्थांना त्यांचा ‘कर लेखापरीक्षण अहवाल’ वरील निकष सोडून फॉर्म क्रमांक ‘१० बीबी’मध्ये सादर करणे आवश्यक आहे. हा फार महत्त्वाचा बदल झाला आहे.

नव्या अर्जातील ठळक मुद्दे

नवा फॉर्म क्रमांक ‘१० बी’ आणि फॉर्म क्रमांक ‘१० बीबी’ हे पूर्व-सुधारित फॉर्मच्या तुलनेत अधिक विस्तृत आहेत. साधा तीन ते चार पानांचा लेखापरीक्षण अहवाल आता १७ पानांमध्ये विस्तारित केला आहे. ट्रस्ट व धर्मादाय संस्थांशी संबंधित कायद्यातील गेल्या दोन ते तीन वर्षांतील बऱ्याच सुधारणांची माहिती जुन्या फॉर्ममध्ये समाविष्ट झाली नव्हती. अलीकडेच, ‘सीबीडीटी’द्वारे ट्रस्ट संदर्भातील जमाखर्चाची पुस्तके व इतर नोंदींच्या अनिवार्य देखभालीशी संबंधित नियम अधिसूचित केले गेले आहेत. नवे फॉर्म त्या हिशेब पुस्तकांचा संदर्भदेखील अधोरेखित करीत आहेत.

टॅग्स :income taxtax