
Nitin Garkari: भुशापासून बनवलेल्या इंधनावर चालणार विमाने-हेलिकॉप्टर; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
Nitin Garkari: देशातील इंधन आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी, भुशापासून इंधन तयार केले जात आहे. येत्या काळात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आहेत. नितीन गडकरी म्हणाले की, काही वर्षात भुशापासून बनवलेले इंधन विमाने आणि हेलिकॉप्टरमध्ये वापरले जाईल.
दिल्लीत झालेल्या 63 व्या एसीएमए वार्षिक अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशात आता भुसा जाळला जात नाही. ते म्हणाले की पानिपतमध्ये इंडियन ऑइलचा प्लांट सुरू झाला आहे. येथे 1 लाख लिटर इथेनॉल बनवले जात आहे. हवाई दलाचे 22 टक्के इथेनॉल लढाऊ विमानांमध्ये टाकले जाते.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, आगामी काळात विमान इंधनात 8 टक्के बायो एव्हिएशन इंधन जोडण्याची सरकारचा प्लॅन आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या 3 ते 4 वर्षांत व्यावसायिक विमाने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालतील.
नितीन गडकरी म्हणाले की, सध्या देशाची आयात 16 लाख कोटी रुपयांची असून येत्या पाच वर्षांत 25 लाख कोटी रुपयांची होईल, वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. ते मंत्री होण्यापूर्वी साडेचार लाख कोटींचा वाहन उद्योग होता आणि आज तो 12.5 लाख कोटींचा उद्योग झाला आहे.
ते म्हणाले की, भारत स्वावलंबी होत आहे, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपण एकेकाळी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर होतो आणि आता जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत.
विशेष म्हणजे डिझेलची गरज कमी करण्यासाठी आणि देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी भुशापासून जैवइंधन तयार करण्यासाठी एक हजार प्लांट्स उभारण्याची योजना असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
यातून पाच लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. वाहनांसाठी लागणारा इंधनाचा खर्च आणि तुटवडा दूर होईल. ट्रॅक्टरपासून विमानांपर्यंत सर्वच वाहनांमध्ये जैव इंधनाचा वापर केला जाईल.