थीमॅटिक फंड विशेष स्थितीतील संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Opportunities in thematic fund special finance investment money

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’च्या म्युच्युअल फंडांच्या वर्गीकरणानुसार, थीमॅटिक फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडांचा एक वर्ग आहे

थीमॅटिक फंड विशेष स्थितीतील संधी

- समीर सुमंत

मार्च २०२० मध्ये कोविड-१९ महासाथीच्या उद्रेकाने भांडवली बाजार जोरात कोसळला आणि त्यावेळी व त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना सातत्याने नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

रशिया-युक्रेन संघर्षानंतर, भांडवली बाजारात पडझड घडवून आणणारे नवीनतम कारण सध्या अमेरिकी आणि युरोपीय बँकबुडीच्या रूपात पुढे आले आहे. काही महिन्यांपूर्वी सेमीकंडक्टर पुरवठ्यातील टंचाईमुळे वाहन उद्योग तणावाखाली होता.

त्यानंतर उद्योग, क्षेत्रवार विशिष्ट समस्यांमुळे माहिती-तंत्रज्ञान आणि औषध निर्माण क्षेत्रालाही भोवळ आल्याचे दिसले. बदलत्या परिस्थितीचा विशिष्ट क्षेत्रांवर कसा तीव्र सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो याची ही सर्व काही उदाहरणे आहेत. तथापि, या स्थितीचा फायदा घेणेदेखील तितकेच अर्थपूर्ण आहे.

उदाहरणार्थ, जेव्हा एखादे विशिष्ट क्षेत्र, जे सहसा चक्रीय आवर्तनात असते आणि तणावाखाली असते तेव्हाच त्यात गुंतवणूक करणे हेच शहाणपणाचे ठरते. तथापि, प्रत्यक्षात ही गोष्ट इतकी सोपी नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला त्याच्या रोजच्या कामकाजाच्या घाईगडबडीत याचा अभ्यास करून निर्णय घेणे शक्य होतेच, असे नाही.

तरीही एखाद्याने स्वयंप्रेरणेने प्रयत्न केला तरी त्या घटनेचा प्रभाव कमी झालेला असू शकतो आणि कदाचित संधीही हुकलेली असते. अशा स्थितीत गुंतवणूकदारांसाठी विशेष परिस्थितींवर आधारित थीमॅटिक फंड योजना उपयुक्त ठरते.

थीमॅटिक फंड योजना

नावानुसार ही फंड योजना विशिष्ट परिस्थितीत (स्पेशल सिच्युएशन) गुंतवणूक करण्याची संधी देते. भू-राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी, कॉर्पोरेट पुनर्रचना, सरकारी धोरण किंवा नियामक बदल, विशिष्ट कंपन्या किंवा क्षेत्रांना तोंड देऊ शकणारी तात्पुरती आव्हाने यासारख्या घटनांच्या संदर्भाने हा शब्दप्रयोग या फंड योजनांसाठी वापरण्यात आला आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’च्या म्युच्युअल फंडांच्या वर्गीकरणानुसार, थीमॅटिक फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडांचा एक वर्ग आहे, ज्यामध्ये फंडाच्या एकूण मालमत्तेपैकी किमान ८० टक्के गुंतवणूक ही एखाद्या विशिष्ट विषयानुरूप किंवा विशिष्ट क्षेत्रात केली जाते. याच वर्गातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाची इंडियन ॲपॉर्च्युनिटीज फंड योजना गुंतवणूकदारांना अशा विशिष्ट घडामोडींचा लाभ घेण्याची संधी देते.

आयसीआयसीआय ॲपॉर्च्युनिटीज फंड

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया ॲपॉर्च्युनिटीज फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’ (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा सर्वोत्तम मार्ग आहे. वेळोवेळी विशिष्ट परिस्थिती उद्भवत राहतात. त्या त्या वेळेचा फायदा घेण्यासाठी फंड व्यवस्थापक विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची संधी शोधतात.

त्यामुळे गुंतवणूकदारांना जलद आणि चांगला फायदा मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा फंडामध्ये किमान तीन वर्षे गुंतवणूक ठेवावी आणि कालावधीत होणाऱ्या चढउतारांचा फायदा मिळवावा.

टॅग्स :FinanceInvestment