अर्थबोध : ‘पीएमएस’ आणि ‘एआयएफ’चा मार्ग

पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (पीएमएस) आणि पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) यासारखे सुरचित पर्याय गुंतवणूकदारांना त्यांचे आर्थिक नियोजन.
portfolio management services
portfolio management servicessakal

- राजीव लोकापूर

पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (पीएमएस) आणि पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) यासारखे सुरचित पर्याय गुंतवणूकदारांना त्यांचे आर्थिक नियोजन प्रभावी आणि सुलभ करण्यास उपयुक्त ठरतात. ‘एआयएफ’ हे असे विशेष आर्थिक साधन आहे.

जे शेअर, रोखे आणि अन्य पारंपरिक पर्यायांच्या व्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतात, तर ‘पीएमएस’मध्ये गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे व्यावसायिक व्यवस्थापन, तृतीय पक्ष संस्थेद्वारे केले जाते. या दोन्ही साधनांमुळे गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ वाढवणे आणि अधिकाधिक परतावा मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकतात.

‘एआयएफ’ची वैशिष्टये

पर्यायी गुंतवणूक निधी अर्थात ‘एआयएफ’द्वारे, खासगी भागभांडवली गुंतवणूक; तसेच हेज फंड, डेरिव्हेटिव्ह, स्थावर मालमत्ता आणि कमोडिटी यासारख्या तुलनेने कमी वापरल्या जाणाऱ्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करू शकता. तर, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (पीएमएस)पर्यायाची निवड करून, तुम्हाला तुमच्याकडे असणारी तरलता आणि जोखीम सहन करण्याची क्षमता याच्या मूल्यांकनाद्वारे शेअर, रोखे संलग्न गुंतवणूक साधने आणि अन्य उत्पादनांमध्ये गुंतवणूक करता येईल.

‘पीएमएस’ व ‘एआयएफ’ची वाढ

बाजार नियामक ‘सेबी’च्या मते, २०२२ मध्ये देशातील ‘पीएमएस’ व्यवसायाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये (एयूएम) वार्षिक १४ टक्के दराने वाढ साधली आहे. डिसेंबर २०२२ अखेरीस देशातील ‘पीएमएस’ गंगाजळी (एयूएम) २२.४ लाख कोटी रुपये होती, तर ‘एआयएफ’ उद्योगाने गेल्या दशकात अंदाजे १०५ टक्क्यांचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर नोंदविला आहे आणि २०२१-२२ आर्थिक वर्षात त्यांची एकत्रित गंगाजळी (एयूएम) ६.४१ लाख कोटी रुपये होती.

निवड कधी करावी?

सोने, स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवी यासारखे पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग तुम्ही आधीच वापरून पाहिले आहेत का? तुम्‍ही तुमच्‍या आवश्‍यकतेनुसार निवडलेले गुंतवणूक पर्याय वापरण्‍यास उत्सुक आहात का?

बाजारातील सामान्य परताव्यापेक्षा अधिक परतावे मिळवण्यास आणि तुमची संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास सक्षम असलेल्या अनुभवी संपत्ती व्यवस्थापकांच्या कौशल्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शुल्क रूपात अधिक पैसे देण्यास तयार आहात का? यापैकी एक किंवा अधिक प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल, तर तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये ‘पीएमएस’ आणि ‘एआयपी’ या दोन्हींचा मेळ साधण्याची वेळ आली आहे, असे समजून चला.

तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ वाढवण्याची आणि जास्त परतावा मिळवण्याची इच्छा असेल, तर तुम्ही ‘पीएमएस’ आणि ‘एआयएफ’ या पर्यायांकडे वळले पाहिजे. मध्यम ते दीर्घकालीन कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची तयारी असेल, तर हा पर्याय तुम्ही जरूर निवडा.

एक उच्च संपत्ती गुंतवणूकदार (एचएनआय) म्हणून, तुम्हाला तुमची संपत्ती वाढविण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओच्या सुमारे १५ ते २० टक्के हिश्‍शासाठी अशा अत्याधुनिक मार्गांना स्थान देणे, ही सर्वोत्तम पायरी आहे.

सुवर्णसंधी

  • इश्‍यू सुरू होण्याची तारीख - ११ सप्टेंबर २०२३

  • इश्‍यू बंद होण्याची तारीख - १५ सप्टेंबर २०२३

  • किमान गुंतवणूक - एक ग्रॅम

  • कमाल गुंतवणूक - चार किलो

  • प्रति ग्रॅम किंमत - ५९२३ रुपये.

  • डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी किंमत - ५८७३ रुपये.

  • सुवर्ण रोख्यांचा कालावधी - आठ वर्षे

  • व्याज - वार्षिक २.५० टक्के (सहामाही देय)

(लेखक आरएल वेल्थ लि.चे संस्थापक आहेत.)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com