Repo Rate : SBI च्या मुख्य आर्थिक सल्लागारांचा RBI ला सल्ला; म्हणाले, फेडरल रिझर्व्हची किती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

Repo Rate : SBI च्या मुख्य आर्थिक सल्लागारांचा RBI ला सल्ला; म्हणाले, फेडरल रिझर्व्हची किती...

Repo Rate : सतत वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपो दरात अनेक वेळा वाढ केली होती. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी पुन्हा RBI ला व्याजदर वाढवण्याची सूचना केली आहे.

ते म्हणाले की, प्रत्येक वेळी व्याजदर वाढवण्यासाठी आम्ही यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेची नक्कल करणे थांबवले पाहिजे.

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या पावलावर पाऊल ठेवत आरबीआयने रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. यावर घोष म्हणाले की, व्याजदराच्या बाबतीत आता आरबीआयने थांबून विचार करणे आवश्यक आहे. (RBI Should Pause, Think About Decoupling from US Fed says SBI's Soumya Kanti Ghosh)

आरबीआयने वेगळा विचार करण्याची गरज :

सौम्या कांती घोष म्हणाले की, अल्पावधीत फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरातील वाढ थांबण्याचे नावं घेत नाही. अशा परिस्थितीत आरबीआयने वेगळा विचार करण्याची गरज आहे.

व्याजदर वाढीच्या बाबतीत, यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझव्‍‌र्हने उचललेली पावले किती काळ चालू ठेवता येतील याचा RBI ने गांभीर्याने विचार केला पाहिजे. इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका सत्रात ते बोलत होते.

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचा शेवट कधीही होणार नाही :

घोष पुढे म्हणाले की, “आम्ही यूएस फेडरल रिझर्व्हचे नेमके पालन करू शकतो का? आपल्याला विचार करावा लागेल की पूर्वीच्या दर वाढीचा (RBI द्वारे) परिणाम सिस्टममध्ये कमी झाला आहे की नाही. फेडरल रिझर्व्हचे चक्र लवकर संपेल असे मला दिसत नाही.

देशातील महागाई जानेवारी 2023 मध्ये 6.52% पर्यंत वाढली, जी RBI च्या 6% च्या पातळीपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 2022 च्या 12 महिन्यांपैकी 10 महिन्यांत महागाई 6% पेक्षा जास्त होती.