Tata Bisleri Deal : टाटांनी बिस्लेरीला केला 'टाटा', जाणून घ्या कशामुळे रद्द झाला करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata-Bisleri Deal

Tata Bisleri Deal : टाटांनी बिस्लेरीला केला 'टाटा', जाणून घ्या कशामुळे रद्द झाला करार

Tata-Bisleri Talks End : टाटा समूहाने देशातील आघाडीची वॉटर कंपनी बिस्लेरी विकत घेण्याची योजना रद्द केली आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने सांगितले की त्यांनी बिस्लेरीच्या संभाव्य अधिग्रहणासाठीची चर्चा रद्द केली आहे.

हा करार झाला असता तर टाटा समूह एका झटक्यात पॅकेज्ड वॉटर क्षेत्रात आघाडीवर आला असता. बिस्लेरी इंटरनॅशनल आणि टाटा समूह यांच्यात चर्चा सुरू आहे आणि हा करार 6,000 ते 7,000 कोटी रुपयांचा असू शकतो, असे यापूर्वी सांगण्यात आले होते.

परंतु नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की मूल्यांकनामुळे दोन्ही बाजूंमधील चर्चा रखडली आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की बिस्लेरीचे मालक या करारासाठी एक अब्ज डॉलर्सची मागणी करत होते.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली की त्यांनी संभाव्य व्यवहारासाठी बिस्लेरीशी बोलणी रद्द केली आहे. कंपनीने या संदर्भात कोणताही करार किंवा बंधनकारक वचनबद्धता केली नाही. (Tata-Bisleri deal is off; Tata Consumer says no potential transaction with Bisleri, talks ceased)

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्समध्ये हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर आणि टाटा वॉटर प्लस ब्रँड आहेत. बिस्लेरी विकत घेतल्याने टाटा समूहाचा पॅकेज्ड वॉटर ब्रँडचा पोर्टफोलिओ मजबूत झाला असता.

कंपनी FMCG मध्ये व्यवसाय झपाट्याने वाढवत आहे आणि तिला या क्षेत्रातील पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवायचे आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजही एफएमसीजी क्षेत्रातील आपला व्यवसाय आक्रमकपणे वाढवत आहे.

काय म्हणाले रमेश चौहान :

बिस्लेरी विकत घेतल्याने टाटा हे पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या क्षेत्रात आघाडीवर बनले असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डेनॉन यांनीही यात रस दाखवला आहे. टाटा यांच्याशी बिस्लेरीची दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती.

नोव्हेंबरमध्ये बिस्लेरीचे चेअरमन रमेश चौहान यांनी सांगितले होते की त्यांनी आपली कंपनी टाटाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसोझा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

चौहान यांनी कंपनीचे दैनंदिन काम व्यावसायिक संघाकडे सोपवले आहे. अँजेलो जॉर्ज हे कंपनीचे सीईओ आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीची उलाढाल 2,500 कोटी रुपये अपेक्षित आहे आणि नफा 220 कोटी होईल.

बिस्लेरीची स्थापना इटालियन ब्रँड म्हणून झाली. कंपनीने 1965 मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला. चौहान यांनी 1969 मध्ये विकत घेतला. कंपनीचे 122 ऑपरेशनल प्लांट आहेत.

भारत आणि शेजारील देशांमध्ये 4,500 वितरक आणि सुमारे 5,000 ट्रक आहेत. चौहान यांनी 1993 मध्ये त्यांचे सॉफ्ट ड्रिंक ब्रँड थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का कोका-कोलाला विकले.