नवे प्राप्तिकर विवरणपत्र अधिसूचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tax policy New income tax return notified cbdt tax department

नव्या प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये नेमके काय काय बदल करण्यात आले आहेत, हे जाणून घेणे करदात्यांसाठी अत्यंत गरजेचे असते.

नवे प्राप्तिकर विवरणपत्र अधिसूचित

- अनिरुद्ध राठी

का ही दिवसांपूर्वीच म्हणजेच १० फेब्रुवारी २०२३ रोजी ‘सीबीडीटी’ अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना क्रमांक ४ / २०२३ अन्वये आर्थिक वर्ष २०२२-२३ म्हणजेच आकारणी वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्राची घोषणा केली आहे.

यापूर्वी प्राप्तिकर विभागाकडून त्या त्या वर्षासाठीचे प्राप्तिकर विवरणपत्र मार्च महिन्याच्या शेवटी किंवा अगदी एप्रिल महिन्यामध्ये घोषित होत असे. यंदा बऱ्याच लवकर ते जारी केल्यामुळे आता भागधारकांना, करदात्यांना पुरेसा वेळ मिळेल आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर लवकरच त्याचे ई-फायलिंग सुरू होईल.

नव्या विवरणपत्रामध्ये बदल आहेत का?

नव्या प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये नेमके काय काय बदल करण्यात आले आहेत, हे जाणून घेणे करदात्यांसाठी अत्यंत गरजेचे असते. यंदाच्या प्राप्तिकर विवरणपत्रमध्ये खूप मोठे बदल नसले, तरी काही महत्त्वाचे बदल जाणून घेणे आवश्‍यक आहेत.

आयटीआर फॉर्म एक (सहज)

पगारदार व्यक्ती किंवा एक घर अशा मालमत्तेपासून असणारे उत्पन्न किंवा इतर स्रोत जसे, व्याज आदी यातून पन्नास लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी लागू असलेल्या आयटीआर फॉर्म एक (सहज) मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भांडवली नफा शीर्षकांतर्गत पर्याय समाविष्ट

या नव्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये एक सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा बदल केला गेला आहे, तो म्हणजे आभासी (व्हर्च्युअल) डिजिटल मालमत्तेतून (व्हीडिए) जसे क्रिप्टोकरन्सी आदी उत्पन्नाचा अहवाल देण्यासाठी आणि तपशीलवार माहिती देण्यासाठी ‘कॅपिटल गेन’ अर्थात भांडवली नफा या शीर्षकांतर्गत एक नवा स्वतंत्र तक्ता समाविष्ट केला गेला आहे.

यामध्ये करदात्यांनी संपादनाची तारीख, हस्तांतराची तारीख, संपादनाची किंमत आणि आभासी डिजिटल मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा तपशील देणे आवश्यक आहे. काही क्रिप्टोकरन्सी किंवा एखादी आभासी मालमत्ता तुम्हाला बक्षीस म्हणून भेट मिळाली असल्यास तुम्हाला मालमत्तेच्या हस्तांतरासाठी किती रकमेवर कर भरण्यात आला आहे, त्याचा तपशील द्यावा लागेल.

नव्या करप्रणालीच्या निवडीसाठी प्रश्‍न

आता नव्या करप्रणालीच्या निवडीसंबंधी अतिरिक्त प्रश्नांचा समावेश या प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये दिसून येतो. त्यामध्ये करदात्याने मागील आकारणी वर्षात नव्या करप्रणालीची निवड केली आहे का, असल्यास नेमके वर्ष, तसेच मागील कोणत्याही वर्षांमध्ये नव्या करप्रणालीची निवड रद्द केली गेली आहे का आणि एवढेच नव्हे, तर करदात्यांनी दोन्ही निवडीसाठी फॉर्म ‘१० आयई’ चा तपशीलसुद्धा नमूद करणे अपेक्षित आहे.

‘इंट्राडे ट्रेडिंग’ उत्पन्न दर्शविण्यासाठी वेगळा पर्याय

आणखी एक महत्त्वाचा असा बदल ज्याची करदात्यांना खूप वर्षांपासून प्रतीक्षा होती, तो म्हणजे ‘इंट्राडे ट्रेडिंग’चे उत्पन्न आणि उलाढाल नमूद करण्यासाठी वेगळ्या पर्यायाची सुविधा. आता नव्या विवरणपत्रात ‘इंट्राडे ट्रेडिंग’मधील उलाढाल आणि उत्पन्न स्वतंत्रपणे ‘ट्रेडिंग अकाउंट’ अंतर्गत नमूद करणे आवश्यक आहे.

तसेच करदात्यांना ते परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) किंवा परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) आहेत का, हेदेखील नमूद करावे लागेल. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ‘सेबी’ नोंदणी क्रमांकसुद्धा नमूद करावा लागेल. प्राप्तिकर कलम २ (२२) अंतर्गत करपात्र असलेले लाभांश उत्पन्न असल्यास नव्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये ते स्वतंत्रपणे नोंदवावे लागणार आहे.

सेवानिवृत्ती लाभ उत्पन्न खुलासा

‘सेवानिवृत्ती लाभ उत्पन्न’ या मथळ्याखाली करदात्याने मागील कोणत्याही वर्षात ‘कलम ८९ई’ अंतर्गत रिबेट घेतला असेल, तर त्या त्या वर्षाच्या करपात्र उत्पन्नाबद्दल खुलासा करणे आता गरजेचे आहे.

आगाऊ रकमेची नोंद

‘बॅलन्स शीट’ अर्थात ताळेबंद नोंदवताना प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ४० ए (२) (बी)’ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या आगाऊ रकमेची नोंद ‘ॲडव्हान्स’ या शीर्षकाखाली देणे आवश्यक आहे.

‘डीआरएन’ नोंदणे आवश्‍यक

कलम ८० जी’ अंतर्गत चॅरिटेबल ट्रस्टला देणगी दिली असल्यास देणगी रेफरन्स नंबर (DRN) नमूद करावा लागेल.

विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३

यावर्षी प्राप्तिकर विवरणपत्रे एवढ्या लवकर जाहीर करून सरकारने करदात्यांना करअनुपालन करणे सुलभ केले आहे. त्या दिशेने हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे. प्राप्तिकर कायद्याअंतर्गत लेखापरीक्षणाची (ऑडिट) आवश्यकता नसणाऱ्या करदात्यांसाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ म्हणजेच आकारणी वर्ष २३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुदतवाढ होईल, या आशेवर न बसता मुदतीपूर्वीच आपले प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे सोयीस्कर आणि हितावह आहे.