Nitin Gadkari: डिझेल कार घेणे होणार महाग, 10 टक्के जीएसटी लावण्याचा नितीन गडकरींचा प्रस्ताव|Transport Minister Nitin Gadkari proposes 10 percent additional GST on diesel vehicles as pollution tax | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari: डिझेल कार घेणे होणार महाग, 10 टक्के जीएसटी लावण्याचा नितीन गडकरींचा प्रस्ताव

Nitin Gadkari: रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, डिझेल इंजिन वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्याची योजना आहे. नितीन गडकरी म्हणाले की, हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे पाठवणार आहोत.

63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या अधिवेशनात नितीन गडकरींनी ही माहिती दिली. गडकरींनी नमूद केले की त्यांनी मसुदा तयार केला आहे आणि जीएसटी वाढीची विनंती करण्यासाठी मंगळवारी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेण्याचा त्यांचा मानस आहे.

गडकरी म्हणाले की, देशातील डिझेल वाहनांचा वापर कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. गडकरींच्या विधानानंतर, दुपारी 12:00 वाजेपर्यंत, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 2.38%, टाटा मोटर्सचे शेअर्स 2% आणि मारुती सुझुकीचे शेअर्स 0.8% ने घसरत होते.

डिझेल वाहने कमी करण्याबद्दल गडकरींनी यापूर्वीही आपले मत स्पष्ट मांडले होते. 2021 मध्ये, गडकरींनी वाहन उत्पादकांना डिझेल-इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी करण्याचे आवाहन केले होते.

मे महिन्याच्या सुरुवातीला, ऊर्जा परिवर्तन सल्लागार समितीने सुचवले होते की भारताने 2027 पर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर बंदी घालावी.

माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्या नेतृत्त्वाखाली ऊर्जा परिवर्तन सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यात सरकारी तेल कंपन्यांचे अधिकारी आणि तेल मंत्रालयातील एक अधिकारी यांचा समावेश समितीत आहे.