Gautam Adani News : हिंडेनबर्गचा आणखी एक गौप्यस्फोट; हिटलिस्टवर आता अदानींचा भाऊ, ट्विट करत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Gautam Adani News : हिंडेनबर्गचा आणखी एक गौप्यस्फोट; हिटलिस्टवर आता अदानींचा भाऊ, ट्विट करत...

Gautam Adani News : एका अहवालामुळे अदानी समूहाला 130 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही 71 अब्ज डॉलरची घट झाली आहे. मात्र असे असतानाही अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

हिंडेनबर्ग संशोधनानंतर आता अदानी समूहावर नवे आरोप करण्यात आले आहेत. गौतम अदानी यांचे मोठे भाऊ विनोद अदानी यांच्यावर हे आरोप लावण्यात आले आहेत.

फोर्ब्सच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, कर्जासाठी समूहातील प्रमोटरची हिस्सेदारी बँकेकडे गहाण ठेवण्यात आली आहे. 240 दशलक्ष डॉलर्सचे भागभांडवल रशियन बँकेत तारण ठेवले आहे.

विशेष म्हणजे फोर्ब्सचा हा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने ट्विट केला आहे. विनोद अदानी परदेशात राहतात. हिंडेनबर्ग संशोधन अहवालात गौतम अदानी यांचे नाव 54 वेळा आले आहे, तर विनोद अदानी यांचे नाव 151 वेळा आले आहे. अदानी समूहाचे म्हणणे आहे की, विनोद अदानी हे कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत व्यवस्थापकीय पदावर नाहीत.

फोर्ब्सच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, विनोद अदानी यांची सिंगापूर कंपनी पिनॅकल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट (Pinnacle Trade and Investment Pte.) वर अप्रत्यक्ष नियंत्रण आहे.

2020 मध्ये, या कंपनीने रशियाच्या VTB बँकेसोबत कर्ज करार केला होता. एप्रिल 2021 पर्यंत कंपनीने 263 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले होते. कंपनीने अज्ञात पक्षाला 258 दशलक्ष डॉलर कर्ज दिले होते.

Pinnacle ने कर्जासाठी गॅरेंटर म्हणून Afro Asia Trade & Investment Limited आणि Worldwide Emerging Markets Holdings Limited हे दोन गुंतवणूक कंपन्यांना जामीन ठेवले आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांचा अदानी समूहात मोठा हिस्सा आहे. अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये त्यांची सुमारे चार अब्ज डॉलर्सची हिस्सेदारी आहे. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, कोणत्याही फंडाने तारण ठेवलेल्या शेअर्सचा खुलासा केलेला नाही. ट्विटरवर फोर्ब्सचा अहवाल शेअर करताना, हिंडेनबर्गने लिहिले की, ''या कर्जाची भारतीय एक्सचेंजला तारण ठेवलेल्या शेअर्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.''

विनोद शांतीलाल अदानी हे सर्वात श्रीमंत NRI आहेत. IIFL Wealth Hurun India Rich List 2022 नुसार, ते भारतातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये त्यांनी दररोज 102 कोटी रुपये कमावले.

दुबईत राहणारे विनोद अदानी सिंगापूर आणि जकार्ता येथे व्यापार व्यवसाय सांभाळतात. 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 28 टक्क्यांनी वाढली, म्हणजे 37,400 कोटी रुपये.

विनोदभाई या नावाने प्रसिद्ध असलेले विनोद अदानी यांनी 1976 मध्ये महाराष्ट्रातील भिवंडी येथे व्हीआर टेक्सटाइल या नावाने पॉवर लूम्सची स्थापना केली. त्यानंतर सिंगापूरमध्ये कार्यालय उघडून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाचा विस्तार केला.

विनोद अदानी आधी सिंगापूरला गेले आणि नंतर 1994 मध्ये दुबईत स्थायिक झाले. दुबईमध्ये त्यांनी साखर, तेल, अॅल्युमिनियम, तांबे आणि लोखंडाचा व्यापार सुरू केला.