Adani Group Stocks: अदानी शेअर्समुळे 'हा' गुंतवणूकदार झाला मालामाल, 100 दिवसांत कमावले 7,683 कोटी|Rajiv Jain earned 7683 crores in 100 days by investing money in Adani Group shares | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group Stocks

Adani Group Stocks: अदानी शेअर्समुळे 'हा' गुंतवणूकदार झाला मालामाल, 100 दिवसांत कमावले 7,683 कोटी

Adani Group Stocks: हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, त्यावेळी GQG Partners या गुंतवणूक कंपनीने समूहाच्या चार शेअर्समध्ये सुमारे 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

त्यावेळी अनेक लोक GQG Partners सह-संस्थापक राजीव जैन यांच्या या निर्णयाला 'फेअर डील' मानत नव्हते. पण, राजीव जैन यांनी ज्या विश्वासाने अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती, त्या विश्वासाचे त्यांना भरपूर फळ मिळाले आहे.

या गुंतवणुकीतून केवळ गेल्या 100 दिवसांत त्यांना 7683 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. GQG च्या अदानी शेअर्समधील गुंतवणुकीचे मूल्य आता 23,129 कोटी रुपये झाले आहे.

CnbcTV18 हिंदी मधील वृत्तानुसार, राजीव जैन यांनी आता मॅक्स हेल्थकेअर या हॉस्पिटल चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी भागीदारी केली आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर या शेअर्सबाबत एक विशेष माहिती समोर आली.

GQG Partners ने मॅक्स हेल्थकेअरचे 75.5 लाख शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, GQG Partners Emerging Markets Equity Fund ने हे शेअर्स 549.70 रुपये प्रति शेअर या भावाने खरेदी केले आहेत. या डीलची एकूण किंमत 415 कोटी रुपये आहे.

अदानी शेअर्समधून 50 टक्के नफा:

अदानी समूहाच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदार धास्तावले असताना राजीव जैन यांनी समूहाच्या 4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते. 100 दिवसांत, राजीव जैन यांचे गुंतवणूक मूल्य 50% वाढले आहे.

राजीव जैन यांच्या GQG पार्टनर्सने मार्चमध्ये अदानी एंटरप्रायझेसमध्ये 5,460 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता या गुंतवणुकीचे मूल्य 9060 कोटी झाले आहे. अदानी ग्रीनमध्ये गुंतवलेल्या 2806 कोटी रुपयांचे बाजारमूल्य आता 5236 कोटी रुपये झाले आहे.

त्याचप्रमाणे अदानी पोर्टमध्ये 5,282 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, जी आता 6,486 कोटी रुपये आहे आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये 1,898 कोटी रुपयांची गुंतवणूक आता 2,384 कोटी रुपये झाली आहे.

कोण आहेत राजीव जैन?

राजीव जैन हे जवळपास सात वर्षे गुंतवणूक फर्म GQG पार्टनर्सचे सह-संस्थापक आहेत. या कंपनीचा शेअर बाजारात झपाट्याने विस्तार होत आहे.

राजीव जैन यांचा जन्म भारतात झाला. 1990 मध्ये मियामी विद्यापीठातून एमबीए करण्यासाठी ते अमेरिकेत गेले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव 1994 मध्ये अॅसेट मॅनेजमेंट कंपनी व्होंटोबेलमध्ये रुजू झाले. 2002 मध्ये स्विस फर्मने सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली. आज GQG अध्यक्ष आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.