
Share Market Closing : शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान
Share Market Closing 10th March 2023 : आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. गुंतवणूकदारांची विक्री दिसून आली. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्सला सर्वाधिक फटका बसला.
आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 671 अंकांनी घसरून 59,135 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 176 अंकांनी 17,412 अंकांवर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंग दरम्यान बँकिंग, आयटी, ऑटो, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स घसरले तर ऊर्जा, आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्रातील शेअर्स वधारले.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 35 शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 9 शेअर्स वाढले तर 21 शेअर्स घसरून बंद झाले.
जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आक्रमक भूमिका कायम ठेवणार असल्याच्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानानंतर ही घसरण झाली.

BSE India
जागतिक बाजारातून कमकुवत संकेत :
यूएस शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स 9 मार्च रोजी सुमारे 4 महिन्यांत प्रथमच त्याच्या 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली बंद झाला. वॉल स्ट्रीट इंडेक्सने आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात किमान 3 टक्के घसरण केली.
अमेरिकेकडून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे आशियाई बाजारही घसरणीसह उघडले. निक्केई 1.69 टक्के, कोस्पी 1.2 टक्के आणि हँग सेंग निर्देशांक 2.46 टक्क्यांनी घसरला.
विदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून सुमारे 2.52 बिलियन डॉलरची विक्री केली आहे. यापूर्वी 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे 17.21 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती.
निफ्टीमध्ये एफआयआयची शॉर्ट पोझिशन पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हा आकडा 47 टक्के होता, तो आता 60 टक्क्यांवर पोहोचला आहे.