
Share Market Closing : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद; जाणून घ्या कारण
Share Market Closing 17th March 2023 : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला.
आयटी-बँकिंग शेअर्समध्ये खरेदीमुळे सकाळपासून बाजारात जोरदार तेजी दिसून आली. यासाठी ग्लोबल सिग्नलही जबाबदार आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 410 अंकांच्या वाढीसह 58,000 च्या वर 58,066 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 131 अंकांच्या वाढीसह 17,118 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, मेटल्स, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर मीडिया, हेल्थकेअर, एफएमसीजी, ऑटो, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
बाजारातील आजच्या तेजीचे कारण :
जगभरातील शेअर बाजारात तेजी
डॉलर निर्देशांकात घसरण, रोखे उत्पन्नात वाढ
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत आहे
RIL, ITC, ICICI बँक सारख्या मोठ्या शेअर्समध्ये मोठी खरेदी
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 वाढले आणि 9 शेअर्स घसरले. त्यामुळे निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स तेजीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी 1.18 टक्क्यांनी आणि निफ्टी बँक निर्देशांक 1.19 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

BSE India
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 257.59 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर गुरुवारी ते 256.21 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.38 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.