
Share Market closing : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी; 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांची चांदी
Share Market closing : आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. अदानी समूह आणि सरकारी बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली.
एका क्षणी सेन्सेक्स 1000 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 882 अंकांच्या उसळीसह 59,797 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 266 अंकांच्या उसळीसह 17,589 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये आश्चर्यकारक वाढ दिसून आली. बँक निफ्टी 2.09 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. एफएमसीजी, एनर्जी, मेटल, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.
मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही खरेदी झाली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 40 वाढीसह तर 10 तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 वाढीसह आणि 4 तोट्यासह बंद झाले.
'या' शेअर्समध्ये तेजी :
आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस 17 टक्के, अदानी पोर्ट्स 10 टक्के, एसबीआय 5.14 टक्के, भारती एअरटेल 3.28 टक्के आणि रिलायन्स 2.55 टक्क्यांनी वाढले. टेक महिंद्रा 2.22 टक्क्यांनी, अल्ट्राटेक सिमेंट 1 टक्क्यांनी, सिप्ला 0.88 टक्क्यांनी घसरले.

BSE India
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ :
भारतीय शेअर्समधील नेत्रदीपक तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीने झेप घेतली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 263.34 लाख कोटी रुपये झाले,
तर गुरुवारी मार्केट कॅप 259.98 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.36 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.