
Share Market Opening : सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण; 'या' शेअर्समध्ये मोठी घट
Share Market Opening 16 March 2023 : जागतिक बाजारातील नकारात्मक कलांमुळे देशांतर्गत बाजार गुरुवारी सलग सहाव्या दिवशी घसरणीच्या मार्गावर आहे.
व्यवसाय सुरू होताच बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल चिन्हावर गेले. काही मिनिटांच्या व्यवहारानंतर दोन्ही निर्देशांकांचे नुकसान आणखी वाढले.
सेन्सेक्स 57500 च्या खाली आणि निफ्टी 17000 च्या खाल घसरला आहे. बाजारातील तीव्र घसरणीचे कारण म्हणजे कमकुवत जागतिक संकेत. कारण क्रेडिट सुईसच्या विक्रमी घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
बाजारातील विक्रीत धातूच्या शेअर्सला सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय आयटी आणि बँकिंग शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे.
डॉलर निर्देशांकात वाढ
डॉलर निर्देशांक 104.5 च्या वर गेला आहे. दुसरीकडे, सोन्या-चांदीचे भाव सध्या स्थिर आहेत, त्यात काल जोरदार तेजी दिसून आली.
विक्रीचे बाजारावर वर्चस्व :
भारतीय शेअर बाजार बुधवारी सलग पाचव्या दिवशी लाल चिन्हावर बंद झाल. सेन्सेक्स 344 अंकांनी घसरून 57,555 वर बंद झाला. निफ्टीही 71 अंकांनी घसरून 16,972 वर बंद झाला.

BSE India
9 मार्चपासून बाजारात सुरू असलेल्या विक्रीमुळे, गुंतवणूकदारांचे सुमारे 8.5 लाख कोटी रुपये नुकसान झाले. या विक्रीचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत सुरू असलेले चढ-उतार. तसेच, परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री होते.
परदेशी बाजारात घसरण :
परदेशी बाजारांवर नजर टाकली तर बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. अमेरिकन बँकिंग जगतात गेल्या आठवड्यात सुरू झालेले संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे.
आतापर्यंत दोन अमेरिकन बँका बंद झाल्या आहेत आणि आता आणखी एक मोठी जागतिक बँकिंग कंपनी क्रेडिट सुइस धोक्यात आली आहे. यामुळे बुधवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 0.87 टक्के आणि S&P 0.70 टक्क्यांनी घसरले.
आधार घेत आजच्या व्यवहारात आशियाई बाजारही तोट्यात आहेत. जपानचा निक्केई निर्देशांक 0.94 टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँगसेंग 1.26 टक्क्यांनी घसरला आहे.