
टायटन ही कंपनी देशातील सर्वांत मोठी ज्वेलरी रिटेलर आहे. टाटा समूहातील या कंपनीने घड्याळे, ज्वेलरी आणि आयवेअर श्रेणींमध्ये प्रसिद्ध ब्रँड्च्याआधारे आघाडी घेतली आहे.
टायटन (शुक्रवारचा बंद भाव : रु. २,७३२)
टायटन ही कंपनी देशातील सर्वांत मोठी ज्वेलरी रिटेलर आहे. टाटा समूहातील या कंपनीने घड्याळे, ज्वेलरी आणि आयवेअर श्रेणींमध्ये प्रसिद्ध ब्रँड्च्याआधारे आघाडी घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार कंपनीने रु.७३६ कोटी नफा कमविला आहे, तर वर्षभरात कंपनीने निव्वळ नफ्यात साधारण ४८ टक्के वाढ नोंदवत रु.३,२७४ कोटी नफा कमविला आहे.
कंपनी भागधारकांना प्रति शेअर दहा रुपयांचा लाभांश देईल. ज्वेलरी व्यवसायाचा विचार करता वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये लक्षणीय तफावत असल्याने स्पर्धात्मक राहण्यावर लक्ष केंद्रित करत कंपनीने देशभरात एकसमान सोने दर न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या तिमाहीत कंपनीने ११ नवीन स्टोअर उघडले आहेत.
लग्नाच्या दागिन्यांचे कंपनीच्या महसुलामध्ये साधारण १९ टक्के योगदान असून, ही श्रेणी वेगाने वाढू शकेल, असा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. उदयोन्मुख व्यवसायांमध्ये, कंपनीने ‘आयआरटीएच’ आणि ‘फास्टट्रॅक’ ब्रँड अंतर्गत बॅग दाखल केल्या असून, मोठ्या फॉरमॅट स्टोअरमध्ये; तसेच शॉपर्स स्टॉप, नायका,अजिओ, मिंत्रा याठिकाणीही या उत्पादनांची विक्री करत आहे. कंपनी या श्रेणीतील विस्तार वाढवण्याचा विचार करत आहे, कारण त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आलेखानुसार चढ-उतारांचा विचार करता, ऑक्टोबर २०२१ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला आहे. आगामी काळात रु.२,७९१ या पातळीच्यावर बंद भाव दिल्यास आलेखानुसारदेखील तेजीचे संकेत मिळतील. धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करत असलेल्या ‘टायटन’ या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.
चांदीकडे ठेवा लक्ष
दीर्घावधीच्या आलेखानुसार चांदीच्या दरात होत असलेल्या चढ-उतारांचा विचार करता, वायदा बाजारानुसार २०११मध्ये ७३,६०० रुपयांचा उच्चांक दर्शविल्यानंतर ३० एप्रिल २०११ पासून तब्बल १२ वर्ष चांदीचा भाव मर्यादित पातळ्यांमध्येच हेलकावे घेत आहे. १२ वर्षांपूर्वीच्या उच्चांकापासून तुलना केल्यास चांदीतील गुंतवणुकीतून मर्यादितच परतावा मिळाला आहे.
आलेखानुसार आगामी काळात रु. ७७,९४९ या पातळीच्यावर चांदीने बंद भाव दिल्यास आलेखानुसार तेजीचे संकेत मिळू शकतात. अशा प्रकारचे तेजीचे संकेत मिळाल्यास चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ज्याकडे गुंतवणूकदारांनी जरूर लक्ष ठेवावे. ‘निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ’: ‘सिल्व्हरबीज’ या एक्सचेंज ट्रेडेड फंडात अर्थात ‘सिल्व्हरबीज’च्या (शुक्रवारचा बंद भाव रु.७५) स्वरूपात चांदीतदेखील धोका लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल.
(सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)