
SVB Crisis: 'या' कारणांमुळे सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली! फेड रिझर्व्हने अहवालात केला खुलासा
Silicon Valley Bank Crisis: गेल्या महिन्यात अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर जगभरात बँकिंग संकट सुरू झाले. आता फेडरल रिझर्व्हने ही बँक बुडण्याचे कारण शोधण्यासाठी एक अहवाल तयार केला आहे.
या अहवालानुसार सिलिकॉन व्हॅली बँक खराब व्यवस्थापन, शिथिल नियम आणि सरकारी नियंत्रणाचा अभाव या कारणांमुळे बुडाली आहे. अहवालात फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की, बँकेच्या आर्थिक स्थितीचे मुल्यमापन न करणे हे केंद्रीय बँकेचे मोठे अपयश आहे.
कठोर भूमिका न घेणे ही मोठी चूक:
फेड रिझर्व्हनेही आपल्या अहवालात बँकेच्या आर्थिक स्थितीचे मुल्यमापन करण्यात चूक केल्याचे मान्य केले आहे. गेल्या काही वर्षांत, टेक आणि स्टार्टअप कंपन्यांच्या वाढीसह, सिलिकॉन व्हॅली बँकेची वाढ देखील वेगाने झाली आहे.
बँकेत वाढ झाली, पण त्यासोबतच समस्याही वाढल्या. असे असतानाही बँकेच्या व्यवस्थापनाने या सर्व गोष्टींकडे लक्ष न दिल्याने कठोर भूमिका घेण्याचे टाळले. फेडने बँकेचे प्रशासन आणि जोखीम व्यवस्थापनावर SVB च्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या सर्व बाबींकडे लक्ष न देताही सिलिकॉन व्हॅली बँकेला चांगले रेटिंग मिळत राहिल्याने बँकेच्या बुडण्यामागे हे प्रमुख कारण ठरले आहे. असे वृत्त Times Now ने दिले आहे.
बँकेचे नियम अधिक कडक केले जातील:
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने सांगितले की ज्या बँकांचे एकूण भांडवल 200 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी आता नियम कडक केले जातील.
यापूर्वी 2008 मध्ये बँकिंग संकटानंतर अमेरिकेत बँकिंग नियमांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले होते. आता सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतरही केंद्रीय बँक नियम अधिक कडक करण्याबाबत बोलत आहे.
सिलिकॉन व्हॅली बँक प्रामुख्याने टेक कंपन्या आणि स्टार्टअप्सना कर्ज देण्याचे काम करते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे वृत्त आल्यानंतर ग्राहकांमध्ये भीती होती.
यानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघ्या काही तासांत, ग्राहकांनी बँकेतून 10 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम काढली होती.
बँकेची आर्थिक स्थिती पाहता 10 मार्च रोजी बँक बंद होती. यानंतर न्यूयॉर्कची सिग्नेचर बँकही बुडाली. अमेरिकेपासून सुरू झालेले हे बँकिंग संकट युरोपात पोहोचले, तिथे स्वित्झर्लंडची क्रेडिट सुईस बँक बुडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या. या बँकेला वाचवण्यासाठी देशातील मोठी बँक यूबीएसमध्ये विलीनीकरण करण्यात येत आहे.