
Share Market : अमेरिकेत लागोपाठ दोन बँका बुडाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान
Share Market : अमेरिकेतील कोणत्याही आर्थिक हालचालींचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर होतो. मग ते व्याजदरात वाढ असो किंवा फेड रिझर्व्हचे कोणतेही पाऊल असो. आता यूएस बँकिंग क्षेत्रातील संकटाचा नकारात्मक परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसू लागला आहे.
यूएसमध्ये, सिलिकॉन व्हॅली आणि नंतर सिग्नेचर बँक बंद झाल्यामुळे तेजीसह बाजार उघडल्यानंतर घसरण झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला.
सेन्सेक्समध्ये 881 अंकांची मोठी घसरण :
दुपारी 2.30 वाजता भारतीय शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी दिवसाच्या नीचांकी पातळीवर 17,130.45 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यात 282.45 अंकांची किंवा 1.62% घसरण झाली.
त्याच वेळी, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,023.28 अंक किंवा 1.73% घसरून 58,111.85 च्या पातळीवर आला. या घसरणीच्या टप्प्यात सुमारे 761 शेअर्स वधारले, 2560 शेअर्स घसरले, तर 121 शेअर्समध्ये कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत.
बाजार किंचित वाढीने उघडला :
शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हावर थोड्या वाढीने झाली. सेन्सेक्स 44.25 अंकांनी किंवा 0.07% ने वाढून 59,179.38 वर उघडला आणि निफ्टी 19.40 अंकांनी किंवा 0.11% ने 17,432.30 वर उघडला. बाजार सुरू होताच सुमारे 1091 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1048 शेअर्सचे लाल चिन्हावर व्यवहार सुरू झाले.
सर्वात मोठी घसरण इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये झाली आहे.Indusind Bank Ltd चा स्टॉक 6.70% किंवा 76.65 रुपयांनी खाली 1,068.15 रुपयांवर व्यवहार करत होता. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) शेअर 2.62% घसरून 533 रुपयांवर आला,
तर एसबीआय लाइफ इन्शुरन्सचा शेअर 2.37 टक्क्यांनी घसरून 1,069.95 रुपयांवर आला. इतर बँकिंग शेअर्समध्ये कोटक महिंद्रा बँक 1.78%, HDFC बँक 1.22% घसरली.
याउलट, टेक महिंद्रा लिमिटेडच्या शेअरने जबरदस्त झेप घेतली आणि 7.26 टक्क्यांनी वाढून तो 1,138.25 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
अदानी समूहाच्या चार शेअर्समध्ये अपर सर्किट :
बाजारात घसरण झाली असली तरी सोमवारी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि समूहाच्या चार शेअर्सनी वरच्या सर्किटला धडक दिली. यापैकी अदानी पॉवर 4.98% वाढीसह 215.10 वर व्यवहार करत होता.
दुसरीकडे, अदानी ग्रीन एनर्जी 4.99% वाढीसह 716.80 रुपयांवर, अदानी टोटल गॅस 5.00% वाढीसह 997.05 रुपयांवर आणि अदानी ट्रान्समिशन 5.00% वाढीसह 949.65 रुपयांवर व्यापार करत आहे.
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 1.41% वाढून 1,923.00 रुपयांवर व्यवहार करत होते. व्यापारादरम्यान अदानी विल्मर 3.04%, अदानी पोर्ट 1.37%, NDTV 4.42%, अंबुजा सिमेंट 1.41% आणि ACC Ltd 3.73% ने व्यापार करत होते.
अमेरिकेत दोन बँकां बंद :
विशेष म्हणजे एकामागून एक बँका बंद झाल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) बंद झाल्यानंतर, क्रिप्टो-फ्रेंडली म्हणून ओळखली जाणारी सिग्नेचर बँक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
या बँकेत क्रिप्टोकरन्सीचा साठा होता आणि त्याचा धोका लक्षात घेता न्यूयॉर्कची ही प्रादेशिक बँक काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने सिग्नेचर बँक ताब्यात घेतली, ज्याची गेल्या वर्षाच्या अखेरीस 110.36 अब्ज डॉलर मालमत्ता होती, तर बँकेकडे 88.59 अब्ज डॉलर ठेवी होत्या.