मी शेतकऱ्यांचा..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 13 मार्च 2018

नेमकी तिथी सांगावयाची तर श्रीशके १९३९ फाल्गुनातली वद्य अष्टमी. टळटळीत सायंकाळ होती. सायंकाळ कसली, रात्रच ती. वास्तविक ह्या वेळी माणसाने घरी परतावे. बाहेर जाऊ नये! पण शिवाजी पार्कच्या मुलुखात अभिमानाने वसलेल्या कृष्णकुंजगडावर अचानक हालचाल झाली. हुकूम सुटले... चलो, शीव!..शिवतीर्थाकडोन शीवतीर्थाकडे!! तेथ सोमय्या मैदानावर साक्षात बळिराजा येवोन ठेपला आहे. साहेबांनी त्यांस वेशीवर जावोन भेटावयाचे ठरवले आहे...

नेमकी तिथी सांगावयाची तर श्रीशके १९३९ फाल्गुनातली वद्य अष्टमी. टळटळीत सायंकाळ होती. सायंकाळ कसली, रात्रच ती. वास्तविक ह्या वेळी माणसाने घरी परतावे. बाहेर जाऊ नये! पण शिवाजी पार्कच्या मुलुखात अभिमानाने वसलेल्या कृष्णकुंजगडावर अचानक हालचाल झाली. हुकूम सुटले... चलो, शीव!..शिवतीर्थाकडोन शीवतीर्थाकडे!! तेथ सोमय्या मैदानावर साक्षात बळिराजा येवोन ठेपला आहे. साहेबांनी त्यांस वेशीवर जावोन भेटावयाचे ठरवले आहे...
भराभरा गाड्या निघाल्या. उणापुरा साडेदोन कोसांचा पल्ला. खुद्द साहेब गाडीच्या चाकावर बैसलेले. (ॲक्‍चुअली समोर बसलेले...) मजल दरमजल करीत साहेब शीवच्या सोमय्या मैदानात पोचले. सदरील मैदान साहेबांचे अगदी नावडते. कां की पूर्वी येथे सर्कशी लागत. नंतरच्या काळात बाबा बामदेवी योगशिबिरे पार पडत. तदनंतर तर कमळ पार्टीचे स्वच्छ प्रतिमेचे नेते किरीटभाई सोमय्या ह्यांच्या नावे हे मैदान ओळखले जाते, असे कळल्याने साहेबांनी तेथे जाणेच टाळले!! असो.
नियमाला अपवाद करोन माय मराठीचा तारणहार बळिराजाला ऊराऊरी भेटला, तोच हा ऐतिहासिक क्षण. बळिराजा त्यांची आतुरतेने वाट पाहात होता. राजे आले. हाताची घडी घालून उभे राहिले. एरव्ही आल्या आल्या ध्वनिक्षेपकाचा ताबा घेवोन सभा जिंकण्याच्या कामगिरीस साहेब लागतात.. नव्हे, तो त्यांचा शिरस्ताच. परंतु, ह्या वेळी कुणी शेतकरीनेता जोसाजोसाने बोलत राहिल्याने साहेबांनी हाताची घडी जी घातली, ती अखेरपर्यंत सोडली नाही!! बळिराजाचे कान साहेबांचे बोल ऐकण्यास आसुसलेले होते. आखिर काही झाले तरी हाच माय मराठीचा तारणहार आहे... त्यांचे ऐकायाचे, नाहीतर कुणाचे? अखेर लांबलचक प्रास्तविक संपल्यावर साहेबांनी दोन-दोन ध्वनिक्षेपके हातात घेवोन सुसंवाद साधला.
‘‘बळिराजा, मी आपलं दर्शन घेण्यासाठी आलो आहे...,’’ टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या ओघवत्या भाषणात अवघे सोमय्या मैदान बुडोन गेले.
...सरकारने दडपिले, अस्मानाने झोडपिले आणि उर्लेसुर्ले सावकाराने हडपिले, ऐसी बळिराजाची दैन्यावस्था. पण त्यास ऊराऊरी भेटोन राजियांनी सांगितले, ‘‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!’’ बळिराजाला उभारी आली! त्यास वाटले, बरे झाले मुंबईपर्यंत पायपीट करीत आलो!! आता मंत्रालयात जाणे नको, काही नको!
‘‘मी सांगतो तुम्हाला, हे सरकार तुम्हाला काहीही देणार नाही!’’ साहेबांनी स्पष्टच सांगितले. हाताची घडी घातलेला माणूस स्पष्टवक्‍तेपणाबाबत फार डेंजर असतो, हे कोणीही मान्य करील.
बळिराजाचे बोलणेच खुंटले. त्याने दुखऱ्या टाचांकडे लक्ष वळवले.
‘‘अहो, ह्यांचेच खिसे फाटके आहेत... ते तुम्हाला काय देणार?,’’ साहेब कडाडले. त्यांचे खरेच होते. सरकारचे खिसे फाटके आहेत, हेही कोणीही मान्य करील. ‘‘पण तुम्ही आमच्या संगट आहात ना, साहेब?,’’ बळिराजाने मोठ्या असोशीने विचारले. कुणी ह्यास खुंटा बळकट करणे असे म्हणेल. पण नाही! ह्याला अपेक्षा म्हणतात.
‘‘संगट?,’’ तारणहार चपापला. मग घाईघाईने म्हणाला, ‘‘हो, हो! चालता चालता मागे वळून बघितलंत तरी मला धक्‍का लागेल, इतका मागोमाग आहे! डरो मत!!’’
पाठिंबा काय सगळेच देतात. पण धीर देणारी माणसे विरळा! बळिराजा सद्‌गदित झाला.
‘‘काहीही करा, पण आमच्या मागण्या मान्य करून घ्या, साहेब!,’’ चालून चालून थकलेल्या टाचा कुर्वाळत बळिराजा म्हणाला.
‘‘माझ्या हातात एकहाती सत्ता द्या, मग चुटकीसरशी मागण्या मान्य करून टाकू! आहे काय नि नाही काय!,’’ साहेबांनी हाताची घडी सोडली. चुटकी वाजवली. पुन्हा हाताची घडी घातली. (खुलासा : हाताची घडी घातलेल्या अवस्थेतही चुटकी वाजवता येते. पण ध्वनिक्षेपक पुढच्या बाजूस होता. असो.)
..आणि अवघे मैदान चुटक्‍यांच्या आवाजांनी निनादले.