सूडचक्र आणि न्याय (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

सुडाच्या भावनेने पेटून उठलेला मारेकरी ज्या समाजाचा आहे, त्या संपूर्ण समाजाला लक्ष्य करायचे, ही घातक प्रवृत्ती आहे. मारेकऱ्याच्या मागे त्याचा संपूर्ण समाज असतो, असे मानणे चुकीचे असते.

सुडाच्या भावनेने पेटून उठलेला मारेकरी ज्या समाजाचा आहे, त्या संपूर्ण समाजाला लक्ष्य करायचे, ही घातक प्रवृत्ती आहे. मारेकऱ्याच्या मागे त्याचा संपूर्ण समाज असतो, असे मानणे चुकीचे असते.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या हत्येनंतर राजधानी दिल्ली; तसेच देशाच्या अन्य भागांत शीख समुदायाच्या विरोधात उफाळलेल्या हिंसाचारातील एका दंगलखोराला अखेर ३४ वर्षांनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे; तर अन्य एकास जन्मठेप झाली आहे. शिवाय, त्यांना जबर दंडही ठोठावण्यात आला असून, ती रक्‍कम या दंग्यात बळी गेलेल्या; तसेच जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. उशिरा का होईना, पण संबंधितांना न्याय मिळाला, हे बरे झाले. दिल्लीचे अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांनी सुनावलेल्या या फैसल्यास जशी इंदिरा गांधी यांच्या क्रूर आणि निर्घृण हत्येची पार्श्‍वभूमी आहे, तसेच त्यामागे राजकीय सुडाचे एक न संपणारे चक्रही आहे. या शीखविरोधी दंगलीतील सहभागाबद्दल किशोरीलाल या व्यक्तीस १९९६ मध्ये फाशीची शिक्षा झाली होती आणि आता अवतारसिंग आणि हरदेवसिंग या दोघांच्या हत्येबद्दल जबाबदार धरून एकास फाशी व एकास जन्मठेप सुनावण्यात आली. हे अपवादात्मक असे हे कृत्य होते, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. मोठ्या नेत्यांच्या हत्येनंतर अशा प्रकारे सुडाचे दमनचक्र सुरू होण्याची प्रथा आपल्या देशात नवी नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ब्राह्मण समाजातील काहींचे वाडे पेटवून देण्यात आले होते, तर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर तमीळ समाजाच्या विरोधात काही हिंसक प्रकार घडले होते. सुडाच्या भावनेने पेटून उठलेला मारेकरी ज्या समाजाचा आहे, त्या संपूर्ण समाजाला लक्ष्य करायचे, ही अत्यंत घातक प्रवृत्ती आहे. मारेकऱ्याच्या मागे त्याचा संपूर्ण समाज असतो, असे मानणे चुकीचे असते; परंतु ही भावना आपण सामाजिक सलोख्याच्या कितीही गप्पा मारल्या, तरी जनमानसात रुजवण्यात कमी पडलो. ८४ मध्ये घडलेल्या घटना याचीच साक्ष देणाऱ्या आहेत.

इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी केल्यानंतर शीखविरोधी सुडाचे दमनचक्र सुरू झाले आणि अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार त्या हिंसाचारात किमान २८०० शीख बांधव ठार झाले होते. राजधानीत हा सुडाचा वणवा भलत्याच वेगाने पेटला होता. या २८०० मध्ये किमान २१०० लोक हे दिल्लीतच मृत्युमुखी पडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील १९९४ मध्ये फाइलबंद केलेल्या प्रकरणाची नव्याने चौकशी केली. दक्षिण दिल्लीत महिपालनगर येथे झालेल्या दंगलींचे हे प्रकरण होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नेमण्यात आलेल्या ‘स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम’ने केलेल्या चौकशीअंती ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याच्या चौकशीचे राजकारण होता कामा नये. या दंगली नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्या होत्या आणि त्यामागे काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांचा हात होता, असा आरोप गेली ३४ वर्षे विरोधक सातत्याने करत आले आहेत. देशात कोठेही हिंसाचार झाला, की मग तो अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतरचा असो, की गुजरातेतील ‘गोध्राकांडा’नंतरचा असो; त्याबद्दल उन्मादी हिंदुत्ववाद्यांना जबाबदार धरले जाताच, विरोधक काँग्रेसला या शीख शिरकाणाची आठवण करून देत असतात.

 १९८०च्या दशकांत फोफावलेल्या खलिस्तानी चळवळीचा बीमोड करण्यासाठी अखेर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती गांधी यांनी ‘ऑपरेशन ब्लू-स्टार’ मोहीम आयोजित केली आणि थेट अमृतसरच्या सुवर्णमंदिरात सैन्य घुसवून, तेथे आसरा घेणाऱ्या भिंद्रनवाले या दहशतवाद्याचा खातमा केला. तेव्हापासून शीख समाजातील एक गट या अपमानाचा बदला घेण्याच्या भावनेने पेटून उठला होता आणि त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी आपल्या सुरक्षा दलात शीख सुरक्षारक्षकांना ठेवू नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता; पण तो त्यांनी मानला नव्हता. या सुरक्षारक्षकांच्या गोळ्यांनाच त्या बळी पडल्या. त्यामुळेच शीख विरोधात दंगली उफाळून आल्या होत्या. या दंगली अत्यंत अमानुष होत्या आणि त्यामागे काँग्रेस पक्षाच्या माखनलाल फोतेदार; तसेच दिल्लीचे तत्कालीन पोलिस आयुक्‍त यांचा हात असल्याचा आरोप झाला आहे. मात्र, त्याचवेळी काही पोलिस अधिकाऱ्यांनी जिवाची बाजी पणाला लावून, अनेक शीख कुटुंबीयांना वाचवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गुजरातेतील ‘गोध्राकांडा’नंतर उफाळून आलेल्या मुस्लिमविरोधी दंग्यांच्या वेळीही पोलिस दल सरकारच्या इशाऱ्यावर नाचत होते, असेही आरोप नंतर अनेकवार झाले आहेत. अर्थात, यामुळे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी वाढली आहे. यापुढे अशा दुर्दैवी घटना यदाकदाचित घडल्याच, तर त्यानंतर असे सुडाचे दमनचक्र सुरू होऊ नये, याबाबत डोळ्यांत तेल घालून त्या त्या वेळच्या सरकारांनी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून दक्षता घेतली, तरच अशा घटना टाळता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1984 anti Sikh riots convict gets death sentence