पन्नास दिवसांची गोष्ट! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नोटाबंदीच्या पन्नास दिवसांची मुदत मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता संपत्ये आहे. ह्यानंतर आपली आयुष्ये नेमकी कशी बदलतील, ह्याबद्दल सवासों करोड देशवासीयांच्या मनात उत्सुकता आहे. आम्ही ह्या संदर्भात अन्यांपेक्षा (अधिक क्‍याशलेस असल्यामुळे) अधिक उत्सुक होतो. पन्नास दिवसांनंतर नेमके काय होईल, ह्याचे उत्तर आम्हाला पन्नास वर्षांपूर्वीच्या एका दुर्मीळ कागदपत्रात मिळाले. हा प्राचीन ग्रंथ आम्हाला आमच्या घराचे पोटमाळ्यावर धूळ खात असलेला सांपडला. ग्रंथाची चाळण झाली असली तरी त्यात काही चित्रे असल्याचे दिसले. मुखपृष्ठावर ‘चांदोबा’ असे ग्रंथनाम लिहिलेले आहे. वाचा.

नोटाबंदीच्या पन्नास दिवसांची मुदत मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता संपत्ये आहे. ह्यानंतर आपली आयुष्ये नेमकी कशी बदलतील, ह्याबद्दल सवासों करोड देशवासीयांच्या मनात उत्सुकता आहे. आम्ही ह्या संदर्भात अन्यांपेक्षा (अधिक क्‍याशलेस असल्यामुळे) अधिक उत्सुक होतो. पन्नास दिवसांनंतर नेमके काय होईल, ह्याचे उत्तर आम्हाला पन्नास वर्षांपूर्वीच्या एका दुर्मीळ कागदपत्रात मिळाले. हा प्राचीन ग्रंथ आम्हाला आमच्या घराचे पोटमाळ्यावर धूळ खात असलेला सांपडला. ग्रंथाची चाळण झाली असली तरी त्यात काही चित्रे असल्याचे दिसले. मुखपृष्ठावर ‘चांदोबा’ असे ग्रंथनाम लिहिलेले आहे. वाचा.

...कोणे एके काळी एका नगरीत एक राजा राज्य करीत असे. (ह्या वाक्‍याला तसा काही अर्थ नाही. पण असो.) त्याची पुत्री राजकन्या बेबीराणी ही स्वभावाने अंमळ अधिक व मेंदूने अंमळ अधू होती. हिचे पुढील दोन दांत अधिक पुरोगामी आणि हनुवटी अधिक प्रतिगामी अशी होती व वर्ण काहीसा अधिक बैंगणी असल्याने व शरीरयष्टी अधिक वजनदार असल्याने तिच्या स्वयंवराच्या धमक्‍या देऊन देऊन सदर राजाने आसपासच्या राजे-राजपुत्रांना धाकात ठेविले होते. राजकन्येच्या स्वयंवराची दवंडी पिटली की राजे-राजपुत्र दूरदेशी पळून जात. अखेर कंटाळून राजाने राजकन्येचे स्वयंवर प्रजाजनांस खुले केले. अशाच एका धमकीवजा स्वयंवर मेजवानीसाठी त्याने प्रजाजनांस बोलाविले. स्वयंवराचा पण अतिशय अवघड ठेविला होता.

राजकन्येस जो एका मिनिटात तीनवेळा डोळा मारील, त्यास तिच्याशी विवाह करावा लागेल! सारे प्रजाजन डोळे घट्ट मिटून बसून राहिले. तेवढ्यात राजा म्हणाला, ‘‘पहा, राजकन्येच्या गळ्यातील दुर्मीळ रत्नहार!’’ कोणीही डोळे जाम उघडले नाहीत. तेवढ्यात राजा म्हणाला, ‘‘अरे अरे, दिवे कोणी घालविले?’’ 

बेसावध प्रजाजनांनी गाढवासारखे डोळे उघडले! दिवे गेलेच नव्हते. हाहाहाहाहा!!! समोर राजा खिंकाळत उभा होता. प्रजाजनांची पळापळ झाली. पण राजाने राजवाड्याचे सर्व दरवाजे व खिडक्‍या बंद केल्या होत्या. प्रजाजन पुन्हा आपापल्या खुर्चीत (पाय वर घेऊन) बसले.

‘‘राजकन्येच्या गळ्यातील मौल्यवान रत्नहार चोरीस गेला असून, तो मिळेपर्यंत सर्वांची झडती घेण्यात येईल,’’ राजाने जाहीर केले. प्रजाजनांना रांगेत उभे करून त्यांची झडती घेण्यात आली. चपला-बुटांचे तळ उसवण्यात आले. राजकन्येचा रत्नहार काही सांपडला नाही. अखेर राजाने जाहीर केले, की ‘‘पन्नास दिवस ह्याच दालनात तुम्हास कोंडून घालण्यात येईल. मी लाइट घालवतो आहे. ज्याने रत्नहार चोरला त्याने गपचूप आणून तो राजकन्येच्या गळ्यात होता तसा घालावा.-तुमकू कोई कुछ नही बोलेगा!’’
एक दिवस गेला. चार दिवस गेले. पंधरा दिवस गेले. तीस दिवस गेले आणि...पन्नासावा दिवस उजाडला.

राजाने दालनाचे कुलूप उघडले. पाहातो तो काय! खुर्च्यांवर प्रजाजन चकाट्या पिटत आहेत. काही प्रजाजन पत्ते खेळत आहेत. काही प्रजाजन (काचेच्या) गोट्या खेळत आहेत. दोन-तीन प्रजाजनांनी विटीदांडूचा डाव रंगवला आहे आणि राजकन्या बेबीराणी रत्नहारांच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली मरून पडली आहे...

‘‘प्रजाजनहो, तुम्ही खरेच बाराचे आहा!!,’’ तोंडातील तीन बोटे काढून राजा म्हणाला, ‘‘ मी एकच रत्नहार चोरीला गेल्याचे जाहीर केले होते. तुम्ही ढीग कोठून आणले?’’

‘‘ ते काही नाही! आम्हाला घरी जाऊ द्या! तुम्हाला तुमचा रत्नहार मिळाला ना? बास!!,’’ एक प्रजाजन म्हणाला.

‘‘पण ॲक्‍चुअली एकही हार चोरीला गेलेला नसताना इतके हार जमा झालेच कसे?,’’ राजाने पुन्हा तीन बोटे तोंडात घातली. राजा स्तंभित झाल्याचे पाहून अस्ताव्यस्त प्रजाजनांची पुन्हा धावपळ सुरू झाली. जो तो जीव खाऊन दरवाज्याकडे धावला. एका प्रजाजनाने त्याच्या कमरेच्या चाव्या लंपास केल्या.

जाता जाता तो प्रजाजन ओरडला- ‘‘हे राजा, आता ते तू पुढचे पन्नास महिने हुडकत बस. हम तो चलें!’’

तात्पर्य : यथा राजा तथा प्रजा!!

Web Title: 50 days story