"सुपरस्टार' संस्कृतीचा बळी?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

कुंबळे आणि विराट यांच्यातील वादासंबंधात आता जी काही वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत, ती बघता भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसा पोचू शकला, असाच प्रश्‍न पडतो!

आपल्या देशात क्रिकेटपटूंना "देव' मानण्याची प्रथा सुरू झाली आणि क्रिकेट हा "सभ्य माणसांचा खेळ आहे!' ही ब्रिटिश उक्‍ती आपण सारेच विसरून गेलो! सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यावरून उठलेले वादळ बघितले की "सुपरस्टार' क्रिकेटपटूंनीच भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून देणाऱ्या आणि आपल्या करड्या शिस्तीबद्दल प्रसिद्ध असलेल्या कुंबळेचा बळी घेतला आहे, असेच म्हणावे लागते. भारतात प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील वाद नवे नाहीत; तरीही कुंबळे यांना या पदावरून पायउतार व्हावे लागणार हे दिसतच होते. गेले महिनाभर त्याची चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेला असलेली कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेदांची किनारही लपून राहिली नव्हती. त्यातच कुंबळे यांची मुदत संपत आल्यानंतर म्हणजेच "चॅंपियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या तोंडावर नव्या प्रशिक्षकाची निवडीची प्रक्रियाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरू केल्याने, तर त्यावर शिक्‍कामोर्तबच झाले होते. आता हे वादळ तुफान वेगाने घोंगावू लागल्यामुळे ही प्रक्रिया सुरू करणे, हा नियमाचाच एक भाग असल्याची मखलाशी विराट करत आहे. मात्र, त्या वेळी गॅरी कर्स्टन यांना प्रशिक्षकपदी कशी कोणत्याही प्रक्रियेविना मुदतवाढ देण्यात आली होती, याकडे मात्र विराट दुर्लक्ष करत आहे.

कुंबळे आणि विराट यांच्यातील वादासंबंधात आता जी काही वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत, ती बघता भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसा पोचू शकला, असाच प्रश्‍न पडतो! गेले सहा महिने कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात जुजबी संवाददेखील होत नव्हता. तेव्हा "हेडमास्टर' म्हणून गाजलेल्या कुंबळेची शिस्तच कर्णधार आणि संघातील अन्य ज्येष्ठ खेळाडूंना जाचत होती, हेच स्पष्ट होते. "तुम्हाला प्रॅक्‍टिस करायची नाही ना, मग चला बाजारहाटीला जाऊ या!' असे म्हणणारा प्रशिक्षक ज्या कोण्या खेळाडूंना हवा असेल, त्यांची संघातून हकालपट्टीच करायला हवी, अशा जळजळीत शब्दांत गावस्कर यांनी या "मस्तवाल' खेळाडूंना आपल्या फलंदाजीचे फटके लगावले आहेत.

अर्थात, "बीसीसीआय'लाही प्रत्यक्ष खेळापेक्षा या सुपरस्टार खेळाडूंच्या माध्यमातून खच्चून भरणाऱ्या तिजोरीतच अधिक रस असल्याने त्यांनी विराटपुढे लोटांगण घातले आणि त्या लढतीत कुंबळेचा हकनाक बळी गेला, असाच या पॅव्हेलियनमधील राजकारणाचा अर्थ आहे.