चला... आपणही खारीचा वाटा उचलू या !

समाजाला दिशा देण्याचे काम अनेक संस्था करत आहेत. आरोग्य, शिक्षण या विषयात दूरगामी उपयोगिता पाहून काही मदतीचे हात पुढे येत असतात.
mulegaon aashramshala students
mulegaon aashramshala studentssakal
Summary

समाजाला दिशा देण्याचे काम अनेक संस्था करत आहेत. आरोग्य, शिक्षण या विषयात दूरगामी उपयोगिता पाहून काही मदतीचे हात पुढे येत असतात.

समाजाला दिशा देण्याचे काम अनेक संस्था करत आहेत. आरोग्य, शिक्षण या विषयात दूरगामी उपयोगिता पाहून काही मदतीचे हात पुढे येत असतात. अशा मदतीतूनच काहींना जीवनदान मिळते तर काहींच्या आयुष्याची उभारणी होत असते. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव परिसरात संस्कार संजीवनी फौंडेशन संचलित आदिवासी वंचित विद्यार्थी आश्रम आहे, येथे सध्या ४२ विद्यार्थी निवासी असून त्यांना दोनवेळचे जेवण, रहिवासाबरोबरच शैक्षणिक साहित्य, गणवेश, क्रीडा साहित्यासाठी आपल्या मदतीची मोठी गरज आहे. संस्थेच्या इमारतीसाठी निधी उभारण्याचे काम सुरू असून मदतीच्या माध्यमातून हा जगन्नाथाचा रथ पुढे जाणार आहे.

समाजातील दुर्लक्षित अशा निराधार बालकांसाठी स्वतः अनाथ म्हणून वाढलेल्या मूळच्या मोरवंची (ता. मोहोळ) येथील परमेश्‍वर काळे या तरुणाने सोलापूर जवळ मुळेगाव परिसरात २०१० मध्ये भाड्याने जागा घेतली. या जागेचा करार संपूनही आता दोन वर्षे उलटली. या आश्रमाला ही जागा सोडावी लागणार असल्याने आश्रमातील विद्यार्थ्यांसमोर यक्ष प्रश्‍न उभा आहे. पर्यायी व्यवस्थेसाठी म्हणजे स्वतःचीच जागा असावी असा प्रयत्न आहे, यासाठी सोलापूर- तुळजापूर रस्त्यावर दोन एकर जागा विकत घेण्याचा मानस आहे. परंतु ही जागा विकत घेण्याची ऐपत संस्थेची नाही. ही जागा विकत घेण्यासाठी ३० लाखांचा निधी उभारण्याचे काम सुरू आहे. समाजातील दानशूरांनी यासाठी पुढे यावे अशी विनंती परमेश्‍वर काळे यांनी केली आहे.

स्वतः अनाथ म्हणून वाढलेल्या बारावीनंतर डी.एड. आणि बी.ए.चे शिक्षण घेतलेल्या काळे यांनी आदिवासी, भटक्‍या, वंचित समाजातील लोकांचे जीवन जवळून पाहिले. अशा समाजात जन्मलेल्या मुलांना माणूस म्हणून जगण्यासाठी फारच कष्ट उपसावे लागतात. समाजमान्यता मिळण्यासाठी धडपडावे लागते. स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षांनीही या दुर्लक्षित समाजाची व्यथा कोणापुढे सांगावी असा प्रश्‍न आजही उभा आहे. परमेश्‍वर यांनी आपले उच्च शिक्षण पुण्याच्या विद्यार्थी सहायक समितीच्या आधारातून केले. या समितीच्या कार्याचा वारसा घेऊन त्यांनी समाजातील दुर्लक्षित मुलांना एकत्र करण्याचे मोठे काम केले. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा गेल्या बारा वर्षांपासून ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या पुण्यातील चांगल्या शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडले आहे. मुळेगावच्या मोकळ्या रानात एका संस्थेच्या केवळ रिकाम्या भिंती दहा वर्षांच्या भाडेकराराने घेतल्या. लोकांच्या मदतीतूनच वासे, पत्रे घालून एक छोटेसे छत तयार केले. हा निवारा समजून त्यातच संस्थेचे काम सुरू करण्यात आले.

सोलापूर, उस्मानाबाद, नगर, व पुणे जिल्ह्यातील रस्त्यांवर, पालांवर, डोंगरदऱ्यांत, जंगलात फिरुन काळे व त्यांची पत्नी अरुणा यांनी सुरवातीला १२ मुलांना एकत्रित केले आणि या ज्ञानयज्ञाचा श्रीगणेशा केला. दिवसेंदिवस मुलांच्या संख्येत वाढच होत आहे. आतापर्यंत या आश्रमातून २०० ते २५० विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडल्याचे सकारात्मक चित्र पहावयाला मिळाले आहे. कितीही विरोधी परिस्थिती आली तरीही काळे दाम्पत्याने हार मानली नाही. जवळपास ४२ मुलांचा सांभाळ त्यांनी केला. त्यांना मदत म्हणून काही संस्था, व्यक्तींनी आपला सहकार्याचा हात पुढे केला आहे. काही संस्थांनी या संस्थेचे कार्य पाहून पुरस्कारही दिले आहेत. कोणी येथील मुलांसाठी खेळणी, कोणी रनिंग शूज देतात, तर कोणी आपला वाढदिवस येथील मुलांसमवेत साजरा करतात. परंतु या माध्यमातून मिळालेली मदत तोकडी पडत आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसतानाही हा पालावरचा संसार ते चालवित आहेत. रोख देणगीबरोबरच अन्नधान्य, वस्तू, फर्निचरच्या रुपानेही आश्रमाकडे रितसर मदत देता येते. या संस्थेच्या इमारत अथवा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूरांनी आता पुढे येण्याची गरज आहे. मोठी मदत केल्यास संबंधितांच्या नावे खोली अथवा वसतिगृहास नाव देता येईल, असे काळे यांनी सांगितले.

मदतीचा हात देण्यासाठी...

  • विद्यार्थ्यांचा दिवसाचा भोजन खर्च - २१०० रुपये

  • महिन्याचा एकूण खर्च - ४० हजार रुपये

  • वार्षिक पालकत्व योजना - ११ हजार रुपये

संस्थेला मदत करण्यासाठी...

संस्कार संजीवनी फौंडेशनच्या बॅंक ऑफ इंडियाच्या ०७०६१०११००१०२४२ (आएफएससी कोड - बीकेआयडी००००७०६) या अकाउंटवर रक्‍कम जमा करता येईल. या देणगीसाठी ८० जी अन्वये आयकरातून सूट मिळणार आहे. संपर्क - ९८८१५५९४१६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com