इंटरनेट युगातही डॉक्‍टरांना पर्याय नाही

बुधवार, 1 जुलै 2020

एखाद्या बिगर वैद्यकीय माणसाने काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला, तर तो बहुतांश वेळेला चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे कधीही कोणतीही लक्षणे जाणवली, तर डॉक्‍टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आणि योग्य आहे.

सध्याच्या ऑनलाइन युगात इंटरनेटवर एखाद्या आजाराची लक्षणे, औषधांची माहिती सर्रास शोधली जाते. मात्र, डॉक्‍टरप्रमाणे इंटरनेट शारीरिक तपासणी करू शकत नाही. शिवाय इंटरनेटवरील वेगवेगळ्या माहितीमुळे गोंधळही उडू शकतो. त्यामुळे डॉक्‍टरांना इंटरनेट हा पर्याय ठरू शकत नाही. आजच्या राष्ट्रीय डॉक्‍टर दिनानिमित्त... 

आपल्या आजाराची लक्षणे इंटरनेटवर सर्च करणे ठीक आहे, परंतु डॉक्‍टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आणि योग्य आहे. आजच्या ‘टेक्‍नोसॅव्ही’ जगामध्ये सर्व काही आणि सर्वजण इंटरनेटच्या जाळ्याने जोडले गेले आहेत, तेथे वैद्यकीय निदानही इंटरनेटविना कसे राहू शकते. आपण अशा तंत्रयुगात राहत आहोत जेथे आपल्या मोबाईलमधील व्हॉइस असिस्टंटही काही विचारल्यावर पटकन उत्तर देईल. व्हॉइस असिस्टंट असे उत्तर देईल, जसे तिला ते सर्व माहीत होते. आणि हो! तिला माहीतही असू शकते, कारण ती इंटरनेटच्या जाळ्यातून सर्व ज्ञानकोशांशी जोडली गेलीय. तुम्हाला सर्दी होते, तुम्ही इंटरनेटवर शोधता की काय झाले? हे आपल्यापैकी बरेच लोक करतात. कारण ते

सोपे आहे, तत्परतेने उपलब्ध आहे आणि बोटाच्या टचच्या अंतरावर आहे. तुम्ही काहीही लक्षणे सर्च करा, इंटरनेटवरचे ‘डॉ. सर्च’ आपल्याला ‘काही झाले नाही’ यापासून आपल्याला ‘खूप मोठा आजार असू शकतो’ असे सर्व काही सर्च रिझल्ट्‌स तो दाखवतो. मग आपल्याला भीती वाटू लागते की खरेच आपल्याला काही झाले आहे काय? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधणे चुकीचे नाही. पण आपण इंटरनेटवर जे वाचतो त्याचे तात्पर्य आपण काय घेतो हे महत्त्वाचे. आपण कोणतीही लक्षणे सर्च करताना हे विसरतो, की इंटरनेटला आपल्या आजाराचा व आपला शरीरप्रकृतीचा इतिहास माहीत नसतो. इंटरनेटवरील सर्च आपल्याला शारीरिकदृष्ट्या त्या क्षणी बघू व तपासू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दाखवलेले सर्चचे रिझल्ट्‌स हे एक आर्टिफिशियल इंटेलिजंट प्रोगॅम आहे. तो लक्षणे व त्याजवळ असलेली माहिती जोडतो. शारीरिक तपासणी करून खऱ्या अनुभवावरून चिकित्सा करत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळी आपण डॉक्‍टरकडे जातो, त्या वेळी डॉक्‍टर आपल्याला कार्यात्मक पद्धतीने निदान करतात, जे इंटरनेट करू शकत नाही. डॉक्‍टरांकडे असणारा दीर्घ अनुभव हा वास्तविक मानवी शरीराचा असतो. तो इंटरनेटप्रमाणे फक्त अस्तित्वातील आणि जुळवलेल्या माहितीचा नसतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरेतर इंटरनेट चुकीचे नाही. इंटरनेटमुळे वैद्यकीय चिकित्सा आणि वैद्यकीय विज्ञान खूप जोडले गेले आहे. त्यांची प्रगती होण्यास इंटरनेट हा एक महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे. वैद्यकीय शोधनिबंध, वैद्यकीय शोधभांडार, नवनवीन होणारे वैद्यकीय प्रयोग, नवीन आजारांची आणि औषधांची माहिती व बरेचशी वैद्यकीय जर्नल ऑनलाइन उपलब्ध आहेत. ही माहिती वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची व सोईस्कर आहे. पण या माहितीवरून एखाद्या बिगर वैद्यकीय माणसाने काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला, तर तो बहुतांश वेळेला चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे कधीही कोणतीही लक्षणे जाणवली, तर डॉक्‍टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आणि योग्य आहे.