स्वीकार की अस्वीकार? ( पहाटपावलं)

Malhar arankalle editorial
Malhar arankalle editorial

पुस्तकांचा कप्पा नीट लावायचं बरेच दिवस ठरवीत होतो; पण त्यासाठी निश्‍चित वेळ काढला जात नव्हता. एकेदिवशी मात्र जमवलंच. पुस्तकांचे विषयवार गठ्ठे केले. गरजेनुसार पुस्तकांचा क्रम ठरवला. कुठल्या विषयाची पुस्तकं कप्प्यात कशी ठेवावीत, त्याचा विचार केला. कप्प्याचा एकेक भाग पुस्तकांनी भरून जाऊ लागला. या सगळ्यांत वेळ कुठं गेला, ते लक्षातही आलं नाही. पुस्तकांचे विषय, त्यांतील संदर्भ, त्या पुस्तकांबरोबरच्या आठवणी, त्यांतील लेखनशैली, विषयमांडणी असं काही काही पुस्तकं हाताळताना आठवत राहिलं. हे करताना जणू समाधीच लागली. वैचारिक, आनंददायी अनुभूती देणारी समाधी. कप्पा लावून झाला. तो नीटनेटका पाहण्यातही कमालीचं समाधान होतं. 
हे समाधान पुस्तकं आवरतानाच्या ध्यानस्थितीमुळं होतं का? 
वरवर तसंच वाटलं; पण ते सत्य नव्हतं. अशा ध्यानामुळंच आनंद होतो, असा अनेकांचा समज असतो; पण आनंद ध्यानामुळं होतच नाही. मनाच्या तळाशी साठलेली दुःखं, गैरसमजांचे मळभ ध्यान बाजूला करतं. ध्यान आपली दुःखाची पकड सोडवतं. अडथळा ठरणारी ही शिळा एकदा बाजूला झाली, की त्यामागं लपलेला आनंदाचा प्रकाश चमचमू लागतो. आनंदाची कारंजी तिथं नाचू लागतात. हा आनंद काही शिळा बाजूला केल्यानं निर्माण होत नाही. तो तिथं आधीपासून असतोच. त्यावरील आवरण बाजूला होताच, त्याचं अस्तित्व जाणवू लागतं. पुस्तकांचा कप्पा गरजेनुसार व्यवस्थित लावला गेल्यानं, त्याचा आनंद वाटत होता. पुस्तकांच्या कप्प्यातील अव्यवस्थितपणा काढून टाकला, तेव्हा त्याच ठिकाणी नेटकेपणाचं सौंदर्य खुलून आलं. आधी ते अव्यवस्थितपणाच्या मागं लपलेलं होतं. 
वेगवेगळी उद्दिष्टं गाठण्यासाठी धावाधाव, स्पर्धा, त्यांतून येणाऱ्या चिंता यांनी माणसांचं दैनंदिन जगणं किती तणावाचं झालं आहे. "तुटत नाही, तोपर्यंत ताणत राहा', हेच जणू आजच्या जगण्याचं सूत्र बनलं आहे. अशा चिंतांच्या ओझ्यांनी आपली मनं आक्रसत चालली आहेत. संकुचित बनत आहेत. मन संकुचित झालं, की आपण दुःखाचं पांघरूण स्वतःभोवती लपेटून घेतो. त्यामुळं आपल्यापर्यंत आणखी चिंता पोचू शकणार नाहीत, अशा आभासी समाधानाच्या आकर्षणात आपण फसतो. आपल्या लक्षातही येत नाही, की ओंजळ किती दुःखांनी-काळज्यांनी तुडुंब होत चालली आहे! 
दुसऱ्याच्या उण्या शब्दांनी, टीकेनं माणसांची मनं विदीर्ण होतात. कित्येकांची आयुष्यं काळवंडून जातात. का होतं असं? अशी माणसं टीकेचा स्वीकार करतात, म्हणून. असूया-मत्सर या भावनांनी केली जाणारी असली टीका नाकारा. सोडून द्या. तुम्ही असं कराल, तेव्हा हे "मतलबी' टीकाकार गोंधळून जातील. तुमचा हा "नकार' त्यांना अनपेक्षित असतो; त्यामुळं त्यांचीच बेचैनी वाढत जाते. दुःखांना आपणच बोलावून घेतो. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करतो. त्यांची बडदास्त ठेवतो. मग ते आपला मुक्काम कशासाठी हलवतील? 
स्वीकार किंवा अस्वीकार, हे तर आपल्या हातांतच असतं. तिथं चूक करून कसं चालेल? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com