मन सैतानाचा हात...

पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात.
Actress Ketki Chitale post is currently on social media Expression to the deformity
Actress Ketki Chitale post is currently on social media Expression to the deformitysakal
Summary

पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात.

पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात. पण या गोष्टी कल्पित असल्याचा दिलासाही असतो. समाज माध्यमे नावाचे जे प्रकरण गेले दीड-दशकभराहून अधिक काळ फोफावते आहे, त्याचा स्वभाव मात्र या विषकन्येसारखाच आहे. त्याचे विखारीपण अधिक आग ओकत आहे. वर्तमानातील या विषकन्येच्या उन्मादी सौंदर्याने घायाळ होणाऱ्यांची संख्या काही कोटींमध्ये आहे, आणि तिचा स्पर्श आपला घात करतो आहे, याचा पत्ताही लागत नाही. समाज माध्यमांवर नित्य होणारे हे वाह्यात शाब्दिक हल्ले, संस्कृतिहीन शिवराळपणा आणि समाजाची वीणच उसवू पाहणाऱ्या प्रवृत्तींना मिळणारे मोकळे रान हा जागतिक चिंतेचा विषय आहे. समाजमाध्यमे एवढी विषाक्त का? आणि त्यांचा विषारीपणा कमी करण्याचा उपाय तरी काय? यावर जगभरचे पंडित आणि वैचारिक डोकी घासत आहेत, पण अजून अक्सीर इलाज सापडलेला नाही. समाज माध्यमे नव्हती त्याकाळी माणसे एवढी विषारी नव्हती, असा निष्कर्ष काढणे थोडे अजाणतेपणाचे ठरेल. कारण माणसाच्या मनात काहीना काही काळेबेरे असतेच. ‘मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल...’ अशा सार्थ ओळींनी कविवर्य सुधीर मोघे यांनी मनाचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे. खोल मनाच्या तळात दडलेले हे काळेबेरे संस्कार, सामाजिक निर्बंध आणि शिष्टसंमत वर्तनाचे मापदंड असल्या बाबींमुळे शतकानुशतके दबलेले होते. त्याला भळभळून पृष्ठभागावर यायला मोकळीक मिळाली ती समाज माध्यमांच्या शोधामुळे.

कुण्या एका केतकी चितळे नामक अभिनेत्रीने टाकलेल्या वेड्यावाकड्या पोस्टमुळे सध्या समाज माध्यमांचेच नव्हे; तर महाराष्ट्रातले वास्तवही ढवळून निघाले आहे. अर्थात, अशा स्वरुपाची पोस्ट टाकणारी ती एकटीच नाही. असे कितीतरी जण समाज माध्यमांवर अशा प्रकारे व्यक्त होत असतात. असल्या विकृतीला अभिव्यक्ती कसे म्हणायचे, हाच प्रश्न आहे. यातील वादग्रस्त पोस्ट निमित्तमात्र आहे. पण स्वत:ची ओळख दडवून मनात खदखदणारे ओकून टाकण्याची ऊर्मी या अपौरुषेय आणि निर्गुण-निराकार माध्यमांमध्ये फोफावली. हाती आलेले हे नवे विश्व, कितीही ‘नवे’ असले तरी ते विश्वामित्री आहे, याचे भान हरपून जाते. समाज माध्यमांवर खोट्या बातम्या, अफवा, चुकीची माहिती इतक्या मनोवेगाने पसरते की याला लगाम घालायचा कसा, आणि कुठे, हे कुठल्याही यंत्रणेच्या हातात राहात नाही. तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था खोटी बातमी किंवा अफवा पसरवणाऱ्याला पकडू शकते, आणि तिच्या किंवा त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईदेखील करु शकते. पण ही निव्वळ प्रतिक्रिया ठरते. मुळातच असल्या अपप्रवृत्ती रोखण्यासाठी काय उपाय करणे गरजेचे आहे? हा खरा प्रश्न आहे. नव्या सहस्त्रकात प्रवेश करता करताच इंटरनेटचे मायावी जाल आणि पाठोपाठ समाज माध्यमांची पिलावळ आली. पिले गोंडसच असतात. त्यानुसार त्यांचे कौडकौतुकही झाले. जन्माला आली, तेव्हा ही सर्व माध्यमे संपर्काची आणि देवाणघेवाणीची, किंवा माणसा-माणसांना जोडणारी माध्यमे होती. घरबसल्या अवघ्या जगाशी जोडणाऱ्या या वरदानाला पुढे विषाचा डंख झाला. ट्विटर, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक असल्या माध्यममंचावर व्यक्त होण्यासाठी अर्हता-पात्रता, ओळख या मूलभूत सामाजिक पूर्वअटींचीही गरज नसते. ‘कोणीही यावे, टपली मारुनि जावे’ असला प्रकार. लाइक्स-डिस्लाइक्स, टाळ्या, शिव्यांच्या लाखोल्या, अश्लीलतेच्या चुळा असल्या गोष्टींवर सरपटणारे हे विश्व आहे. सभ्यतेच्या मर्यादा इथे गैरलागू असतात. अशा ठिकाणी समाजकंटकांची नवी पैदास होणे स्वाभाविकच होते.

मुळात समाज माध्यमांचा जन्म रचनात्मक संवादासाठी झाला. अनेक ठिकाणी कितीतरी सेवाभावी गट या माध्यमांचा उत्तम विनियोग करुन कार्य उभे करताना दिसतात. एकमेकांना कडकडून भेटल्याचे सुखही अनेक सुहृदांना हीच माध्यमे देत असतात. ही माध्यमे प्रबोधनाची प्रमुख अस्त्रे म्हणूनही कामी येतात. परंतु, माध्यमकंटकांच्या अगोचर उद्योगांमुळे या उपयुक्ततेचे कलमच झाकोळून जाते, आणि चर्चेत उरतो तो घाणेरडा, विखारी मजकूर. ज्या घनगर्द मांडवाखाली माणसे एकमेकांशी संवादितात, तो मांडव विषवल्लीचा आहे, ही जाणीव भयभीत करणारी आहे. मग याला उपाय काय? या प्रश्नाला अजून तरी एकच एक उत्तर सापडलेले नाही. सकारात्मक देवाणघेवाणीचा माध्यमांवरला अवकाश वाढवण्यासाठी सुसंस्कृतांनी तेथे जास्तीत जास्त एकवटणे, नव्या पिढीने जाणीवपूर्वक ‘वृत्तसाक्षर’ होणे, समाजमाध्यमांवरला आपला वावर कमीतकमी ठेवणे, हे काही ढोबळ उपाय आहेत. वृत्तसाक्षरता ही जागतिक समस्या आहे. पुढारलेल्या देशांमध्येही ती खूप कमी आढळते. खोट्या बातम्या, अफवा वेळीच ओळखून ती ‘फॉर्वर्ड’ करण्याच्या ऊर्मीला पायबंद घालण्यासाठी वृत्तसाक्षरता गरजेची आहे. हल्ली बराचसा तरुण समुदाय ऑनलाइनच वावरत असतो. सारे जगणेच ऑनलाइन झाल्यावर ‘ऑफलाइन’ वास्तवात शुकशुकाट होणे स्वाभाविक आहे. हा वेळ कमी करुन वास्तव जगात हिंडण्याला प्रोत्साहन मिळायला हवे. समाज माध्यमे हे मानवाला मिळालेले वरदान आहे, त्याचे शापात रुपांतर होऊ नये, एवढेच.

समाज माध्यम म्हणजे तंत्रज्ञानाचे पुरेपूर शोषण नव्हे; ते तर समाजसेवेचे प्रभावी माध्यम होय.

- सीमॉन मेनवेअरिंग, ब्रँड तज्ज्ञ आणि लेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com