फायदा भाडेकरूंचा आणि मालकांचाही

केंद्र सरकारने प्रस्तावित भाडेनियंत्रण कायदा-२०२१चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. प्रथमदर्शनी हा कायदा सोपा व सुटसुटीत करण्याचा सरकारचा मानस दिसतो.
Home
HomeSakal

नव्या भाडेनियंत्रण कायद्याचे एक आदर्श प्रारूप तयार करण्यात आले असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला नुकतीच मान्यता दिली. त्यातल्या तरतुदींची माहिती देतानाच या प्रस्तावित कायद्याची वैशिष्ट्ये विशद करणारा लेख...

केंद्र सरकारने प्रस्तावित भाडेनियंत्रण कायदा-२०२१चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. प्रथमदर्शनी हा कायदा सोपा व सुटसुटीत करण्याचा सरकारचा मानस दिसतो. सर्वांत आधीचा ‘मुंबई भाडेनियंत्रण कायदा’ हा बऱ्याचअंशी भाडेकरूंचे हित पाहणारा होता. कालांतराने घरमालक या कायद्याच्या जाचामुळे व आपली जागा पुन्हा मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे जागा भाड्याने देण्याएेवजी रिकाम्या ठेवू लागले. त्यामुळे राहण्याच्या जागेची निकड भासू लागली. याची दखल घेऊन राज्य सरकारांनी मूळ कायद्यात थोडेफार बदल करून ‘महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा’ मंजूर केला. जागा भाड्याने देण्याऐवजी ‘लिव्ह अँड लायसेन्स तत्त्वावर दिल्याने जागा परत मिळण्यासाठी सोपे नियम करून लायसेन्स तत्त्वावर जागा दिल्यास स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी होऊन जागा परत मिळण्याचे काम सोपे करण्याचा प्रयत्न केला. तो काही अंशी सफल झाला. आता, जवळ जवळ २० वर्षांच्या कालावधीनंतर या कायद्यात पुन्हा बदल करण्याचे केंद्र सरकारने प्रस्तावित केले आहे व त्याचा आदर्श नमुना प्रसिद्ध केला आहे. हा कायदा घरमालक व भाडेकरू या दोघांच्या दृष्टीनी सुसूत्र व त्यामानाने कमी कटकटीचा असून एकुणातच जागा भाड्याने देणे व त्यातून उत्पन्न कमावणे यासाठी प्रोत्साहन दिलेले दिसते. यातील ठळक तरतुदी खालीलप्रमाणे ....

  • यापुढे जागा भाड्याने द्यावायची असल्यास घरमालक व भाडेकरू यांच्यात लेखी करार अनिवार्य असेल.

  • असा करार हा भाडेनियंत्रण अधिकाऱ्याकडे नोंदविणे गरजेचे ठरेल व अशा जागेबाबत भाडे नियंत्रण अधिकारी त्यांच्या वेगळ्या संकेतस्थळावर त्याचे तपशील प्रसिद्ध करेल.

  • भाडेकरार हा ठराविक मुदतीकरता असू शकेल; म्हणजेच मुदतीनंतर घरमालक भाडेकरूंकडून जागेचा ताबा मागू शकतो व तो देणे भाडेकरूवर बंधनकारक असेल

  • घरमालक भाडेकरूकडून बाजारभावाने भाडे वसूल करू शकेल व त्यात वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी वाढ करू शकेल.

  • भाडेकरूने भाड्याने घेतलेली जागा घरमालकाच्या परवानगीने पोटभाड्याने देता येऊ शकेल; परंतु जागा पोटभाड्याने देण्यासाठी वेगळा पुरवणी करारनामा घरमालकाची सही, संमती घेऊन करावा लागेल.

  • जागा भाड्याने देताना राहण्याच्या जागेसाठी दोन महिन्याचे भाडे अनामत म्हणून घेता येईल व व्यावसायिक जागेसाठी सहा महिन्याचे भाडे अनामत म्हणून घेता येईल. ही अनामत रक्कम जागा सोडताना जागेच्या डागडुजीसाठी वापरता येईल.

  • काही कारणाने (पाऊस, वादळ इ. ) जागा जर वापरण्यायोग्य राहिली नसेल तर दिलेली अनामत रक्कम घरमालकाने परत करणे अनिवार्य आहे.

  • जुन्या कायद्याप्रमाणेच घरमालक भाडेकऱ्यांकडून विविध कारणांसाठी जागेचा ताबा मागू शकतो. ही कारणे विस्तृत असून जुन्या कायद्याप्रमाणेच आहेत. उदा. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे भाडे थकविणे, विनाकारण जागा विनावापर ठेवणे, जागेचे नुकसान करणे, घरमालकाला नवीन इमारत बांधण्यासाठी जागेची गरज असणे, घरमालकाला स्वतःच्या वापरासाठी जागेची गरज असणे इत्यादी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जागेच्या ताब्यासाठीचा अर्ज भाडेनियंत्रण अधिकारी / न्यायालय यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत आदेशित करणे अनिवार्य असेल. म्हणजेच सध्या अशा प्रकरणांना जो मोठा कालावधी लागतो, तो कमी करण्याचे प्रस्तावित आहे.

  • कायद्यात मोकळ्या जागेचा ताबादेखील घेण्यासाठी ठराविक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत व त्या अन्वये मोकळ्या जागेचे ताबे घेणे सोपे जाऊ शकेल

सदर कायद्यान्वये जुन्या कायद्यांतर्गत उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांचा विचार करून तरतुदी करण्यात आलेल्या आहेत व भाडेकरूने करार संपल्यानंतरही जागेचा ताबा दिला नाही तर पुढील दोन महिन्यांकरिता ठरलेल्या भाड्याच्या दुप्पट भाडे देणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे व त्यानंतरच्या कालावधीकरिता चौपट भाडे देणे बंधनकारक असेल. याचाच अर्थ कारणाशिवाय कोणत्याही भाडेकरूस जागा विनाकारण अडकवून ठेवता येणार नाही.

सदर कायद्याचा मसुदा हा आदर्शवत असला तरी सध्याच्या भाडेकरूंबाबत तरतूद केलेली दिसत नाही. अर्थात हा केंद्र सरकारचा आदर्श कायदा म्हणून मसुदा प्रसिद्ध केला असून त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे; परंतु प्रत्येक राज्याला सदरचा कायदा अंमलात आणण्यासाठी योग्य ते बदल करता येऊ शकतो व कायदा राज्यात लागू करण्याची तारीखही ठरविता येईल.

- ॲड. नितीन कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com