विकासाभिमुख शांततेला सुरुंग (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

दहशतवाद पोसणारा पाकिस्तान स्वतःही दहशतवादाच्या आगीत होरपळून निघत आहे. तरीही शेजारी देशांतील शांततेला नख लावण्याचे त्याचे उद्योग थांबत नाहीत, हे अनेकदा दिसून आले आहे. तेव्हा दहशतवादाच्या विषारी पाळेमुळांचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अफगाणिस्तानातील ही धगधग संपणार नाही.

दहशतवादामुळे धगधगत असलेल्या अफगाणिस्तानात विकासाच्या आणि पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे प्रयत्न "तालिबानी' आणि "इसिस' यांच्यासारख्या दहशतवादी संघटना सातत्याने करत आहेत. काबूलमध्ये बुधवारी झालेल्या कारबॉंबच्या स्फोटात 80 वर लोकांना जीव गमवावा लागला; साडेतीनशेवर जखमी झाले. भारत, जपान, जर्मनी यांच्यासह अनेक देशांचे दूतावास या स्फोटाने हादरले. भारतीय दूतावासापासून केवळ 100 मीटरवर हा स्फोट झाला, यावरून तो घडवणाऱ्यांच्या मनसुब्यांची कल्पना येते.

भौगोलिकदृष्ट्या मोक्‍याच्या जागी असलेल्या अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविण्यासाठी शीतयुद्धापासून प्रयत्न झाले. साधारण पंधरा वर्षांपूर्वी "तालिबान्यां'ची राजवट उलथवल्यानंतर शांतता नांदावी, अफगाणिस्तान विकासाच्या वाटेवर चालावा, या हेतूने ठोस पावले उचलली गेली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली "नाटो' फौजांनी त्यासाठी प्रयत्न केले. पण "तालिबानी' आणि "इसिस'चे विकासाशी वैर असल्याने त्यांनी तेथे विध्वंसच चालविला आहे. यावर्षीच्या जानेवारीपासून तेथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर नजर टाकली तरी शांततेच्या ठिकऱ्याच वरचेवर उडत असल्याचे निदर्शनाला येते.

गेली दीड दशक भारत अफगाणिस्तानाच्या फेरउभारणीसाठी आणि शाश्‍वत विकासासाठी सक्रिय आहे. भारताने आतापर्यंत दोन अब्ज डॉलरवर रक्कम खर्चून भरीव योगदान दिले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया ते शेतीविषयक आणि आरोग्यविषयक संशोधन, रस्तेबांधणी ते वीजवाहिन्या टाकणे अशा सर्व बाबतीत भारत अफगाणिस्तानला सहकार्य करत आहे. ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, नगरविकास यांच्यापासून ते लष्कराच्या आधुनिकीकरणापर्यंत सर्व आघाड्यांवर भारत अफगाण सरकारला तंत्रज्ञान, अनुभव, तज्ज्ञ यांच्या माध्यमातून मदत पुरवत आहे. भारताने अफगाण संसदेच्या इमारतीची उभारणीही करून दिलीे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे उद्‌घाटन केले, त्याच दिवशी अफगाणिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरले होते. अफगाणिस्तानच्या प्रगतीला असलेली भारताची साथ शेजारील पाकिस्तानला खुपत आहे. दहशतवाद पोसणारा पाकिस्तान स्वतःही दहशतवादाच्या आगीत होरपळून निघत आहे. तरीही शेजारी देशांतील शांततेला नख लावण्याचे त्याचे उद्योग थांबत नाहीत, हे अनेकदा दिसून आले आहे. आजही अफगाणिस्तानात लोकनियुक्त सरकार असले तरी एकतृतीयांश भूभागावर सरकारचे नियंत्रण नाही. तेव्हा दहशतवादाच्या विषारी पाळेमुळांचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अफगाणिस्तानातील ही धगधग संपणार नाही. त्याला विकासकामातून दिले जाणारे उत्तर दीर्घकालीन आणि शाश्‍वत परिणाम साधणारे असेल.

Web Title: Afghanistan blast article