नक्षलवादी हिंसेच्या विरोधात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

संपूर्ण देश नोटा बदलण्यासाठी रांगेत असताना नक्षलग्रस्त भागाला दिलासा देणारी एक बातमी आली आहे. आंध्र-प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपूर्वी 24 नक्षलवादविरोधी विशेष दलाने यमसदनी पाठविल्याच्या पार्श्‍वभूमीवर या बातमीचे मूल्य अधिकच वाढले आहे.

संपूर्ण देश नोटा बदलण्यासाठी रांगेत असताना नक्षलग्रस्त भागाला दिलासा देणारी एक बातमी आली आहे. आंध्र-प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपूर्वी 24 नक्षलवादविरोधी विशेष दलाने यमसदनी पाठविल्याच्या पार्श्‍वभूमीवर या बातमीचे मूल्य अधिकच वाढले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेल्या ताज्या अहवालात यावर्षी प्रथमच नक्षलग्रस्त भागातील हिंसेत नागरिकांपेक्षा नक्षलवादी अधिक मारले गेले असल्याची नोंद आहे. गेल्या नऊ वर्षांत असे प्रथम घडले. या वर्षात दोनशे कडव्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात विशेष दलांना विविध राज्यांमध्ये यश आले आहे, तर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसेत वा झडलेल्या चकमकीत 59 जवान हुतात्मा झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या नक्षलवाद्यांशी संघटितपणे लढण्याची रणनीती आणि नक्षलग्रस्त भागात विकास कामांच्या धोरणाचे हे फलीत मानले पाहिजे. त्यामुळेच वैचारिक बैठक हरवलेल्या आणि प्रमुख नेत्यांचा खातमा झाल्यामुळे जेरीस आलेल्या सशस्त्र नक्षलवादी चळवळीच्या अंताची सुरवात झाली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
विशेषतः दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी चळवळीचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर नक्षलवाद्यांचे मुख्यालय मानण्यात येत असलेल्या अबुझमाडवर "सर्जिकल स्ट्राइक'ची तयारीही सुरू झाली होती; परंतु या कारवाईत सैन्यदलांना न गुंतवता नक्षलवाद्यांवर चढाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. दहा राज्यांमधील शंभर जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या चळवळीमुळे पोलिस जवान हुतात्मा होण्याच्या घटनांमध्ये 34 टक्के घट झाली आहे; तर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात कायम भरडत जाणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूमध्ये 27 टक्के घट झाल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते.
आंध्र प्रदेशात "ग्रे हाउन्ड्‌स' या विशेष पथकाने नक्षलवाद्यांचा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटवण्याचा धडाका लावला आहे. वर उल्लेख करण्यात आलेल्या घटनेतील कारवाईही याच पथकाची आहे. या पथकाच्या "रडार'वर जंगलात लढणारे नक्षलवादीच नाहीत, तर त्यांचे वैचारिक म्होरकेही आहेत. केंद्राशी वाटाघाटीस तयारी दाखविणाऱ्या केंद्रीय समितीचा सचिव आझाद याला याच पथकाने उचलले. त्याआधी कोबाद घांगी यालाही असेच सापळा रचून पकडण्यात आले. आंध्र-प्रदेश आणि तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया जवळपास संपविण्यात या पथकाला यश आले आहे. म्हणूनच सगळीकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे सैरभैर झालेल्या नक्षलवादी चळवळीच्या अंताची सुरवात झाल्याचे मानण्यात येत आहे.

 

Web Title: against naxalite violence