ज्वारीला नवी झळाळी देण्याचा भगिरथ प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agri business Sorghum Food Processing Training Savita Jujgar farmer agriculture

ज्वारीला नवी झळाळी देण्याचा भगिरथ प्रयत्न

इंग्रजी अध्यापनाचा विषय असलेल्या सविता जुजगार यांनी फूड प्रोसेसिंगचे धडे वडिलांपासून घेतले. रयत संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केल्यावर देखील नोकरीच्या साचेबंद जीवनाच्या परिघाबाहेर जाण्याची त्यांची जिद्द होती.

त्यांनी सुरवातीला ज्वारीवर काम करण्यास सुरवात केली. ज्वारीवर प्रकिया करणारी एकूण ९ उत्पादने त्यांनी सुरु केली आहेत. ज्वारीपासून उपम्याचा रवा, डोसा रवा, इडली रवा, शिऱ्याचा रवा असे अनेक प्रकार त्यांनी सुरू केले असून ज्वारीपासून थालिपीठ, भाजणीचे पीठ देखील त्यांनी उत्पादित केले. नुकतेच त्यांनी ज्वारीचे पोहे देखील बाजारात आणले आहे.

- प्रकाश सनपूरकर, सोलापूर

सविता जुजगार यांचे माहेर माढा (जि. सोलापूर) येथील आहे. माहेरी असताना त्यांचे वडील सुनील शहाणे यांनी त्यांना फूड प्रोसेसिंग ट्रेनिंग करण्याची संधी त्यांना दिली. इंग्रजी अध्यापनाचा विषय असलेल्या सविता यांना फूड प्रोसेसिंगचा नवा धडा मिळाला.

त्यांचे पती हे खासगी नोकरीत असतात. रयत संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करत असताना नोकरीच्या साचेबंद जीवनाच्या परिघाबाहेर जाण्याची त्यांची जिद्द होती. काहीतरी वेगळे करायचे ही गोष्ट त्यांना शांत बसू देत नव्हती. तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाशी त्या जोडल्या गेल्या होत्या. स्वतंत्र व्यवसाय ही समाजात नवी ओळख देणारी ठरेल, हे त्यांच्या लक्षात आले होते.

त्यांनी सुरवातीला सॉससारख्या उत्पादनांचा अभ्यास केला. पण त्यांचा व त्यांचे पती प्रवीण यांचा पारंपरिक खाद्यसंस्कृतीवर प्रचंड विश्वास होता. आपण ज्वारीवरच काम करावे, यासाठी सविता जुजगार यांनी कामास सुरवात केली.

कोरोनाच्या काळात त्यांनी ज्वारी प्रक्रियेवर अभ्यास सुरु करुन लॉकडाउनच्या वेळेचा योग्य उपयोग केला. त्यांच्या या व्यवसायासाठी पतीसह सारे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी उभे राहिले. पण बॅंकेत कोणतेच आर्थिक व्यवहार नसल्याने कर्जाचा प्रश्न निर्माण झाला. केंद्राची अचानक ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजना निघाली. या योजनेला पूरक अशी ज्वारीची प्रक्रिया उत्पादने घेण्याचे त्यांनी ठरवले.

बॅंक अधिकाऱ्यांनी त्यांचा आत्मविश्वास, प्रोजेक्ट व कुटुंबाचे पाठबळ पाहून त्यांना ११ लाखाचे कर्ज मंजूर केले. ज्वारीवर प्रकिया करणारी एकूण ९ उत्पादने त्यांनी सुरु केली. उत्तमोत्तम पोषण मूल्य असणारी ज्वारी प्रक्रिया उत्पादने आरोग्यदायी ठरणारच या बाबत त्यांच्या मनात शंकाच नव्हती.

ज्वारीपासून उपम्याचा रवा, दोसा रवा, इडली रवा, शिऱ्याचा रवा असे अनेक प्रकार उत्पादित होऊ लागले. ज्वारीपासून त्यांनी थालिपीठ भाजणीचे पीठ उत्पादित केले. नुकतेच त्यांनी ज्वारीचे पोहे देखील बाजारात आणले.

मधुमेह नियंत्रणाबाबतची उत्पादने

यंदा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात त्यांच्या या उत्पादनांना मोठी झळाळी मिळाली आहे. त्यांची ज्वारीची उत्पादने पुण्यात देखील आता मिळू लागली आहेत. त्यांचे सासरे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्केटिंगच्या कामासाठी मदत करतात. आता सविता जुजगार यांनी डायबेटिक चॅलेंज या विषयावर संशोधनास सुरवात केली आहे. मिलेटचा वापर व मधुमेहावरील नियंत्रण याबाबत संशोधनावर आधारित उत्पादनाचे नवे परिणाम समोर आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.