पुन्हा आशावादाचे उड्डाण!

धैर्यशील वंडेकर(विमान वाहतूक तज्ज्ञ व विश्‍लेषक)
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

एअर इंडिया जणू काही ‘नॅशनल पंचिंग बॅग’ झाली होती. अर्थात, त्याला तशी कारणेही होती. ढिसाळ पद्धतीने केलेले इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाचे विलिनीकरण हे या कंपनीच्या खराब स्थितीचे मुख्य कारण आहे; पण अलीकडच्या काळात यात सकारात्मक बदल झाला. मात्र, काही दिवसांपूर्वीच, एक विक्रम एअर इंडियाने केला.

एअर इंडियाच्या भविष्याबद्दल जनमानसात पुन्हा आशा निर्माण करणारी घटना म्हणजे विलीनीकरणानंतर पहिल्यांदाच झालेली नफ्याची नोंद; परंतु तेवढ्यावर समाधान न मानता विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया म्हटले की प्रसार माध्यमे व विविध स्तरांतून टीकेची झोड उठत असे. एअर इंडिया जणू काही ‘नॅशनल पंचिंग बॅग’ झाली होती. अर्थात, त्याला तशी कारणेही होती. ढिसाळ पद्धतीने केलेले इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाचे विलिनीकरण हे या कंपनीच्या खराब स्थितीचे मुख्य कारण आहे; पण अलीकडच्या काळात यात सकारात्मक बदल झाला. मात्र, काही दिवसांपूर्वीच, एक विक्रम एअर इंडियाने केला. दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को (प्रशांत महासागरावरून) हे जगातील सर्वात लांब अंतराचे सलग उड्डाण सुरू करून एअर इंडियाने जगाला आपल्या क्षमतेची दखल घ्यावयास लावली. एअर इंडियाच्या भविष्याबद्दल पुन्हा आशा निर्माण करणारी घटना म्हणजे २००७ मधील विलीनीकरणानंतर पहिल्यांदाच गेल्या आर्थिक वर्षात कंपनीस १०५ कोटी रुपयांचा कार्यान्वयन नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) झाला. २०१५-१६ मधील महसूल २०५२६ कोटी रुपये हा त्याच्या मागील वर्षापेक्षा (२०६१३ कोटी) ०.४२ टक्‍क्‍यानी कमी होता, तरी तोटा २०१४-१५च्या तुलनेत दोन हजार कोटींने कमी, म्हणजेच ३८५७ कोटी रुपये एवढा झाला. अर्थात, तेलाच्या घसरलेल्या किमतींना याचे मोठे श्रेय जाते. २०१५-१६ मध्ये १.८ कोटी प्रवाशांनी एअर इंडियाने प्रवास केला. हा आकडा २०१४-१५च्या तुलनेत ६.६ टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

गेल्या काही वर्षांत एअर इंडियाच्या टर्न-अराउंड व बेलआउटसाठी केंद्र सरकारने ३० हजार कोटी रुपये हप्त्या-हप्त्याने देण्याचे मान्य केले होते. अर्थात, करदात्यांचा हा पैसा मिळण्यासाठी कंपनीने खर्चात कपात करणे, महसूल वाढविणे व एकंदरच कामगिरीत सुधारणा करून २०२१-२२ पर्यंत निव्वळ नफा कमविण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते; परंतु बेलआउट रकमेच्या सुमारे ५० टक्के रक्कम दिल्यानंतरही एअर इंडिया सुस्थितीत येण्याची चिन्हे नव्हती. यामुळे चिंतेत असलेल्या पंतप्रधान कार्यालयाने ऑगस्ट २०१५ मध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी न निवडता, अश्वनी लोहानी या रेल्वेसेवेतील अधिकाऱ्याची निवड केली. ‘आयटीडीसी’ व ‘मध्य प्रदेश टुरिझम’सारखे तोट्यातील उपक्रम बख्खळ नफ्यात आणण्याची कामगिरी लोहानी यांनी केली होती. विलीनीकरणातून निर्माण झालेले व अनेक वर्षांपासून प्रलंबित कर्मचाऱ्यांचे प्रश्न, वैमानिकांच्या पगारातील असमानता, विमानांची उपलब्धता वाढविणे, आंतरराष्ट्रीय व स्वदेशी बाजारपेठेत नवीन, स्पर्धात्मक उत्पादन उपलब्ध करून देणे, प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी लोहानी प्रभावी कार्यवाही करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या हितास व प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. परिणामत: कार्यसंस्कृती, कार्यक्षमता व कामगिरीत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. 

गेल्या वर्षी कार्यान्वयन तोटा होऊ न देण्याची स्तुत्य कामगिरी केली असली तरी लोहानी व एअर इंडियासमोर मोठी आव्हाने आहेत. गेल्या जून महिन्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सध्याच्या बदलत्या आर्थिक व स्पर्धात्मक वातावरणामुळे ‘एसबीआय कॅपिटल्स मार्केट्‌स’ला एअर इंडियाच्या टर्न-अराउंड आराखड्याचा आढावा घेण्यास सांगितले. त्यानंतर ‘एसबीआय कॅप्स’ने तेलाच्या किमतीतील मोठी घसरण, कंपनीची वाढलेली कार्यक्षमता व सेवेत रुजू होणारी नवीन विमाने या निकषांच्या आधारे एअर इंडियाचा निव्वळ नफा २०२१-२२ पर्यंत मिळवण्याचे उद्दिष्ट कमी करून ते २०१८-१९ पर्यंत निश्‍चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्याची मोठी जबाबदारी एअर इंडियावर आहे.

आजमितीस एअर इंडियावर ४६ हजार कोटींचे मोठे कर्ज आहे, ज्यात २८ हजार कोटी खेळत्या भांडवलासाठी घेतलेले कर्ज आहे. हे ओझे कमी करण्यासाठी कर्जाची फेररचना करण्याकरिता एअर इंडिया प्रयत्नशील आहे. एकोणीस सरकारी बॅंकांचा समूह दहा हजार कोटींचे कर्ज समभागात बदलण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ या कर्जाचा मोठा भाग संपादन करून दहा टक्के व्याजाच्या कर्जाचे रूपांतर सात टक्के व्याजाच्या कर्जात करण्याचे योजित आहे. या फेररचनेमुळे सध्या वार्षिक चार हजार कोटी असलेला व्याजाचा भुर्दंड कमी होऊन एक हजार कोटी होईल.एअर इंडियाच्या ताफ्यात सुमारे सव्वाशे विमाने आहेत. हा आकडा ताफ्यात सामील होणाऱ्या नवीन विमानागणिक वाढत आहे. एअर इंडिया ४८ देशांतर्गत व अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण व आग्नेय आशियातील ३६ शहरांना सेवा पुरवीत आहे. येत्या काही वर्षांत एअर इंडियाच्या ताफ्यात विविध पल्ल्याची १००-१२० विमाने सामील होणार असल्याचे समजते. यातून एअर इंडियाच्या विशेषतः आंतरराष्ट्रीय सेवेचा मोठा विस्तार अपेक्षित आहे. एअर इंडियाचा ६० टक्के महसूल हा आंतरराष्ट्रीय सेवेतून येतो. एअर इंडियाचे ‘आरोग्य’ सुधारण्यासाठी विमानांचे वेळेनुसार उड्डाण होणे, त्यांची उपलब्धता व उड्डाणाचे तास वाढवणे, प्रवाशांना चांगली सेवा मिळणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. एअर इंडियाच्या उपकंपन्यांची कामगिरीही या सगळ्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची. एअर इंडियाच्या पुनरुज्जीवनासाठी गंभीर असलेले, पाठबळ देणारे सरकार आणि धडाडी व व्यावसायिकतेने काम करणारे व्यवस्थापन, यामुळे येत्या काळात एअर इंडिया प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडेल अशी आशा आहे. एक मात्र नक्की की एवढे दिवस अधांतरी भविष्य असलेल्या एअर इंडियाला पुन्हा एकदा सुस्थितीत येण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. यापेक्षा मोठा सुयोग भविष्यात कदाचित पुन्हा येणे नाही.

Web Title: Air India business revival process started