यूथटॉक : तोलावा शब्द बोलण्यापूर्वी...

akshay raut
akshay raut

बोलण्याची कला ही किती प्रभावी शक्ती आहे, याचा प्रत्यय नेहेमीच येतो. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांतही वक्तृत्वाचा प्रभाव कसा पडतो, याची अनेकांना कल्पना आलीच असेल. पण चांगला वक्ता रातोरात तयार होत नाही. त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात, याची सगळ्यांना जाणीव नसते. चांगले लिहिणारी, खूप अभ्यास करणारी व्यक्ती लोकांशी संवाद साधताना प्रभाव पाडू शकेलच, असे नाही. त्यामुळेच उत्तम आशयाइतकेच चांगल्या मांडणीला महत्त्व असते. शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण हा काळ आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा असतो. मुळात माझा वक्ता म्हणून प्रवास सुरू झाला तो मित्राच्या आग्रहामुळे. माझी इच्छा नसतानाही त्यानं एका भाषण कौशल्य कार्यशाळेला मला नेलं. तेथे मी जो अनुभव घेतला, त्यातून मला वक्तृत्व गवसलं, अन्‌ सुरू झाला नवा प्रवास. आज मला या क्षेत्रानं नवी ओळख दिली आहे.

असं म्हटलं जातं, की ‘वक्ता दससहस्त्रेषु‘ म्हणजे वक्ता हा दहा हजार लोकांच्या पाठीवर जन्म घेत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक वक्ता दडलेला असतो, फक्त तो आपला आवाज बाहेर काढत नाही. पण असंही म्हटलं जातं, की जेव्हा माणूस बोलत नाही, तेव्हा तो मरण पावलेला असतो. अनेकांना वक्ता होण्याची इच्छा असते, पण त्यासाठी काही गुण असणं गरजेचं असतं. सर्वांत पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे, उत्तम श्रोता होणं. उत्तम श्रोताच उत्तम वक्ता होऊ शकतो. कारण ज्याचे कान समोरच्याचं ऐकून घेऊ शकतात, त्याच्याच जिभेत बोलण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. दुसरी बाब म्हणजे वाचन. सर्वस्पर्शी वाचन हे विचारांची भक्कम बैठक निर्माण करतं. उत्तम वाचन असल्याशिवाय वक्ता श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही. वाचन, मनन, चिंतनातूनच वक्‍त्याच्या ज्ञानाची उंची लक्षात येत असते. कारण, ‘अभ्यासोनी प्रकटावे...’

नंतरचा टप्पा येतो, तो म्हणजे मांडणी आणि नंतर देहबोली, डोळे व चेहऱ्यावरील हावभाव, श्रोत्यांकडे पाहून करण्यात येणारी शब्दफेक- ज्याच्या माध्यमातून वक्‍त्याला प्रतिसाद मिळतो. भाषण एकाच लयीत होत असेल, तर श्रोत्यांना ते कंटाळवाणं वाटू शकतं. त्यासाठी शब्दांची निवड महत्त्वाचीच, पण शब्द सादर करताना त्यानुसार आवाजातील चढ-उतार त्याला वेगळेपण देतात. ते श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेण्यास उपयुक्त ठरतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेमका कोणता विचार पोचवायचा आहे, तो सुस्पष्टपणे पोचायला हवा, याचं भान आवश्‍यक आहे. या सर्व बाबी आत्मसात केल्यानंतरच श्रोते आपल्याला स्वीकारतात.

जन्माला आलेल्या बाळाला आई-बाबा, आजी-आजोबा, ज्या गोष्टींच्या माध्यमातून शब्दातून संस्कारक्षम बनवत असतात, तोसुद्धा प्रबोधनाचाच एक भाग आहे. शाळेत होणारं ज्ञानदान हे वक्तृत्वाच्या मार्गानं विद्यार्थ्यांपर्यंत पोचवलं जातं. आणि मग अशी वेळ येते, की जेव्हा आपल्या भविष्याची वाट निवडण्याची आवश्‍यकता असते, तेव्हा विद्यार्थ्यांना करण्यात येणारं मार्गदर्शन हे त्यांना दिशा देण्याचं काम करतं. तो मार्गसुद्धा वक्तृत्वातूनच जात असतो.

तरुण पिढीचे पाय जमिनीवर राहावेत, त्यांनी मार्ग सोडून भटकू नये, म्हणून त्यांच्यावर विचारांचे संस्कार करून महापुरुषांना त्यांच्यामध्ये पेरण्याचे काम वक्तृत्व करीत असतं. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशात अनेक भाषा, प्रांत आणि त्यांचा आपापला प्रेरणादायी इतिहास आहे. अशा देशाबद्दल प्रत्येक नागरिकाला माहिती होण्याचे आणि देशाच्या प्रति आदरभाव आणि देशभक्ती निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे वक्तृत्व.  ज्याप्रमाणे वक्तृत्वामुळे अनेक गोष्टी साध्य होतात, सकारात्मक घडतात, त्याचप्रमाणं ते प्रसंगी उद्‌ध्वस्तदेखील करतं.म्हणून वक्तृत्वाला दुधारी तलवार म्हटलं गेलंय. याचं उदाहरण म्हणजे हिटलरच्या वक्तृत्वानं अनेक गोष्टी उद्‌ध्वस्त केल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भाषणांनी नेहमीच प्रेरणा दिली. देशाच्या, लोकशाहीच्या आणि संपूर्ण समाजाच्या उन्नतीचं शस्त्र आणि शास्त्र हे वक्तृत्व आहे आणि सदैव राहील. परंतु, त्याचा वापर संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे होणे गरजेचे आहे.
घासावा शब्द, तासावा शब्द,
तोलावा शब्द बोलण्यापूर्वी.
शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा
बेतावे शब्द शास्त्राधारे.
(लेखक अकोल्यातील वक्ते आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com