सत्ताकारणात राजदूताचा बळी ! 

विजय साळुंके 
सोमवार, 26 डिसेंबर 2016

ओसामा बिन लादनेला पाच वर्षे लपवून ठेवणारे पाकिस्तान अमेरिकेला व्यूहरचनेसाठी सोडवत नाही. संसदेवरील हल्ला विसरून भारत पाकिस्तानबरोबर आग्रा बैठक घेतो. याचा अर्थ जागतिक राजकारण नीती-नियम, मूल्यांवर क्वचितच चालते. ते चालते सोयी, फायद्या-तोट्याच्या गणितावर.

जागतिक राजकारण नीती-नियम, मूल्यांवर क्वचितच चालते. ते चालते सोयी, फायद्या-तोट्याच्या गणितावर. तुर्कस्तानातील रशियाच्या राजदूताच्या झालेल्या हत्येनंतर त्या देशाची प्रतिक्रिया हे त्याचेच निदर्शक आहे. 


सत्ताकारण हा मोठा निर्दयी खेळ असतो. सांडलेल्या रक्ताचे सहजी विस्मरण होऊन राजनैतिक व्यवहार पुढे जात असतो. अणुबॉंबचे हल्ले पचविणाऱ्या जपानची अमेरिकेशी भागीदारी होते. बेचिराख झालेले व्हिएतनाम अमेरिकेशी जुळवून घेते. महायुद्धात भिडलेले इंग्लंड आणि जर्मनी पुढे सहकारी होतात. ओसामा बिन लादनेला पाच वर्षे लपवून ठेवणारे पाकिस्तान अमेरिकेला व्यूहरचनेसाठी सोडवत नाही. संसदेवरील हल्ला विसरून भारत पाकिस्तानबरोबर आग्रा बैठक घेतो. याचा अर्थ जागतिक राजकारण नीती-नियम, मूल्यांवर क्वचितच चालते. ते चालते सोयी, फायद्या-तोट्याच्या गणितावर. व्यापक देशहिताच्या नावाने नवनवी समीकरणे आकार घेत असतात. जगभराच्या मानवी समाजातील मूल्यांना सत्तेच्या खेळात स्थान नसते. तुर्कस्तानातील रशियाच्या राजदूताच्या भरदिवसा झालेल्या हत्येनंतर त्या देशाच्या प्रतिक्रियेतून हीच बाब अधोरेखित झाली आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये तुर्कस्तानने रशियाचे लढाऊ विमान पाडले, तेव्हा अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तुर्कस्तानला धडा शिकविण्याची धमकी दिली; परंतु सीरियातील घडामोडींमुळे त्यांचा सूर बदलला. याचा अर्थ आपल्या राजदूताचा बळी देऊन रशियाला तुर्कस्तानचे सहकार्य हवे आहे. पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक यांनी अण्वस्त्रनिर्मिती थांबवायला नकार दिल्यानंतर अमेरिकेने विमान अपघात घडवून त्यांचा काटा काढला. त्यासाठी त्यांनी आपल्या राजदूताला राफेल (रॉबिन राफेल यांचे पती) झियांच्या विमानात बसविले होते. अशा उदाहरणांना तोटा नाही. प्रश् न उरतो तो हा, की अशा डावपेचांतून संबंधितांची उद्दिष्टे पूर्ण होतात? 

तुर्कस्तानातील रेसेप तय्यीप एर्दोगन यांची राजवट पाकिस्तानच्या मार्गाने चालताना दिसते. मुस्तफा कमाल अतातुर्क यांनी तुर्कस्तानची सूत्रे घेतली ती ऑटोमन साम्राज्य कोसळल्यानंतर. त्यांनी इस्लामची नाळ तोडून युरोपचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून देशाची उभारणी केली. त्यांच्या लष्कराची जडणघडण देश धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीतून बाहेर जाणार नाही अशीच झाली होती. एर्दोगन यांनी मुस्तफा कमाल यांची घालून दिलेली चौकट मोडून काढण्यासाठी ग्रामीण, निमशहरी जनतेत इस्लामी मूलतत्त्ववाद पेरला. लष्कर, पोलिस, न्यायपालिका, प्रशासनातील धर्मनिरपेक्षवादी शक्तींना शह देताना त्यांनी 15 जुलै 2016 च्या उठावाचा बनाव रचून हजारो विरोधकांना तुरुंगात डांबले. लष्कर, पोलिस दलातील अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. उठाव करणाऱ्यांना एर्दोगन यांचे विमान पाडणे शक् य असताना ते सुखरूप राजधानी अंकारात पोचले. यावरून उठावाचा बनाव उघड झाला. एकेकाळचे त्यांचेच सहकारी फेतुल्ला गुलेन यांच्यावर त्यांनी उठावाचा ठपका ठेवला. आता राजदूताच्या हत्येतही गुलेन यांचाच हात असल्याचा आरोप होत आहे. मारेकरी पोलिस हा एर्दोगन यांच्या सुरक्षा पथकात होता, तसेच राजदूताच्या हत्येनंतर त्याने दिलेल्या घोषणा त्याच्यावरील कट्टरपंथीयांशी नाते स्पष्ट करणाऱ्या होत्या. 

पाकिस्तानात पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तसीर यांची हत्या त्यांच्या शरीररक्षकानेच केली होती. हत्येनंतर त्याने दिलेल्या घोषणा आणि रशियन राजदूताच्या मारेकऱ्याने दिलेल्या घोषणा यात फारसा फरक नव्हता. पाकिस्तानप्रमाणेच तुर्कस्तानमध्येही सुरक्षा दलांमध्ये कट्टर इस्लाम खोलवर रुजल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. पाकिस्तानात लष्करी राजवटींनी जनतेच्या लोकशाही आकांक्षा दाबून टाकण्यासाठी इस्लामचा आधार घेतला. तुर्कस्तानात एर्दोगन त्याचेच अनुकरण करीत आपली पकड मजबूत करीत आहेत. पाकिस्तान आणि तुर्कस्तान हे दोन्ही देश अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या लष्करी आघाड्यातील सहकारी आहेत. तुर्कस्तान तर आजही 'नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी' (नाटो) या लष्करी आघाडीचा घटक आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील सोव्हिएत फौजांविरुद्धच्या अमेरिकी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावीत मोठी किंमत वसूल केली होती. त्याचेच अनुकरण करीत एर्दोगन यांनी तुर्कस्तानला युरोपीय संघात प्रवेशाचा आग्रह धरला होता.

इराक व सीरियातील यादवी व 'इस्लामिक स्टेट'च्या लढाईत पक्षपाती व वादग्रस्त भूमिका बजावूनही एर्दोगन निर्वासितांच्या लोंढ्याद्वारे आपले उद्दिष्ट गाठू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी युरोपीय संघाला ब्लॅकमेल करून अब्जावधी डॉलर मिळविले. पश् चिम आशियातील निर्वासितांच्या आडून गेलेल्या इस्लामी कट्टरतावाद्यांनी फ्रान्स, बेल्जियम, जर्मनीत दहशतवादी कृत्ये केल्यानंतर युरोपीय संघाचे डोळे उघडले.

तुर्कस्तानचा डाव ओळखल्यानंतर एर्दोगन यांच्या अटी धुडकावण्यात आल्या. 
सीरियातील बशर अल् असद राजवट उलथून टाकण्याच्या अमेरिका, सौदी अरेबियाच्या मोहिमेत तुर्कस्तानही सामील होते. परंतु सीरियाच्या बाजूने रशिया उतरल्यानंतर ही मोहीम फसली. सीरिया, इराक, इराण व तुर्कस्तानच्या सीमावर्ती भागातील कुर्दांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा होता.

अलेप्पो शहर वाचविण्यात रशिया, इराण, सीरियाला यश येत आहे हे पाहिल्यावर एर्दोगन यांनी रशियाशी समझोता करून कुर्द टापू वाचविण्याचा डाव खेळला. अमेरिकेच्या गोटातून तुर्कस्तान अलग होणे रशियाच्या हिताचे होते. त्यामुळेच आपले विमान गमावल्यानंतरही पुतिन यांनी एर्दोगन यांना मॉस्कोला पाचारण करून तडजोड केली. अफगाणिस्तानातील 'तालिबान' हे हुकमाचे अस्त्र गमावण्यास तयार नसलेल्या पाकिस्तानने रशिया-चीनबरोबर नव्या भागीदारीच्या शक् यता अजमावण्यास सुरवात केली. त्याच धर्तीवर, एर्दोगन यांनी रशिया-चीन व मध्य आशियातील मुस्लिम देशांच्या 'शांघाय सहकार्य संघटने'त स्थान मिळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

पश्चिम आशियातील सत्ता समतोलातील अमेरिकेच्या वर्चस्वाला तडा देण्याच्या कामी रशिया-इराणला तुर्कस्तानची मदत होत असेल, तर पुतिन आपल्या राजदूताच्या हत्येची घटना विसरायला तयार आहेत. अंकारात रशियन राजदूताची हत्या व नंतर अमेरिकी वकिलातीवरील गोळीबाराच्या घटनेनंतर इस्लामी कट्टरतावादी कोणत्याही थराला जाऊ शकतील आणि त्यावर एर्दोगन यांचे नियंत्रण राहू शकणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या चौकटी, त्यांच्या डावपेचांच्या कक्षा केव्हाही ओलांडून मूलतत्त्ववादी हिंसा, हत्या करण्यास तत्पर असतात. बाभळीचे बी पेरल्यावर काटेरी झाडच उगवणार. 
 

Web Title: ambassador victimised for power game