अग्रलेख : अमेरिकी ट्रम्पकार्ड

Donald_Trump_
Donald_Trump_

अमेरिकेत अनेकदा वादळे येतात. त्यातील काही सुरवातीला भीतिदायक वाटली तरी नंतर ओसरतात; पण काही पुढे पुढे सरकत नंतर भयंकर रूप धारण करतात. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या राजकीय वादळाच्या बाबतीत असेच काहीसे घडले असून, भल्याभल्यांना त्याने तडाखे दिले आहेत. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या लढाईत जनभावनांना हात घालत त्यांनी थेट "व्हाइट हाउस' गाठले आहे. या निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी इतिहास घडणारच होता. फक्त त्यांच्या स्वरूपात मोठी तफावत होती. हिलरी क्‍लिंटन निवडून आल्या असत्या तर एक महिला प्रथमच अमेरिकी महासत्तेच्या अध्यक्षपदी विराजमान झाली असती आणि डोनाल्ड ट्रम्प आले तर वॉशिंग्टनकेंद्रित, पारंपरिक राजकारणाला धक्का बसणार होता. तेथील राजकीय परिभाषाच बदलणार होती. एकाची हार अन्‌ दुसऱ्याची जीत एवढ्यापुरता बदल मर्यादित न राहता खेळाचे नियमच बदलताहेत की काय, अशी भीती निर्माण होणार होती. बहुसंख्य अमेरिकी मतदारांनी या दुसऱ्या प्रकारच्या इतिहासाच्या बाजूने कौल देत जगभरातील लोकशाहीप्रेमींच्या मनात धडकी भरविली आहे. स्पष्ट भूमिका घेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने उभी राहिलेली वृत्तपत्रे, अन्य प्रसारमाध्यमे, त्याचबरोबर राजकीय पंडित आणि अंदाजपटूंनाही सपशेल भुईसपाट करून ट्रम्प यांनी ही निवडणूक अक्षरशः खिशात घातली. ट्रम्प यांचा सगळा प्रचारच "पोलिटिकली इनकरेक्‍ट' या सूत्रावर आधारलेला होता. प्रशासनाचा सोडाच; परंतु राजकारणाचाही अनुभव गाठीशी नसताना एक उद्योगपती पाहता पाहता रिपब्लिकन पक्षातल्या मुरब्बी नेत्यांना मागे टाकत उमेदवारी हासील करतो काय, अध्यक्षपदाच्या कोणत्याही उमेदवाराने वापरली नसेल, अशी भाषा प्रचारात वापरतो काय आणि स्थलांतरितांविषयीच्या स्थानिकांच्या रोषाचा फायदा उठवत जनभावनांच्या लाटेवर स्वार होतो काय.... अमेरिकी राजकारणात हे सारेच धक्कादायक होते. त्यामुळेच अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्याच दृष्टीने ट्रम्प यांच्या विजयाची कारणे शोधणे, त्यांचा अर्थ लावणे ही महत्त्वाची बाब.
खरे म्हणजे अमेरिकेला "मेल्टिंग पॉट' म्हटले जाते. युरोप, दक्षिण अमेरिकेतूनच नव्हे, तर जगाच्या सर्वच भागांतून प्रगतीची, समृद्धीची स्वप्ने पाहात लोक तेथे गेले आणि कष्टाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर ही स्वप्ने साकार करण्यास त्यांना पूर्ण अवसर मिळाला. तसा तो मिळणे हीच तर अमेरिकेची ओळख बनली. तिच्यात बाकीच्या वांशिक, सांप्रदायिक, भाषिक अस्मिता गोठून जात. अलीकडच्या काही वर्षांत परिस्थिती हळुहळु बदलली; विशेषतः आर्थिक मंदीच्या अरिष्टानंतर. जेव्हा आर्थिक प्रश्‍न तीव्र बनायला लागतात, तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एकतर लांब पल्ल्याची दृष्टी असावी लागते आणि प्रश्‍न सोडविण्याचा कार्यक्रम तयार करावा लागतो. ती कुवत नसेल तर सोपी कारणे शोधली जातात. खरे- खोटे शत्रू उभे केले जातात आणि त्यांच्यावर मात करण्याचा आवेशही निर्माण केला जातो. ट्रम्प यांनी नेमके तेच केले आणि रोजगार आक्रसल्याने अस्वस्थ असलेल्या अमेरिकेच्या अंतर्भागातील स्थानिक गोऱ्या नागरिकांना भुरळ घातली. त्यांच्या मनातील खदखद थेट चव्हाट्यावर आणली. अमेरिकेच्या मध्य भागातील या राज्यांनी ट्रम्प यांना भरभरून मतांचे दान टाकलेले दिसते. मेक्‍सिकन, स्पॅनिश, चिनी, लॅटिनो, आफ्रिकी अमेरिकन आदी स्थलांतरितांचा ओघ अमेरिकेत अखंड चालू असतो. तेथे अनेक प्रकारची कामे ते करतात. त्यांच्यामुळेच "स्थानिका'ंची संधी हिरावली जाते, असे समीकरण मांडून ट्रम्प यांनी बेफाम भाषणे केली. इस्लामी दहशतवादाविरुद्ध बोलताना सरसकट मुस्लिम समाजाला लक्ष्य केले. वास्तविक डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता प्रचाराचा "अजेंडा' त्यांनी ठरवायला हवा होता. त्यांच्याकडून मतदारांना उत्साहवर्धक असा मेसेज मिळणे आवश्‍यक होते. तसा तो मिळाला नाही. उलट त्याऐवजी ट्रम्प यांच्या जाळ्यात त्या अडकल्या. त्यांच्या बाष्कळपणाला त्या प्रतिक्रिया देत राहिल्या. शिवाय सलग आठ वर्षे बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक पक्षाने सत्ता उपभोगली आहे. लोकांना बदल हवा होता आणि बदलांचा पुरस्कर्ता कोण आहे, याला त्यांनी फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही; पण तरीही आशा सोडण्याचे कारण नाही. सत्तेमुळे शहाणपण येऊ शकते, असे म्हणतात. "कॅन्व्हासिंग बाय पोएट्री अँड गव्हर्निंग बाय प्रोज' ( प्रचारात कवित्वावर भर असला तरी कारभारात "गद्य'च महत्त्वाचे असते) या वचनातील मर्म ट्रम्प हे ओळखतील आणि चांगल्या सल्लागारांची नेमणूक करून अमेरिकी अध्यक्षपदाच्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीला न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या कारभाराचे परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे, तर जगावरच होणार आहेत. साम्राज्यवादी अहंकार, युद्धखोरीचे धोरण यामुळेच रिपब्लिकन पक्षाने सत्ता यापूर्वी गमावली होती, याचे भान त्यांना विसरून चालणार नाही. एरवी बोले तैसा चाले, असे आपण म्हणतो. ट्रम्प यांच्या बाबतीत जगभरातील अनेक जण ते बोलल्याप्रमाणे न चालतील तर बरे, अशीच प्रार्थना करीत असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com