पायातले साप अन्‌ बिळातला नागोबा! 

प्रकाश अकोलकर 
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

भाजप सध्या शिवसेनेला हवं तसं नाचवत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र "टोकाचा निर्णय घ्यायची वेळ आणू नका!' हेच पालुपद आळवत आहेत. उद्धव हे टोकाचा निर्णय घेण्यास योग्य वेळेची वाट बघत आहेत; पण ही योग्य वेळ नेमकी येणार तरी कधी? 

भाजप सध्या शिवसेनेला हवं तसं नाचवत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र "टोकाचा निर्णय घ्यायची वेळ आणू नका!' हेच पालुपद आळवत आहेत. उद्धव हे टोकाचा निर्णय घेण्यास योग्य वेळेची वाट बघत आहेत; पण ही योग्य वेळ नेमकी येणार तरी कधी? 

तिकडे महाराष्ट्रदेशापासून दूरवरच्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेच्या खासदारांना "वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?' असा तिखट सवाल करत असतानाच इकडे भारतीय जनता पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे मुंबईत थेट राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज' या निवासस्थानी आरामात गप्पांमध्ये रंगून गेले होते! खरं तर त्या आधीच्या काही दिवसांत भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि शिवसेनेचे कडवे टीकाकार आशिष शेलार हे "कृष्णकुंज'च्या वाऱ्या करत होतेच. हे सारं नेमकं काय चाललं आहे, असा सवाल शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील एका ज्येष्ठ नेत्याला केल्यावर त्याचं उत्तर होतं : "आमच्या पायात साप सोडायची भाजपची ही चाल जुनीच आहे!' 

आता प्रश्‍न पडला "पायात साप सोडणे' म्हणजे नेमके काय? तर त्या प्रश्‍नाचं उत्तरही बरीच शोधाशोध केल्यावर मिळालं! पायात साप आल्यावर साहजिकच मनुष्य नाचायला लागतो. त्यानंतर लक्षात आलं की भाजप सध्या शिवसेनेला हवं तसं नाचवत आहे! -आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र सतराशे त्रेपन्नाव्यांदा "टोकाचा निर्णय घ्यायची वेळ आणू नका!' हेच पालुपद आळवत आहेत. हेच वाक्‍य उद्धव यांनी 19 जून 2016 रोजी शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्यात उच्चारलं होतं आणि तेव्हापासून दर दोन-चार दिवसांनी ते हेच वाक्‍य शिवसैनिकांना ऐकवत आहेत. आता अधिक तपशिलात गेलं तर ते असंही सांगू शकतात की गडकरी जसे "कृष्णकुंज'वर गेले होते; तसेच ते "मातोश्री'वरही आले होते आणि "गेले होते, तसेच आले होते' तेही कोणत्या राजकीय चर्चेसाठी नव्हे; तर घरातल्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी आले होते. आता लग्नाच्या निमंत्रणात कधी राजकीय चर्चा होऊ शकते काय, असा सवालही उद्धव विचारू शकतातच. त्यांना तो अधिकार आहेच! मात्र, अशाच बहाण्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येत गेला आहे, ही बाब उद्धव विसरले असले तरी महाराष्ट्रदेशीची जनता मात्र विसरलेली नाही. मुळात अशा प्रकारे शिवसेनेच्या पायात साप सोडण्याची खेळी भाजप लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशापासून सातत्यानं करत आला आहे आणि पायात साप आले रे आले की उद्धव "टोकाचा निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका!' हेच पालूपद आळवताना आपण रोजच्या रोज बघत आहोत. 

मग, उद्धव आता त्यांना जो काही टोकाचा निर्णय घ्यायचा असेल तो घेणार तरी केव्हा? 
नोटबंदीनंतर सर्वसामान्य माणूस, तसंच शिवसेनेचा हक्‍काचा मतदार असलेल्या मध्यमवर्ग यांची जी काही ससेहोलपट सुरू आहे, ती बघता टोकाचा निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, हे उद्धवदेखील जाणून आहेत. सुरवातीला त्यांनी तशी काही पावलं उचललीही होती. ममता बॅनर्जी यांनी संसद भवनापासून राष्ट्रपती भवनावर देशातील आम आदमीची बाजू घेऊन जी चाल केली, त्यात सहभागी होणे हे त्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल होतं. मात्र, त्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांचा एक दूरध्वनी येताच शिवसेनेनं आपला घोडा अडीच घरं मागे घेतला. आता राजनाथ आणि उद्धव यांच्यात नेमकं संभाषण काय झालं असेल, हे शाखेवर नियमानं जाणारा कोणीही शिवसैनिक अगदी सहज सांगू शकतो! त्यामुळेच मोदी आणि त्यांचा नोटाबंदीचा निर्णय याचं आडून आडून का होईना समर्थन पक्षप्रमुखांनी सुरू केल्यावर राज्यभरातील, तसंच मुंबईतील शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेची सुरवात ही मुंबई महापालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाली, तेव्हापासूनच सुरू झाली होती. मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांपैकी पंचाहत्तरच्या आसपास वॉर्ड असे आहेत की त्यात मराठी माणसाचं बहुमत आहे. प्रभाग पुनर्रचना झाल्यावर ही संख्या आता जेमतेम 58 वर येऊन ठेपल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच मुंबई महापालिकेवर एकहाती किंवा भाजपच्या भाषेत "शतप्रतिशत' कब्जा करण्याचं काम आता भाजपच्या दृष्टीनं अगदीच सुकर होऊन गेलंय. त्यामुळे या मराठीबहुल 58 वॉर्डांमध्येही शिवसेनेच्या पायात साप सोडण्यासाठी तर शेलार असोत की गडकरी हे "कृष्णकुंज'वर जात नसतील ना? 
या बिनतोड प्रश्‍नाचं उत्तरही एक उद्धव वगळता बाकी सर्वांना स्पष्ट दिसत आहे. या 58 मराठीबहुल वॉर्डांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छुपं बळ द्यायचं आणि तेथून शिवसेनेचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून डावपेच आखायचे, अशी रणनीती भाजप आखत असल्याची शिवसैनिकांची "मन की बात' आहे! राज ठाकरे यांनी गेल्या शनिवारीच नोटाबंदीच्या निर्णयावरून भाजप, तसंच मोदी यांच्यावर तोफा डागल्या, तोही याच रणनीतीचा एक भाग असू शकतो. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे विरोधात लढणार, असंही म्हणता येऊ शकतं. मात्र, अद्याप या निवडणुकीला किमान चार महिने बाकी आहेत. तोपावेतो मोदी आणि अमित शहा आणखी असे किती साप शिवसेनेच्या पायात सोडणार आहेत, ते बघावं लागणार आहे. 

तरीही उद्धव हे टोकाचा निर्णय घेण्यास योग्य त्या वेळेची वाट बघत आहेत. ही योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे? की शिवसैनिक आपसात जो प्रश्‍न विचारताहेत ती वेळ आल्यानंतरच उद्धव तो टोकाचा निर्णय घेतील? शिवसैनिक आपसात विचारत असलेला प्रश्‍न आहे : "आपल्याला मंत्रिमंडळातून हाकलून देईपर्यंत साहेब वाट बघणार आहेत काय?' शिवसैनिकांच्या मनात खरं तर एकच प्रश्‍न आहे आणि तो म्हणजे "मोदी वा अमित शहा यांनी जरा डोळे वटारताच शिवसेनेचा एरव्ही कायम फणा काढणारा नागोबा बिळात जाऊन का बसतो?' 

आता या प्रश्‍नाचं उत्तर खरं तर फक्‍त उद्धव ठाकरे हेच देऊ शकतात. कदाचित, त्यासाठी योग्य वेळ अद्याप आलेली नसावी! 

Web Title: analysis of bjp shivsena politics