संस्कार झुणका-भाकरीचा (पहाटपावलं)

आनंद अंतरकर 
सोमवार, 24 एप्रिल 2017

"झुणका-भाकर' (किंवा पिठलं-भाकरी) हा काही केवळ माझ्या रसनेवर झालेला संस्कार नव्हे, तर माझ्या समग्र जीवनधारणेवरचाच एक बहुमोल संस्कार. मुंबईतल्या आमच्या गोरेगावकर चाळींनी बाल वयात आम्हाला कितीतरी गोष्टी कळत-नकळत शिकवल्या. नुसत्या आठवणींनी नतमस्तक व्हावं

"झुणका-भाकर' (किंवा पिठलं-भाकरी) हा काही केवळ माझ्या रसनेवर झालेला संस्कार नव्हे, तर माझ्या समग्र जीवनधारणेवरचाच एक बहुमोल संस्कार. मुंबईतल्या आमच्या गोरेगावकर चाळींनी बाल वयात आम्हाला कितीतरी गोष्टी कळत-नकळत शिकवल्या. नुसत्या आठवणींनी नतमस्तक व्हावं, अशी उत्तुंग कर्तृत्ववान माणसं सदोदित भोवती वावरत असायची. त्यापैकी दोन म्हणजे सेनापती बापट आणि अनंत हरी गद्रे. स्वतः हातात उंच झाडू घेऊन, चाळीतल्या स्वयंसेवकांसमवेत सेनापती बापट चाळीतली साफसफाई करीत. सार्वजनिक स्वच्छता हा त्यांचा गुण त्या काळात विशेष लक्षवेधी होता. अ. ह. गद्रे यांना समाजानंच "समतानंद' ही उपाधी बहाल केलेली होती. "झुणका-भाकर सत्यनारायण' ही त्यांनी सुरू केलेली एक कल्पक समाजवादी चळवळ. कल्पना अगदी साधी. चाळींमधल्या (आणि बाहेरच्याही) अनेकविध जाती जमातींच्या निम्नस्तरीय माणसांनीही जात-पात-धर्म विसरून "माणूस' नावाच्या झेंड्याखाली एकत्र यावं, मिळून काम करावं, हाच त्यामागचा उदात्त उद्देश. गद्य्रांच्या या परंपरेला मानवतेचं मोठं अधिष्ठान होतं. मराठा, ब्राह्मण, कुळवाडी, कोळी अशा बहुजातीय मंडळी या निमित्ताने एकत्र जमायची. वर्षातून तीन- चार वेळा तरी हा "झुणका-भाकर'चा कार्यक्रम व्हायचा. म्हटलं तर अखिल गोरगरिबांचा अस्सल देशी आहार. म्हटलं तर साध्यासोप्या नि गरजेपुरत्या आहाराचं प्रतीक. म्हटलं तर समाजसमन्वयक. उच्चनीचतेच्या भ्रामक समजुतीचं उच्चाटन करणारी एक आचारशील परंपरा. 
कुणीतरी मित्र बातमी आणायचा, आज रात्री "झु.भा. सत्यनारायण' आहे. मग घरी जेवण झालेलं असलं, तरी आम्ही सहाव्या चाळीकडे धूम ठोकायचो. चाळीचं पटांगण. तिथं लहानथोर माणसांची गर्दी जमलेली. एका ओळीतली लांबलचक रांग जमिनीवर बसलेली. "समतानंद' स्वतः प्रसाद वाटत आहेत. भाकरीचा निमकोर तुकडा आणि तीवर खमंग झुणक्‍याचा गोळा. अतिशय रुचकर आणि चविष्ट... 
अशा रीतीनं झुणका-भाकरीचा जीवनात प्रवेश झाला, आणि मग ती कायमचीच तिथं ठाण मांडून बसलेली. 

गदिमांच्या माडगूळची आठवण. आमचा तिथं मुक्काम होता. गदिमांचे कनिष्ठ बंधू श्‍यामकाका आणि सौ. कालिंदी काकू यांची आतिथ्यशील वागणूक. गोष्टी वेल्हाळ आणि रांगड्या टिपेच्या स्वरातले श्‍यामकाकांचे ग्रामीण किस्से... अण्णांच्या ह्रद्य आठवणींचा पाझर... माडगुळच्या काळ्या कसदार मातीचा गोचर गंध... त्यात तात्यांच्या ग्रामीण शैलीचा, वळवाच्या सरींनंतरचा मृद्‌गंध मिसळलेला.... 

दिवसा रखरखीत ऊन आणि रात्री शितल चांदणं लपेटून राहणाऱ्या तक्रारविहीन, संन्यस्त बोरी-बाभळी... कालिंदीकाकूंना अन्नपूर्णेचे हात लाभलेले. एका दुपारी त्यांनी रांधलेल्या भोजनाचा आस्वाद घेता आला. घट्ट पिठलं, ज्वारीची भाकरी आणि हिरवा ठेचा. आज इतकी वर्षं झाली, तरी इंजिनच्या मळ्यातल्या बांधावरती ती वत्सल सय अजून मनातून जात नाही... 

दिवेआगर ही आमच्या मित्राची सासूरवाडी. एकदा रात्रीतून पुण्याकडे येत असताना त्यांच्या सासूबाईंनी बरोबर शिदोरी दिली होती. तांदळाच्या भाकऱ्या, झुणका आणि डाळिंबाची उसळ. रात्री अकराच्या सुमारास चांदण्यातल्या वरंधाघाटात बसून, त्या सासूमाउलीच्या परिसस्पर्शाची घेतलेली ती चव... त्या चवीचं काय वर्णन करणार?... 
महाबळेश्‍वरच्या "हिरकणी'त आणि "आनंदवना'तही अनेकदा पिठलं-भाकरीचे स्वादमग्न क्षण अनुभवले. 

पण मनातलं सांगायचं, तर "समतानंद'च्या संस्कारी झुणका-भाकरीची चव आयुष्यभर जिभेवर रेंगाळत राहिली आहे.  
 

Web Title: anand anterkar write pahatpawal