राजधानी दिल्ली : बिहारमधील बहुरंगी समीकरणे 

राजधानी दिल्ली : बिहारमधील बहुरंगी समीकरणे 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत विविध समीकरणे आणि बहुरंगी चित्रे आकाराला येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक एकतर्फी वाटत असली, तरी निकालानंतर सध्याची समीकरणे कायम राहतील की नवी तयार होतील, याविषयी उत्सुकता आहे.

घटना एक असते; पण तिचे अन्वयार्थ अनेक असतात. बिहारमधील विधानसभा निवडणुकीबाबत अशीच स्थिती आहे. वरवर दिसायला ही निवडणूक सरळ व स्पष्ट दिसते. त्यानुसार नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी मजबूत स्थितीत असून, विरोधी पक्षांमध्ये निर्नायकीमुळे येणारी दुर्बलता दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीचा संभाव्य निकाल हा नितीशकुमार यांच्या बाजूने झुकलेला दिसतो असे चित्र आहे. हा चित्राचा दृश्‍य भाग झाला. त्याच्या पलीकडे बिहारच्या निवडणुकीत काही असू शकेल काय?कारण दिसणारे राजकारण आणि न दिसणाऱ्या राजकीय प्रक्रिया निवडणुकीवर परिणाम करीत असतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी भाजपची दीर्घ सोबत सोडून आपले मुख्य प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर हातमिळवणी केली होती. काही काळानंतर त्यांनी मध्येच लालूप्रसाद यांच्याबरोबरचा समझोता तोडला आणि चोवीस तासांत पुन्हा भाजपबरोबर आघाडी सरकार स्थापन केले. आता ते भाजपच्या साथीने निवडणूक लढवीत आहेत. भाजपने बिहारमधील त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. बिहारपुरते बोलायचे झाल्यास आताच्या परिस्थितीत नितीशकुमार यांच्याएवढा मोठा नेता अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही. रामविलास पासवान हे निवडणुकीच्या ऐन तोंडावर काळाच्या पडद्याआड गेले. लालूप्रसाद हे जेलबंद आहेत. भाजपकडे नितीशकुमार यांच्या उंचीचा स्थानिक नेता नाही. त्यामुळे नेतृत्वाच्या पातळीवर नितीशकुमार यांचे पारडे जडच आहे. हा सामना विषम आहे काय ? या प्रश्‍नाच्या उत्तरातून बिहारची विविध राजकीय चित्रे साकार होऊ लागतात.

लालूप्रसादांच्या प्रभावाची कसोटी
बिहारमधील (आणि उत्तर प्रदेशाच्याही) गेल्या तीन दशकांच्या राजकारणावर सामाजिक न्यायाच्या शक्तींचा वरचष्मा दिसून आला आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आणीबाणीविरोधी आंदोलनातून समाजवादी विचारांचा पगडा असलेले जे तरुण नेते राजकारणात उदयाला आले त्यात रामविलास पासवान, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे प्रमुख होते. पासवान हे दलित समाजाचे, तर लालूप्रसाद व नितीशकुमार हे ‘ओबीसी’ समाजाचे प्रतिनिधित्व करीत. विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्या काळात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर उत्तर भारतात सामाजिक न्यायावर आधारित राजकारणाने आघाडी घेतली आणि या तिघाही नेत्यांना राष्ट्रीय प्रतिमा प्राप्त झाली. लालूप्रसाद व नितीशकुमार यांच्यामागे ‘ओबीसी’ जनाधाराचे बळ व्यापक होते. नितीशकुमार यांचा कुर्मी समाज केवळ तीन- चार टक्के असला, तरी त्याच्याशी समान असलेल्या इतर समाजांना नितीशकुमार हे इतर कुणाहीपेक्षा जवळचे वाटणे स्वाभाविक होते. लालूप्रसाद यांच्याकडे दहा टक्‍क्‍यांच्या आसपास असलेल्या यादव समाजाचा भरभक्कम जनाधार आहे. अयोध्या प्रकरणात त्यांनी भाजपनेते लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा अडवून व त्यांना अटक करून मुस्लिम समाजात स्वतःची अढळ प्रतिमा निर्माण केली. आजही कमीअधिक प्रमाणात ती कायम आहे. त्यातूनच त्यांचे ‘एमवाय’-‘मुस्लिम-यादव’ हे विजयी समीकरण तयार झाले. लालूप्रसाद जेलबंद असले तरी त्यांची या समाजांवरील पकड कायम आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे हे समीकरण टिकते काय आणि त्याचा लाभ त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मिळणार काय हे पाहावे लागेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 चिराग यांच्या भूमिकेने चुरस
‘महागठबंधन’ म्हणजे लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्‍सवादी-लेनिनवादी पक्ष यांची आघाडी आहे. या आघाडीतून उपेंद्र कुशवाह (राष्ट्रीय लोक समता पार्टी) व जितनराम मांझी (हिंदुस्तानी आवाम मोर्चा) व मुकेश साहनी यांचा लहानसा पक्ष बाहेर पडून नितीशकुमार-भाजप आघाडीला जाऊन मिळाले आहेत. कुशवाह यांनी बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी करून आणखी वेगळी चूल थाटली आहे. मांझी हे नितीशकुमार यांच्याबरोबर आहेत व त्यांना नितीशकुमार यांच्या कोट्यातून जागा देण्यात येणार आहेत. आता यामध्ये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाची स्थिती वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. या पक्षाने नितीशकुमार यांचे नेतृत्व झुगारले आहे, पण भाजपबरोबर त्यांची आघाडी कायम आहे. त्यामुळे भाजपला बिहारमध्ये दुहेरी भूमिकेत वावरावे लागत आहे. एकीकडे नितीशकुमार, तर दुसरीकडे पासवान यांचा पक्ष यांच्या कात्रीत हा राष्ट्रीय पक्ष आहे. रामविलास यांच्या निधनापूर्वी ते अंथरुणाला खिळलेले असतानाच त्यांचे चिरंजीव चिराग यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली आहेत. त्यांची अपरिपक्वता आणि अननुभव यामुळे भाजपच्या धूर्त नेतृत्वाला त्यांना हाताळणे फारसे अवघड जाणार नाही. उलट भाजपने ते ज्यांना उमेदवारी देऊ शकत नव्हते, अशा असंतुष्टांना या पक्षाकडे पाठवून त्यांना उमेदवारी देण्याचे सत्र सुरू केले आहे. बिहार भाजपच्या उपाध्यक्षांनीही पासवान यांच्या पक्षात प्रवेश केला यावरून ही बाब लक्षात यावी. 

हे सर्व वेगवेगळे राजकीय रंग बिहारच्या निवडणूक पटलावर टाकल्यानंतर निर्माण होणारी चित्रेही विविध प्रकारची आहेत. भाजपने बिहारमध्ये जाणीवपूर्वक दुय्यम भूमिका स्वीकारलेली असली तरी ती कायमस्वरूपी नाही हे उघड आहे. याआधीही भाजपने नितीशकुमार यांना केंद्रात त्यांच्या ज्येष्ठतेनुसार स्थान देऊन बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण नितीशकुमार यांनी तो फेटाळला होता. त्यामुळे नितीशकुमार यांच्याबद्दल भाजपचे प्रेम वरवरचे आहे हे स्पष्ट आहे. म्हणूनच चिराग पासवान यांच्या पक्षाच्या बंडाला भाजपची अंतःस्थ फूस असावी असे मानले जाते. याचा अर्थ भाजप आपली शक्ती पासवान यांच्या अननुभवी चिरंजीवांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाच्या मागे लावणार असे दिसते. किंबहुना हा पक्ष व त्याचा जनाधार गिळंकृत करण्याचे राजकारण आगामी काळात झाले तर आश्‍चर्य वाटायला नको. दुसरीकडे, नितीशकुमार अधिक प्रबळ होऊ नयेत आणि त्यांचे भाजपवरील परावलंबित्व वाढावे यासाठीही भाजप प्रयत्नशील आहे. यामुळे नितीशकुमार फार गडबड करू शकणार नाहीत व त्यांना वेसण घालणे सोपे जाईल असे भाजपचे मनसुबे आहेत. नितीशकुमारही या गोष्टी ओळखून आहेत. त्यांच्याकडेही काही हुकमी पत्ते  आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला सत्तर जागा मिळाल्या आहेत. गेल्या विधानसभेत काँग्रेसच्या २३ जागा होत्या. आघाडीच्या राजकारणात हे संख्याबळ नगण्य नाही. त्यामुळे काँग्रेसला तीसपर्यंत जागा मिळाल्या तरी हा पक्ष निर्णायक भूमिकेत येऊ शकतो. त्याचबरोबर भाजपने नितीशकुमार यांना फारच कोंडीत पकडण्याचे ठरविल्यास नितीशकुमार काँग्रेसची मदत घेऊ शकतात आणि लालूप्रसाद यांना त्यांच्याबरोबर जाण्यावाचून पर्याय राहणार नाही. अर्थात याआधीही अशा चर्चा अनौपचारिक पातळीवर झाल्या होत्या, पण नितीशकुमार तेव्हा तयार नव्हते. परंतु भाजपने फार आक्रमकता दाखविल्यास या चित्रांचे रंग बदलू शकतात. रामविलास पासवान हयात असतानाच त्यांनी नितीशकुमार यांना साथ न देण्याचे ठरवले होते आणि काँग्रेसशी हातमिळवणी होऊ शकते काय याची चाचपणीही केली होती. पण विविध कारणांनी त्यात प्रगती होऊ शकली नाही. अशी विविध समीकरणे आणि विविधरंगी चित्रे बिहारमध्ये आकाराला येऊ शकतात. त्यामुळे या घटकेला ही निवडणूक एकतर्फी वाटत असली, तरी निकालानंतर सध्याची समीकरणे कायम राहणार की नवी समीकरणे तयार होणार ही उत्कंठेची बाब झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com