esakal | गोंधळलेले नेते, भरकटलेली वाट!
sakal

बोलून बातमी शोधा

Gandhi family

एका जुन्या-जाणत्या नेत्याच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला संघटना उभारणीवर भर द्यावा लागेल. कारण भाजपला जसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघटनात्मक आधार आहे, तसा प्रकार काँग्रेसमध्ये नाही.

गोंधळलेले नेते, भरकटलेली वाट!

sakal_logo
By
अनंत बागाईतकर

खंबीर नेतृत्वाची उणीव आणि वैचारिक स्पष्टता व जनसंपर्काचा अभाव, यामुळे काँग्रेस पक्षाची घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसला सर्वप्रथम आत्मपरीक्षण करून स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागेल आणि ती जेवढ्या लवकर होईल तेवढा पक्ष लवकर सावरू शकेल.  

कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीत चढ-उतार  येत असतात. पराभवांमुळे नेतृत्वाने गांगरून  जायचे नसते किंवा जबाबदारी टाळून पळून जायचे नसते! आणि हो, पद व जबाबदारी न घेता फुकट अधिकार गाजवणेही नेत्याकडून अपेक्षित नसते. पक्ष ‘जबाबदारी घ्या’ म्हणत असेल, तर त्यापासून पळून जाण्याचा भ्याडपणाही करायचा नसतो. नेत्याने आघाडीवर राहून नेतृत्व ‘द्यायचे’ असते. टोकाच्या प्रतिकूलतेला टक्कर देण्याची तयारी त्याला ठेवावी लागते. काँग्रेस पक्षात सध्या माजलेल्या गोंधळाची अशीच काही कारणे आहेत. पक्षामध्ये वैचारिक स्पष्टता नाही. ठाम व खंबीर नेतृत्व नाही आणि जनसंपर्काचा अभाव, यामुळे पक्षाची घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातून पक्षातील अस्वस्थता वाढून त्याचे स्फोट होऊ लागले आहेत. चाकोरीबद्ध उपाययोजना किंवा परंपरागत औषधाने हे दुखणे बरे होणारे नाही. तेव्हा चाकोरीबाह्य उपायांचा डोस पक्षाला आवश्‍यक आहे. ती जोखीम पत्करण्याचे धैर्य पक्षाने दाखविल्यास कदाचित काही मार्ग निघू शकेल. वर्तमान पेचप्रसंगाबाबत काँग्रेस हितचिंतकांमध्ये चिंता आहे. ती स्वाभाविक आहे. कारण अजूनही एक प्रमुख विरोधी व राष्ट्रीय स्वरूप असलेला पक्ष म्हणून काँग्रेसला विचारात घेतले जाते. दुःख हेच आहे की काँग्रेस त्या कसोटीला उतरताना आढळत नाही आणि त्यामुळेच उदारमतवाद, संसदीय लोकशाही, लोकशाही संस्था, सामाजिक सलोखा व सद्‌भाव आणि आधुनिकता यांची कास धरणाऱ्या वर्गात एकुणातच चिंता व अस्वस्थता आढळून येते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असंतुष्ट नको, चिंताग्रस्त म्हणा
पक्षाला लागोपाठ पराभव सहन करावे लागत आहेत. त्यामुळे पक्षाच्या भविष्याच्या चिंतेने ग्रासलेल्या नेत्यांनी, पक्षनेतृत्वाला खुल्या मनाने या सर्व मुद्‌द्‌यांवर निकोप आणि मुक्त चर्चा करण्याची आणि त्या आधारे पक्षाची फेरउभारणी करून गतवैभव प्राप्त करण्याची मागणी केली आहे. यात गैर काही नाही. या नेत्यांना असंतुष्ट म्हणण्यापेक्षा चिंताग्रस्त म्हणणे सयुक्तिक होईल. त्यांच्या चिंतांचे निराकरण करण्याची जबाबदारी पक्षनेतृत्वाची आहे आणि त्यात ते यशस्वी होत नसतील तर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

एका जुन्या-जाणत्या नेत्याच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला संघटना उभारणीवर भर द्यावा लागेल. कारण भाजपला जसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघटनात्मक आधार आहे, तसा प्रकार काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेसला स्वबळावरच संघटना उभारावी लागेल. धोरण-भूमिकांमध्ये वैचारिक स्पष्टता आणावी लागेल. या नेत्याच्या म्हणण्यानुसार प्रतिस्पर्धी पक्ष अमुक गोष्ट करतो आणि त्याला यश मिळते म्हणून  काँग्रेसने त्याचे अनुकरण करणे हा आत्मघात ठरेल. सध्या नेमके असे घडत आहे. या नेत्याने कथित ‘सॉफ्ट हिंदुत्व’ संकल्पनेचा उल्लेख केला. हिंदुत्व हे ‘सॉफ्ट’ किंवा ‘हार्ड’ असे काहीही नसते, ते फक्त हिंदुत्वच असते, असे सांगून हा नेता म्हणाला, की काही कृती व गोष्टी आपसूक (सटल पद्धतीने) करायच्या असतात आणि त्या नैसर्गिक वाटल्या पाहिजेत. हिंदुत्वासाठी राहुल गांधी यांना जानवे घालण्याचा प्रकार तद्दन हास्यास्पद होता. काँग्रेसची जी मूळ उदारमतवादी, सर्वसमावेशक आणि विकेंद्रीकरणावर आधारित विचारपरंपरा आहे, तीच काँग्रेसनेते विसरले आणि तेही बेगडी हिंदुत्व व तत्सम संकल्पनांमध्ये वाहावत गेले. 

अयोध्या प्रकरण जोरात असताना भाजप नेते विरोधी पक्षांना व काँग्रेसला ‘स्युडो सेक्‍युलर’ पक्ष म्हणून हेटाळणी करीत. त्यावेळी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ काँग्रेसचे प्रवक्ते होते आणि त्यांच्याबरोबरच्या अनौपचारिक गप्पांतून भाजपला ‘स्युडो हिंदू पार्टी’ म्हणण्याची संकल्पना पुढे आली आणि गाडगीळांनी लगेच त्यांच्या वार्तालापात ती रूढ करून भाजपला यशस्वीरीत्या प्रत्युत्तर दिले. थोडक्‍यात वर्तमान काँग्रेसला प्रथम आत्मपरीक्षण करून स्वतःचीच ओळख करून घेण्याची वेळ आली आहे आणि ती जेवढ्या लवकर होईल तेवढा पक्ष लवकर सावरेल.  सध्या देशात व्यक्तिकेंद्रित राजकारणाचे वर्चस्व आहे. त्याला पर्याय देताना काँग्रेसच्या विकेंद्रीकरणावर आधारित भूमिकेचा प्रचार करताना त्याचे ऐतिहासिक संदर्भ मांडावे लागतील. भारतासारख्या विशाल संघराज्यात प्रत्येक राज्याची ओळख जपण्याचे आश्‍वासन देतानाच ‘विविधतेत एकता’ यासारख्या काँग्रेसच्या मूलभूत भूमिकेला नव्या स्वरूपात  मांडावे लागेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कडवट औषधाची गरज 
देशाला एका पर्यायी राष्ट्रीय पक्षाची निकड आहे. जम्मू-काश्‍मीरचे विभाजन केल्यानंतरही तेथील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी किंवा नॅशनल कॉन्फरन्स या प्रादेशिक पक्षांना दुर्लक्षून चालणार नाही. पंजाबमध्ये अकाली दल आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष आहेत. बिहारमध्ये तर भाजपची संयुक्त जनता दलाबरोबर आघाडीच आहे. तेथील दुसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी पक्ष राष्ट्रीय जनता दल हाही प्रादेशिक आहे आणि काँग्रेसची त्याच्याबरोबर युती होती. संपूर्ण ईशान्य भारतात म्हणजेच सात राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे प्रभुत्व आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे प्रादेशिक पक्षांचा पूर्ण वरचष्मा आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी आहे. थोडक्‍यात देशातील प्रमुख राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा दबदबा आढळून येतो. त्याठिकाणी राष्ट्रीय पक्षांना आघाडी करणे किंवा दुय्यम भूमिका पत्करण्याची पाळी येते. थोडक्‍यात हे प्रादेशिक पक्ष त्यांच्या त्यांच्या प्रभाव क्षेत्रात निर्णायक असले, तरी ते किंवा त्यांची आघाडी राष्ट्रीय पर्याय होऊ शकत नाहीत. त्यामुळेच काँग्रेसला राष्ट्रीय पर्यायी पक्ष म्हणून स्वतःला नव्याने प्रस्थापित करण्याची निकड आहे. त्यासाठी वर्तमान सत्ताधारी पक्ष आणि त्याच्या नेतृत्वावर निव्वळ टीका करण्याने काँग्रेस स्वतःला पर्याय बनवू शकणार नाही. त्यासाठी पर्यायी धोरण, भूमिका आणि विचारसरणी मांडावी लागणार आहे. ती बाब अशक्‍यप्राय नाही. त्यासाठीच पक्षात खुली चर्चा करून निर्णय घेतले जावेत, या मागणीला नेतृत्वाकडून प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. 

राहुल गांधी यांनी ‘कुणीही गांधी पक्षाचे नेतृत्व करणार नाही’ अशी घोषणा केली असली तरी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ती निरर्थक आहे. अंमलबजावणी त्यांनीच करायला हवी. अन्यथा मुकाट्याने पक्षाचे नेतृत्व स्वीकारून वाटचाल सुरू केली पाहिजे. असंतुष्ट नेत्यांची मागणी एवढीच आहे. दुर्दैवाने वर्तमान नेतृत्वही ‘फोडा-झोडा’ नीतीचा अवलंब करीत आहे. कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांच्यासारख्यांना मुद्दाम वगळून अन्य असंतुष्टांना कुठे ना कुठे स्थान देऊन शांत करण्याचे जुने दरबारी डावपेच खेळले जात आहेत. काँग्रेस पक्षाला घराणेशाहीचा जडलेला रोग सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्या रोगाचे उघड नाव घेण्याची कुणात हिंमत नाही. केवळ रोगाची लक्षणे सांगणे म्हणजे ‘पोपट मेला आहे’ हे न सांगता ‘त्याची चोच वासलेली आहे, तो हालचाल करीत नाही’ असे वर्णन करण्यासारखे आहे. त्यामुळेच, काँग्रेसला अत्यंत कडवट आणि कडक औषधाची आवश्‍यकता आहे आणि ते देणारा डॉक्‍टरही तेवढाच निष्णात असला पाहिजे! अन्यथा, या देशाला ‘एकचालकानुवर्तित्व’ गिळंकृत करण्याचा धोका आहे!

loading image