सारांश : एकतर्फी प्रेमप्रकरणांचं पर्यवसान हिंसक मनोवृत्तीत

अनंत कोळमकर
मंगळवार, 16 जुलै 2019

गेल्या आठवड्यात दोन घटनांनी विदर्भातील जनमानस हादरले. या दोन्ही घटनांच्या कारणांमधील प्रेमाचा अतिरेक, प्रेमातील त्रिकोण व एकतर्फी प्रेम यांचे पर्यवसान हिंसक मनोवृत्तीत होणे, हे समाजघटक व समाजशास्त्रज्ञांसमोर एक आव्हान आहे. 
- अनंत कोळमकर 

अमरावतीत मंगळवारी (9 जुलै) अर्पिता ठाकरे या महाविद्यालयीन तरुणीचा भर रस्त्यात चाकूचे पंधरा घाव घालून खून झाला. अर्पितावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने तिच्यावर हल्ला केला. मैत्रिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तीही जखमी झाली. पण, ती अर्पिताला वाचवू शकली नाही. विशेष म्हणजे, अमरावतीतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही.

2005 मध्ये दीपाली कुळकर्णी या युवतीचाही अशाच एकतर्फी प्रेमातून खून झाला होता. दीपाली घरात झोपलेली असताना एक माथेफिरू युवक घरात घुसला व तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि विविध संघटना व संस्थांनी एकत्र येऊन आवाज उठविला होता. अमरावती शहरात त्या घटनेनंतर मुलींच्या संरक्षणासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली. 

दीपालीच्या खुनानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सुरू झालेले प्रयत्न, सुरक्षा पथके, हेल्पलाइन सारे काही काळाच्या प्रवासात कोठे गेले माहीत नाही. पण, तिच्या मृत्यूनंतर तेरा वर्षांनीही परिस्थिती बदलली नाही. गेल्या वर्षी 2018 मध्ये अमरावतीतील साईनगरात प्रतीक्षा मेहत्रे या युवतीचा भर रस्त्यात चाकूने वार करून खून करण्यात आला. पुन्हा कारण एकतर्फी वा फसलेल्या प्रेमाचे.

नागपुरातील ताज्या घटनेमागेही फसलेले प्रेम व विश्‍वासघाताचा संशय कारणीभूत आहे. मॉडेलिंग व उच्च वर्गात राहण्याची हौस असणाऱ्या खुशी परिहार या 19 वर्षीय तरुणीचा तिच्यासोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या प्रियकराने निर्घृण खून केला. खुशीचे उदाहरण तर युवकांमध्ये वाढलेल्या चंगळवादाचे उदाहरण आहे. खुशीला महागड्या वस्तू व मॉडेलिंगचा शौक होता. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आई-वडिलांकडून तो शौक पूर्ण होणे शक्‍य नसल्याने तिने घर सोडले व ती प्रियकरासोबत राहू लागली. प्रियकराने खुशीला नागपूरनजीकच्या ग्रामीण भागात नेले व गळा चिरून तिचा खून केला. "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहूनही खुशी आपल्याला फसवत आहे, या प्रियकराच्या संशयातून खुशीला जीव गमवावा लागला. 

तरुण पिढीतील वाढती हिंसक वृत्ती 
खुशी चंगळवादाच्या आहारी गेलेली असली, तरी त्यामुळे तिच्या खुनाचे समर्थन करता येणार नाही. पण, अमरावतीतील दीपाली, प्रतीक्षा असो की अर्पिता या तिघींचा काय दोष होता? कुणीतरी त्यांच्यावर प्रेम करतो... ते त्यांना मान्य नसते... म्हणून त्यांचा खून करायचे, याला काय म्हणावे? या साऱ्या घटनांमधील आरोपी तरुण आहेत. एखाद्या तरुणीवर रॉकेल टाकून तिला पेटवून देताना त्यांच्या संवेदना कोठे जातात? जिच्यावर प्रेम असल्याचा दावा करायचा, तिच्यावर चाकूचे घाव घालताना काहीच कसे वाटत नाही? ही क्रूर मानसिकता तयार कशी होते, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होतो. हा प्रश्‍न केवळ विदर्भापुरता नाही. राज्यात, देशभरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे तरुण पिढीत वाढत चाललेली ही हिंसक वृत्ती एकूणच सामाजिक आरोग्यासमोरचे प्रमुख आव्हान आहे. 

अर्पिता व खुशीच्या खुनाच्या घटना कालपरवा घडल्या आहेत. शुक्रवारीच पुलगावात (जि. वर्धा) दोन तरुणांनी त्यांच्यापैकी एकाच्या बहिणीच्या प्रियकराचा तरवारीने वार करून खून केला. अर्पिताच्या पालकांनी आरोपी तिला त्रास देत असल्याची तक्रार केली होती. मग पोलिसांनी केले काय? आरोपीला बोलावले आणि समज देऊन सोडून दिले. इतके करून पोलिसांनी आपली जबाबदारी झटकून टाकली. आता पोलिस म्हणतात, तिच्या पालकांनी तक्रार दिली नव्हती. केवळ आरोपीला समज द्यावी, एवढीच त्यांची अपेक्षा होती. पण, परिणाम काय झाला? अर्पिताला शेवटी जीव गमवावा लागलाच. खरे तर पोलिसांनी अशा वेळी अधिक गंभीरतेने व संवेदनशीलतेने वागायला हवे होते. ते या प्रकरणात जाणवले नाही, हे मान्य करावेच लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anant kolmkar Writes article in sakal on one side love story crime