अपेक्षा स्वावलंबनाच्या उड्डाणाची

anant patki
anant patki

‘राफेल’ विमानांच्या खरेदीत फायदा झाला की नुकसान, यावरच आपण चर्चा करीत राहणार, की आपल्याकडे अशी विमाने का तयार होत नाहीत, याचाही विचार करणार? वेगाने प्रगत होणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यापेक्षा जास्त वेगाने जावे लागते.

गेली पंधरा वर्षे लांबणीवर पडलेला लढाऊ विमानाचा प्रश्‍न ‘राफेल’ खरेदीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण मुळातच आपल्या गरजेचे असे विमान तयार करणे आपल्याला का जमत नाही यावरही तेवढाच विचार व चर्चा करायला हवी. लष्करी साहित्य मोठ्या प्रमाणावर बाहेरून खरेदी करणारा भारत हा एक प्रमुख देश बनला आहे. महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या देशाला हे खचितच सलायला हवे. विमानयुगाची सुरवात भारतात जेआरडी टाटांनी १९३२ मध्ये केली. त्याच वर्षी लष्कराने हवाई दलाची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर वालचंद शेटजींनी बंगळूरमध्ये ‘एचएएल’ सुरू केले आणि बंगळूरच्याच टाटा संस्थेने (सध्याचे ‘आयआयएससी’) एरोनॉटिकल इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम सुरू केला. म्हणजे आज ७०-८० वर्षे आपण या क्षेत्रात आहोत. हाच अभ्यासक्रम आता ‘आयआयटी’सह सुमारे दोनशे अभियांत्रिकी संस्था राबवत आहेत. गेल्या ५० वर्षांत एक हजाराहून जास्त विद्यार्थी या विषयात पीएच.डी. घेऊन बाहेर पडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपण या तंत्रज्ञानात कोठे आहोत, याचे आत्मपरीक्षण खुल्या मनाने करायला हवे.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विमानाचे तीन गट होतात. पहिला गट लहान व शिकाऊ विमानाचा. त्याचा उपयोग खासगी विमाने, स्थानिक सरकारे, प्रशिक्षण संस्था, फ्लाईंग क्‍लब व हवाई दलासाठी होतो. दुसऱ्या गटात मोठी प्रवासी व मालवाहू विमाने येतात. त्यांचा वापर करणाऱ्या वीसहून अधिक विमान कंपन्या आज भारतभर कार्यरत आहेत. तिसऱ्या गटात लढाऊ विमाने येतात. ती फक्त हवाई दलासाठी आवश्‍यक असतात. आज आपल्या वापरात असणाऱ्या सर्व विमानांपैकी काही छोटी विमाने सोडली तर बहुतेक सर्व परदेशी बनावटीची किंवा परदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या तीन गटांना लागणारे तंत्रज्ञान वेगवेगळे असले, तरी या पटलावर आपण कुठेच नाही ही दुःखद वस्तुस्थिती आहे.

वेग, पल्ला, चपळता व शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता ही लढाऊ विमानाची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. सॉनिक बॅरिअर ओलांडून स्वनातीत (सुपरसॉनिक) वेग घेण्यासाठी एकूणच रचना व आकार याचे योग्य विश्‍लेषण करावे लागते. छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करता यावे म्हणून इंजिन खूप शक्तिशाली असावे लागते. तसेच परत जमिनीवर उतरताना धावपट्टीची मर्यादा लक्षात घेऊन उत्तम ब्रेकप्रणाली बनवावी लागते. वेगाने जाण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जेटसाठी इंजिनला खूप हवा आत घ्यावी लागते. विशेषतः खूप उंचीवरून उडताना म्हणजे विरळ हवेतून जाताना आणि वळण घेताना हवी तितकी हवा शोषण्याची क्षमता लागते. विमानावर मारा होऊन ते निकामी झाल्यास वैमानिकाला सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी इंजेक्‍शन सीट व पॅराशूट लागते. कॅनॉपी म्हणजे वैमानिकासमोरची काच बुलेटप्रूफ असावी लागते. शत्रूच्या रडारवर हे विमान दिसू नये म्हणून बाह्य आकाराचे विश्‍लेषण करून पृष्ठभागावर खास पेंडचे आवरण द्यावे लागते. बॉडीचे वजन जेवढे कमी, तेवढे इंधन व अधिक शस्त्रसाठा नेता येतो. त्यामुळे अत्यंत प्रयत्नपूर्वक खास मटेरियल वापरून बॉडी कार्यक्षम बनविली जाते. हवाई युद्धामध्ये आवश्‍यक असणाऱ्या हालचाली करण्यासाठी खूप चपळता लागते. ते चापल्य विमानाचे पंख व सुकाणू यांचे योग्य आकार व आकारमान ठरवून मिळवावे लागते. हल्ली खूपशा कार्यप्रणाली संगणक नियंत्रित असतात. त्यासाठी वेगवेगळी उपकरणे व प्रोसेसर वापरले जातात. छोट्या केबिनमध्ये वैमानिकासह या सर्व गोष्टी, त्याच्या आवाक्‍यात येतील अशा तऱ्हेने बसविण्यासही कौशल्य लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वच प्रणाली एकमेकांत गुंतलेल्या असतात. त्यामुळे असे प्रकल्प पुढे नेताना अत्यंत कुशल व्यवस्थापकाची गरज असते.

एकूणच लढाऊ विमाने तंत्रज्ञानात फार प्रगत असतात. त्यामुळे लहान वाटणाऱ्या दहा टन वजनाच्या लढाऊ विमानाची किंमत तीनशे टनाच्या मोठ्या प्रवासी विमानापेक्षा जास्त असू शकते. सध्या आपल्या हवाई दलाकडे तीसेक गटांत विभागलेली सुमारे ८०० लढाऊ विमाने आहेत. त्या ताफ्यात मिग, मिराज, जग्वार व सुखोई प्रामुख्याने आहेत. आता ती भारतात बनवली जात असली, तरी ती परदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. स्वदेशी लढाऊ विमानांचे दोन प्रकल्प आजवर आपण सुरू केले होते. पन्नाशीच्या दशकात पहिला प्रकल्प बंगळूरमध्ये ‘एचएएल’ मधून सुरू झाला. हिंदुस्थान फायटर, (एचएफ२४) ‘मारुत’ असे त्याचे नाव होते. इंग्लडहून शिकून आलेले कोल्हापूरचे विष्णू घाटगे हे त्याचे प्रमुख डिझाईनर होते. त्याकाळात कोट्यवधीत असणारा ‘सुपरसॉनिक विंड टनेल’ बंगळूरला आणण्यात आला. प्रकल्प धडाडीने सुरू केला असला तरी त्याचे इंजिन मित्रदेशाकडून येणार होते. हे परावलंबित्व आपल्याला फार महागात पडले. पश्‍चिम आशियातून येऊ घातलेल्या त्या इंजिनाचे काम पूर्णच झाले नाही. त्यामुळे बरेच काम झालेला हा प्रकल्प काही काळानंतर बंद करण्यात आला. खरेतर शक्तिशाली इंजिन हा लढाऊ विमानाचा आत्मा असतो. दुसऱ्या महायुद्धापर्यंत विमानाची इंजिने ही मोटारीच्या इंजिनाची सुधारित आवृत्ती असे. पण त्यानंतर जेट युगाची सुरवात झाली. जेट इंजिनाशिवाय सुपरसॉनिक वेग शक्‍य नसतो. त्या वेळी हे तंत्रज्ञान आपल्याला वेगळे व नवखे होते. आजही आपण हा अडथळा पार करू शकलेलो नाही. सत्तरच्या युद्धानंतर चांगल्या लढाऊ विमानाच्या मागणीने पुन्हा जोर धरला. बऱ्याच चर्चा- मसलतीनंतर ‘एसीए’ म्हणजेच ‘तेजस’ विमानाचा प्रकल्प मंजूर झाला. त्याचे प्रमुख काम व व्यवस्थापन ‘डीआरडीओ’कडे सोपवण्यात आले. साधारण सहाशे कोटींचे बजेट व पंधरा वर्षांची मुदत असणारा हा प्रकल्प १९८३ मध्ये सुरू झाला. त्यांनी अशा प्रकारच्या गुंतागुंतीचा प्रकल्प पूर्वी हाताळला नव्हता. शिवाय आपले स्वदेशी इंजिन तयार होईपर्यंत ‘जनरल इलेक्‍ट्रिक’च्या अमेरिकी इंजिनावर आधारित काम सुरू करण्याचे ठरले. आपले इंजिन आजही तयार नाही. प्रकल्पाचे बजेट वाढत वाढत १८ हजार कोटींवर पोचले. कल्पनेपेक्षाही हे तंत्रज्ञान बिकट ठरल्याने तयार झालेली विमाने हवाई दलाच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाहीत. मग त्यानंतर आपण २००० मध्ये रशियाबरोबर सुखोई विमाने भारतात बनविण्याबद्दल करार केला आणि आता फ्रान्सबरोबर ‘राफेल’चा करार झाला आहे.

एकूणच अशा प्रकारच्या संशोधनात व तंत्रज्ञानात आपण का मागे पडत आहोत याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक प्रगत तंत्रज्ञानाला कमी लेखून चालणार नाही. वेगाने प्रगत होणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यापेक्षा जास्त वेगाने जावे लागते. दोन संशोधकाला आवश्‍यक असणारी मनोवृत्ती- ‘टीम स्पिरीट’ आणि आपल्या कामाचा अभिमान आपल्या देशात कसा वाढीस लागेल ,याचा विचार व्हायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com