आरोग्यासाठी ‘पाण्याची घंटा’

आरोग्यासाठी ‘पाण्याची घंटा’

काही दिवसांपूर्वी एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची बातमी वाचली. ‘वॉटर बेल’ नावाचा हा स्तुत्य उपक्रम केरळमध्ये आणि त्यानंतर तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा अशा राज्यात सुरू झाला आहे. आता पुण्यातल्या काही शाळांनीसुद्धा हा प्रयोग करायला सुरुवात केली आहे. शाळांमध्ये तास चालू असताना ठरावीक वेळेला शाळेची घंटा वाजवली जाते (दिवसातून दोन किंवा तीन वेळेला) आणि वर्गाचे काम थांबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या बाटलीमधले पाणी प्यायला सांगितले जाते.

आजच्या गतिमान जीवनात सकस अन्न खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी कोणाकडे वेळच नाही. पोटात भुकेचा डोंब उसळला तर आहे त्या ठिकाणी आणि असेल त्या वेळी फास्टफूडचे दोन घास ढकलायचे आणि पाण्याऐवजी एखादे थंड वा गरम पेय पोटात टाकून वेळ मारून न्यायची. ही झाली तरुणांची गोष्ट. पण, शाळकरी मुलेदेखील याच वाटेवर चालली आहेत, ही चिंतेची बाब आहे. खरे तर सकस अन्न आणि पाणी, या दोन गोष्टी आरोग्यपूर्ण जीवनासाठी अत्यावश्‍यक आहेत. पण, आजकालचे पालक त्यांच्या मुलांना हे पटवून देण्यात कुठेतरी कमी पडत आहेत. बहुतेक त्यांच्या स्वतःच्याच व्यग्रतेमुळे हे घडत असावे. दिवसाकाठी सरासरी सहा ते आठ ग्लास पाणी पोटात जायला हवे (लहानांसाठी प्रमाण थोडे कमी असेल). पण, निरीक्षणांती हे लक्षात येते, की मुले कमी पाणी पितात आणि त्यामुळे बालवयात आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्‌भवू लागल्या आहेत. पण, मुळात या मुलांना (जास्त करून मुलींना) पाणी न पिण्याची किंवा अत्यल्प पिण्याची सवय का लागली असावी, याचाही विचार होणे आवश्‍यक आहे. भरपूर व वेळोवेळी पाणी प्यायल्यानंतर मूत्रविसर्जनाची भावना होणे नैसर्गिक आहे. पण, ते करण्यासाठी शाळांमध्ये असलेली व्यवस्था अत्यंत अपुरी व खास करून अस्वच्छ असते. पिवळ्या पडलेल्या या टॉयलेट्‌समध्ये जाणे म्हणजे मुलांना एक शिक्षाच वाटते. सफाईचा अभाव, पाण्याचा अभाव, गळके नळ, फुटलेल्या टाईल्स, तुटलेल्या कड्या, फुटलेली तावदाने, फुटके चिकट बेसिन, अपुरा प्रकाश अशी दयनीय अवस्था असलेल्या टॉयलेट्‌समध्ये ही मुले-मुली कशी जाणार? मग, जाणेच टाळण्यासाठी कमीत कमी पाणी पिणे, हा उपाय ते अवलंबतात आणि शारीरिक व मानसिक समस्यांचा डोंगर हळूहळू उभा होतो. शाळांमध्येच नव्हे, काही कार्यालयांतही हे आढळले आहे. शाळांच्या टॉयलेट्‌सची अवस्था तपासली गेली पाहिजे. आवश्‍यक त्या सुधारणा झाल्या पाहिजेत. मुलांनादेखील या सुधारित टॉयलेट्‌स नीट वापरण्याचे, स्वच्छ ठेवण्याचे शिक्षण घरी तसेच शाळेत दिले गेले पाहिजे. टॉयलेटचा वापर स्वतःसाठी केल्यावर आपल्यानंतर येणाऱ्यासाठी ते स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे, हा संस्कार झाला पाहिजे. दिवसभरात तीन ते चार वेळा सफाई झाली पाहिजे. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध केले पाहिजे.

शाळेतल्याच नाही, तर शहरातील, गावागावांतील सार्वजनिक टॉयलेट्‌सची अवस्था गलिच्छ असते. नाट्यगृहात, सिनेमा थिएटर्समध्ये, रस्त्यावरच्या टॉयलेट्‌समध्ये कुठेही प्राथमिक स्वरूपाचीदेखील स्वच्छता नसते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आणि मुख्यत्वे मुली व स्त्रियांची फारच कुचंबणा होते. या सगळ्याचा परिणाम पाणीच कमी पिणे. त्यामुळे उपक्रमांच्या पहिले मूळ व्यवस्था आहे की नाही, याची खातरजमा करण्याचे काम उपक्रम राबविणाऱ्या संस्थांचे, सरकारचे आहे आणि केलेल्या व्यवस्थेचा व्यवस्थित वापर करणे, हे प्रत्येक लहान-मोठ्या नागरिकाचे आद्य कर्तव्य!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com