आर्थिक आघाडीवर सबला बना

अर्चना गोऱ्हे
शनिवार, 20 जानेवारी 2018

स्त्रियांचे शिक्षण, त्यांचे सक्षमीकरण या आघाड्यांवर आपल्या समाजाने काही प्रमाणात प्रगती केली आहे; परंतु ‘आर्थिक सबलीकरण’ या विषयात अद्याप तशी प्रगती झालेली नाही, असे म्हणावे लागते. सक्षमीकरण आणि आर्थिक सबलीकरण यात फरक काय, असा प्रश्‍न मनात येऊ शकतो. मला असे वाटते की, विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटवून चांगले अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची संख्या अलीकडच्या काळात लक्षणीयरीत्या वाढली आहे; परंतु उत्पन्न मिळविणे आणि त्याचा चांगला विनियोग (खर्च) करणे, यात त्या जेवढे स्वारस्य दाखवितात, तेवढे उत्तम प्रकारे गुंतवणूक करून पुढच्या काळात संपत्ती कशी वाढेल, हे पाहण्यात दाखवत नाहीत.

स्त्रियांचे शिक्षण, त्यांचे सक्षमीकरण या आघाड्यांवर आपल्या समाजाने काही प्रमाणात प्रगती केली आहे; परंतु ‘आर्थिक सबलीकरण’ या विषयात अद्याप तशी प्रगती झालेली नाही, असे म्हणावे लागते. सक्षमीकरण आणि आर्थिक सबलीकरण यात फरक काय, असा प्रश्‍न मनात येऊ शकतो. मला असे वाटते की, विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटवून चांगले अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची संख्या अलीकडच्या काळात लक्षणीयरीत्या वाढली आहे; परंतु उत्पन्न मिळविणे आणि त्याचा चांगला विनियोग (खर्च) करणे, यात त्या जेवढे स्वारस्य दाखवितात, तेवढे उत्तम प्रकारे गुंतवणूक करून पुढच्या काळात संपत्ती कशी वाढेल, हे पाहण्यात दाखवत नाहीत. त्या कुटुंब उत्तम चालवितात; परंतु आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीत आस्थापूर्वक सहभाग घेत नाहीत. याची काही कारणे आपल्या सामाजिक वातावरणात आणि मूल्यरचनेत असतीलही; परंतु काहीवेळा आवडीनिवडीमुळेदेखील त्या या विषयांच्या बाबतीत काहीशा अलिप्त राहतात. अगदी उच्चशिक्षित असलेल्या महिलादेखील ‘आर्थिक साक्षर’ असतीलच, असे नाही. आता हे चित्र बदलायला हवे. महिलांनी धाडस करून आर्थिक बाबी समजावून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध मार्गांनी व इंटरनेटच्या माध्यमातून अर्थकारण व अर्थविषयक कायदे यांचा अभ्यास करावा. ते त्यांना शक्‍यही आहे.

कित्येक उच्चशिक्षित महिलांना त्यांच्या उत्पन्नाचे आर्थिक नियोजन किंवा तुलनात्मकरीत्या उत्पन्नाची वर्गवारी करून गुंतवणूक करणे क्‍लिष्ट वाटते. जसे वय, उत्पन्न, उद्दिष्टे, धोका पत्करण्याची क्षमता, मिळणारा परतावा यांचा विचार करण्यापेक्षा परंपरागत बॅंक ठेवी या पर्यायाचा सर्रास गुंतवणूक म्हणून वापर होताना दिसतो. इतर अनेक चांगला परतावा देणारे पर्याय असतानाही, त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे महिला त्याबाबत उदासीन असतात. पर्यायी गुंतवणूक प्रकारांचा अभ्यास करून त्यांचा अंतर्भाव गुंतवणुकीत होत नाही, तोपर्यंत ती योग्य गुंतवणूक ठरत नाही. त्यामुळे महिलांनी बॅंक मुदतठेवी व दागिने या व्यतिरिक्त इतर पर्यायांचा अभ्यास करून, माहिती घेऊन गुंतवणूक करायला हवी. गुंतवणुकीसाठी म्युचुअल फंड हाही चांगला पर्याय आहे. त्यात पैसे देण्याव्यतिरिक्त आपल्याला काही करावे लागत नाही. सगळ्या गोष्टी फंड मॅनेजर पाहतो. म्युचुअल फंडातील ‘एसआयपी’ हा गुंतवणूक पर्याय सर्वसामान्य महिलांसाठी परिणामकारक पर्याय आहे. शेअर बाजार हाही संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चांगले शेअर दीर्घ काळासाठी घेऊन योग्य गुंतवणूक करता येईल. प्राप्तिकर बचतीसाठी फक्त आयुर्विमा किंवा ‘पीपीएफ’ हेच पर्याय नसून, त्याऐवजी म्युच्युअल फंडातील ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास करबचतीबरोबरच चांगला परतावाही मिळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नये. त्याची वर्गवारी करणे हिताचे असते. अशी गुंतवणूक सद्यःस्थितीत बॅंकेतील परताव्यापेक्षा अनेक पटींनी चांगला परतावा देऊ शकते.

अनेकदा गृहिणी आर्थिक बाबतीत पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असते. दुर्दैवाने पतीचे निधन किंवा घटस्फोट झाला की ती गोंधळून जाते. मानसिक आधारही नसतो आणि आर्थिक बाबींची माहिती नसल्यामुळे विवंचना निर्माण होते. त्यामुळे वेळीच घरातील सक्षम व्यक्तीचा विमा कोणत्या स्वरूपाचा आहे, किती रकमेचा आहे, आरोग्य विमा, तसेच टर्म विमा आहे काय? याचे सखोल ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. कुठे कोण ‘नॉमिनी’ आहे? त्याची प्रक्रिया, कुटुंबातील व्यक्तीची डिमॅट खाती, त्यातील शेअर व त्यांची किंमत यांची माहिती इतरांना नसते. त्यामुळे महिलांनीसुद्धा अशा गोष्टींची माहिती करून घेणे, घराबाहेर जाऊन आर्थिक व्यवहार जातीने लक्ष घालून पाहणे गरजेचे आहे. जेणेकरून अडचणीच्या वेळी त्यांची धावपळ टळेल. हे ज्ञान स्वतःकडे असल्यास जवळच्या व्यक्तीकडून अज्ञानाचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या फसवणुकीचा धोकाही टळू शकतो.

महिला आर्थिक जबाबदाऱ्या घेण्यास उत्सुक नसतात, असे आजही समाजाच्या सर्व स्तरांमध्ये दिसते. खरेतर पती-पत्नीने एकत्र बसून स्वतःसाठी व कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्‍यक आहे; पण या बाबतीत महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो आणि संपूर्ण निर्णय पुरुषप्रधान होऊन जातो. महिला कमावत्या असूनही, त्या आपले उत्पन्न कर्ता पुरुष या नात्याने पतीच्या स्वाधीन करतात, असे आजही बहुतांश कुटुंबामध्ये दिसते.
समृद्ध कुटुंब आणि समृद्ध समाज घडवण्यासाठी हे चित्र बदलायला हवे.

Web Title: archana gorhe wirte women education and family in editorial