खुर्चीवालेबाबा! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

...तर अशा बॉलिवूडबाबांनी आम्हाला दृष्टांत दिला. "दक्षिण मुंबईत राहणारा माझा एक भक्‍त- ज्याचे आडनाव "फ' ह्या आद्याक्षराने सुरू होते- आता अनुग्रहाला युक्‍त झाला असून तातडीने त्याला दीक्षा दे' असा आदेश त्यांनी मजला दिला. साक्षात बॉलिवूडबाबांच्या आदेशापुढे म्या पामर काय करणार? मी आपल्याला माझ्या शिष्याचा दर्जा देण्याचे ठरवले असून लौकरच विधिवत आपल्याला शिष्य करण्यात येईल.

चि. नानासाहेब फडणवीससाहेब यांस खुर्चीवालेबाबा ऊर्फ स्वामी लोडानंद यांचे अनेक उत्तम आशीर्वाद. काल रात्रीच ध्यानाला बसलेलो असताना दृष्टांत झाला. कडाडकड असा वीज कोसळल्याचा आवाज झाला आणि एक तेज:पूंज मूर्त नेत्रांसमोर प्रकटली. तिच्या कान व नाक व मुखातून बॅटरीच्या झोतासारखे प्रखर प्रकाशझोत बाहेर पडत होते. हे आमचे आद्यगुरू बंगाली बॉलिवूडबाबा होते. हे खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले. ह्यांना भेटावयास बॉलिवूडचे अनेक स्टारलोक येत असत.

खालमानेने येत आणि (खालमानेनेच) पळत पळत जात असत. त्यांना हिंदी सिनेमा बघण्याचा इतका शौक होता की त्यांचा आश्रमच एका थेटरात थाटण्यात आला होता. इंटर्वलमध्ये ते दर्शन देत असत. बाकीचे बंगाली बाबा हवेतून अंगठी काढून देतात. - हे अंगठीतून हवा काढत!! लोकांना आधी कळायचे नाही. त्यांना प्रश्‍न पडायचा की हवा कुठून आली? पण ते अन्य कुठूनही हवा न काढता अंगठीतून हवा काढतात, हे ज्यांनी ओळखले, त्यांनाच त्यांनी शिष्यत्त्व बहाल केले. आम्ही त्यापैकीच एक! 

...तर अशा बॉलिवूडबाबांनी आम्हाला दृष्टांत दिला. "दक्षिण मुंबईत राहणारा माझा एक भक्‍त- ज्याचे आडनाव "फ' ह्या आद्याक्षराने सुरू होते- आता अनुग्रहाला युक्‍त झाला असून तातडीने त्याला दीक्षा दे' असा आदेश त्यांनी मजला दिला. साक्षात बॉलिवूडबाबांच्या आदेशापुढे म्या पामर काय करणार? मी आपल्याला माझ्या शिष्याचा दर्जा देण्याचे ठरवले असून लौकरच विधिवत आपल्याला शिष्य करण्यात येईल. शिष्यत्त्वाचे सारे लाभ आपल्याला मिळणार असले तरी पट्टशिष्याला मिळणाऱ्या सुविधांचा ह्यात समावेश नसेल, ह्याची कृपया नोंद घ्यावी. दीक्षाविधीसाठीची सामग्री शिष्यानेच गोळा करून आणायची असते ह्याची विशेष नोंद घ्यावी. एक ब्रॉयलर कोंबडी (विथ तंगडी आणि लिव्हर) किंवा दीड किलो मटण, उकडलेली चार अंडी, चणे-शेंगदाणे, शेव, कांदा ह्या प्रसादासोबत तीर्थाचेही नियोजन शिष्यास करावे लागेल. विधी सुमारे सायंकाळी सात वाजेशी सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत चालेल. 

इलेक्‍शनमध्ये ह्याचा फार उपयोग होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. बॉलिवूडबाबांच्या संप्रदायातील अनुयायांना दिव्यदृष्टी प्राप्त होते. क्‍लायंट किंवा ग्राहक किंवा मतदार ह्यांच्या मनातील विचार बदलता येतात. इव्हीएम यंत्रेही हवी तशी चार्ज करता येतात. मध्य प्रदेशातील पाच-पाच बाबांनी तेथील एका भक्‍तास अनुग्रह दिला. भक्‍ताने प्रसादापोटी पाचही बाबांस राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. (तीर्थप्रसादाच्या टर्म्स कळू शकल्या नाहीत.) आपणही असेच करावे, अशी आमची सूचना आहे. आमचे शिष्यत्त्व प्राप्त झाल्यावर आपणही आम्हाला महाराष्ट्रातील राज्यमंत्र्याचा दर्जा द्यावा व महाराष्ट्रातील जनतेचे लोककल्याण साधावे, अशी साधीशी अपेक्षा आहे. 

आमची थोडक्‍यात ओळख अशी : आम्हाला लोक खुर्चीवालेबाबा म्हणून ओळखतात. कारण बहुतेक सर्व गोष्टी आम्ही खुर्चीत बसूनच करतो. नाशिकला एकटांगी बाबा होते. ते कायम एका पायावर उभे असत. आमचे तसेच आहे. हिमालयात आम्ही एका शिखरावर खुर्ची नेली व तीवर बसून 108 वर्षे तपश्‍चर्या केली, अशी माहिती आमच्या चरित्रात लिहिलेली आहे. गेल्या जन्मी आम्ही खुर्चीवाल्यांचीच सेवा केली. खुर्चीतील जनांच्या दाढ्या करण्याचे काम आम्ही मनोभावे करीत असू. दोन्ही जन्माचे एकत्र पुण्य गाठीला बांधल्याने आम्हाला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. तरी आम्हाला राज्यमंत्र्याचा दर्जा तातडीने प्राप्त व्हावा, ही आमच्या संप्रदायाची इच्छा पूर्ण करावी, जेणेकरून येती निवडणूक आपल्याला जरा (तरी) बरी जाईल! अन्यथा, आम्ही अन्य काही इच्छुकांना अनुग्रह देऊन टाकू! कळावे. पुन्हा अनेक शुभाशीर्वाद. खुर्चीवालेबाबा हरि ॐ. 

ता. क. : माहितीसाठी... परवाच आमच्या मठात राहुलजी गांधी दर्शनासाठी येऊन गेले. पुराव्यादाखल मठातील रजिस्टर तपासावे! खु. 

Web Title: Artcle Pune Edition Khurchiwalebaba Thing Tang