नेतृत्वसिद्धतेची उत्कंठावर्धक निवडणूक

election-tamilnadu
election-tamilnadu

विधानसभा रणधुमाळी - तमिळनाडू

सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि त्यांचा परंपरागत विरोधक द्रमुक आपले नेते अनुक्रमे जे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या गैरहजेरीत पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याने निवडणुकीतील चुरस उत्कंठावर्धक असेल. जयललितांच्या निकटवर्ती शशिकलांची भूमिका अद्याप गुलदस्तात आहे. भाजपने मोदींच्या सभेने निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे.

निवडणूक आयोगाने तमिळनाडूत राज्य विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी निवडणूक जाहीर केली आहे. राज्यातील अण्णा द्रमुक या सत्ताधारी आणि विरोधी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या दोन प्रमुख पक्षांनी आपापल्या आघाडीतील घटक पक्ष अद्याप जाहीर केलेले नाहीत. सहाजिकच जागावाटपही नाही. मुख्यमंत्री इडापड्डी के पलानी स्वामी (ईपीएस) सत्ताधारी आघाडीचे, तर एम. के. स्टॅलिन डीएमकेच्या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. दोघांनीही निवडणूक समोर ठेवून राज्य पिंजून काढले आहे, तथापि आघाडीतील घटक पक्ष ठरवलेले नाहीत.  भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी आघाडीसाठी चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे, त्यांनी जागावाटपात हव्या असलेल्या जागांची संख्या स्पष्ट केलेली आहे. राज्यातील ३८जिल्ह्यातील ३८जागांवर भाजप, तर काँग्रेसने ५४ जागांवर दावा केलेला आहे. 

वन्नीयारांच्या मतांवर डोळा 
अण्णा द्रमुकने शनिवारी डॉ. अंबुमनी रामदास यांच्या पट्टली मक्कल काचीबरोबर (पीएमके) आघाडीची घोषणा शनिवारी केली. तथापि, कलाकार विजयकांत यांच्या डीएमडीके यांच्याबरोबरची आघाडी अद्याप जाहीर केलेली नाही. राज्याच्या उत्तर भागात वन्नीयार समाज मोठ्या संख्येने आहे, त्यांच्या मतांवर डोळा ठेवून सत्ताधारी पक्षाने ‘पीएमके’शी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या अतिमागास वन्नीयार समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षणाची मागणीही त्यांनी मान्य केलेली आहे. पीएमकेने वन्नीयारांना खास २०टक्के आरक्षणाची मागणी लावून धरलेली होती, तर अण्णाद्रमुक १०.५टक्के आरक्षणाला तयार होते. त्याबाबतचे विधेयकही विधानसभेत मंजूर झालेले आहे.

दरम्यान, पीएमकेने ३०जागा मागितलेल्या असतानाच, अण्णा द्रमुकने त्यांना २३ जागा देण्याचे मान्य केले आहे, तशी घोषणा अण्णा द्रमुकचे मुख्य समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांनी केली आहे.  कलाकार विजयकांत अद्याप आजारातून पूर्णतः बरे झालेले नसल्याने डीएमडीके सध्या काहीसा कमकुवत वाटत आहे. ते नीट बोलू शकत नाहीत आणि दौरेही करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नी प्रेमलता यांनी पक्षाची धुरा शिरावर घेतली आहे. आघाडीत या पक्षाला घेतलंय किंवा नाही, हेही अण्णा द्रमुकने स्पष्ट केलेले नाही. अण्णा द्रमुकच्या आघाडीतील देवेंद्रकुला वेल्लालर आणि डॉ. कृष्णासामी यांच्या नेतृत्वाखालील पुथीया तमझीगम काची काहीसे अंतर ठेवूनच आहे. 

द्रमुक आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा विचार करता डावे पक्ष -भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह इंडियन युनियन मुस्लिम लिग, दलित नेते थोल थिरूमायलन यांच्या नेतृत्वाखालील व्हीसीके यांच्याबरोबरील आघाडी कायम राहील. द्रमुकने आपल्या आघाडीतील छोट्या पक्षांना आपल्या उगवता सूर्य या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी सूचना केलेली आहे. 

दरम्यान, अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या अगदी निकटवर्ती व्ही. के. शशीकला यांची अगदी अनपेक्षितरित्या गेल्याच महिन्यात बंगळुरूच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली, तथापि त्यांनी पक्षाच्या कामकाजात कुठलाही आक्रमकपणा दाखवलेली नाही. त्यांनी पक्षाच्या एकात्मतेसाठी दोनदा आवाहन केले आहे, पण ईपीएस-ओपीएस यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुकने त्यात काहीही रस दाखवलेला नाही. शशीकला एएमएमकेच्या घटक असल्यातरी त्यांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन यांनी त्यांची अवहेलनाच केली, त्यामुळे आता त्यांनी लवकरच आपण जनतेच आणि समर्थकांच्या भेटी घेणार आहे, असे जाहीर केले आहे. 

अभिनेता सरथकुमार आणि नाम तमिझर काचीचे नेते सीमान यांनी शशीकला यांची भेट घेतली आहे. अभिनेता आणि मक्कल निथी मामचे नेते कमल हसन यांनी त्यांचे सहकारी आणि अभिनेते रजनीकांत यांची भेट घेवून त्यांचा पाठिंबा आपल्या पक्षासाठी मागितला, अशी चर्चा आहे. कमल हसन यांना तिसरी आघाडी व्हावी, असे वाटते आहे, तथापि त्याला काहीही आकार येत नाही. 

भाजप, काँग्रेसकडून वाटाघाटी
बिहारमधल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असूनही आपला प्रभाव दाखवू शकलेला नाही, त्या तुलनेत केंद्रात सत्तेवरील भारतीय जनता पक्षाने तिथे आपले वर्चस्व दाखवून दिल्याने वाटाघाटीत त्याला महत्त्व आलेले आहे. भाजपच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अण्णा द्रमुकशी वाटाघाटीच्या चर्चा करत आहेत, तर काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेते द्रमुकशी चर्चा करत आहेत. 

काँग्रेसने केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी आणि पक्षाच्या संपर्क व्यवस्थेची धुरा सांभाळणारे रणदीप सुरजेवाला या दोघा राहूल गांधी समर्थकांवर द्रमुकशी वाटाघाटीची धुरा सोपवलेली आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वीच द्रमुकच्या नेत्यांशी चेन्नईत चर्चेची पहिली फेरी पार पाडली, पण त्यातून मतभेदाच्या जागांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. 

द्रमुकचे नेते स्टॅलिन जिल्हाजिल्ह्यात प्रचारयंत्रणा राबवत असल्याने ते चर्चेत सहभागी होत नाहीत. त्यांच्याऐवजी दुसऱ्या फळीतील टी. आर. बालू चर्चेत सामील होत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या दहापैकी नऊ जागा जिंकल्याने विधानसभेच्या ५४जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. अशी शक्‍यता आहे, की द्रमुककडून थेट राहूल गांधींशी चर्चा होवून तोडगा निघेल.  असे समजते की, द्रमुकने २०जागांची तयारी दाखवलेली आहे, २०१६च्या निवडणुकीवेळी ४१जागा दिलेल्या होत्या. त्या तुलनेत २१जागा कमीच देण्याची तयारी दाखवलेली आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता, जागावाटपासाठी घासाघीस अधिक होण्याची शक्‍यता आहे. एकत्रित लढायचेच यावर त्यांचे एकमत आहे हे मात्र खरे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक राहणार हे निश्‍चीत आहे. त्यांनी गेल्या गुरूवारी पश्‍चिम भागातील कोईम्बतूर येथे प्रचाराचा नारळ फोडून, राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा केलेली आहे. त्यावेळी प्रचारसभेत भाषण करताना मोदींनी द्रमुक आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांच्या नेत्यांवर कडवा हल्ला चढवला, दोन्हीही पक्षांचे नेते राज्याच्या लुटण्याची योजना आखत आहेत, अशी टीका केली. त्यांची बैठक म्हणजे ‘करप्शन हॅकॅथॉन’ आहे, असे संबोधत त्यांनी जनतेला मतदानाबाबत सावध केले आहे. द्रमुकवर प्रचाराची झोड उठवताना मोदींनी या पक्षाच्या सत्ताकाळात महिलांची छळवणूक केली जाते, असा आरोप केला. ते म्हणाले, साऱ्या तमिळनाडूला माहिती आहे, या पक्षाने आम्मांना (जयललिता) कशी वागणूक दिली आहे. 

द्रमुकचा भेटीगाठींवर भर
प्रसिद्ध व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्या इंडियन पोलिटिकल ॲक्‍शन कमिटीच्या (आय-पॅक) सल्ल्याने द्रमुकने आपल्या प्रचारतंत्रात बदल केलेला आहे. पक्षाचे नेते लोकांना भेटीगाठीच्या कार्यक्रमाद्वारे थेट भेटून चर्चा करत आहेत. परंपरागत जाहीर सभांपासून ते काहीसे दूर गेले आहेत. द्रमुकचे दिवंगत नेते करूणानिधी यांच्या कन्या खासदार कनिमोळी आणि स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे पक्षाचे आणखी स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे एकूणच निवडणूक उत्कंठावर्धक ठरेल, असे दिसते.

सत्ताधाऱ्यांकडून योजनांची बरसात
अण्णा द्रमुक विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असल्याने त्यांनी मतदारांना लुभवण्यासाठी घोषणांचा अक्षरक्षः पाऊस पाडलाय. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आधीच १२,१००कोटींची कर्जमाफी दिली आहे, त्याच्याच जोडीला आता मुख्यमंत्री पलानीस्वामींनी दागदागिन्यांवर घेतलेले कर्जही काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केलेली आहे. शिवाय, स्वयंसहायता गटातील महिलांचेही कर्जमाफ करण्याची तसेच नववी ते अकरावीतील विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षांतूनही सूट दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com