संख्या नावातील बदल म्हणजे भाषेवरच अतिक्रमण

प्रा. रमेश पानसे
गुरुवार, 20 जून 2019

'बालभारती'ने पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील संख्यानामांमध्ये केलेल्या बदलांना विविध स्तरांवर विरोध होत आहे. या विरोधाची कारणे; तसेच त्यामागची भूमिका स्पष्ट करणारा लेख.

'बालभारती'ने पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील संख्यानामांमध्ये केलेल्या बदलांना विविध स्तरांवर विरोध होत आहे. या विरोधाची कारणे; तसेच त्यामागची भूमिका स्पष्ट करणारा लेख. 

पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकात संख्यानामात केलेला बदल विविध दृष्टिकोनांतून विचार करताना योग्य नाही, असे मला वाटते. मुळात अशा प्रकारचा मूलभूत भाषिक बदल करताना समाजात व्यापक विचारविनिमय व्हायला हवा होता. पण तसा तो न करता 'बालभारती'ने हा बदल केला. त्याच्या समर्थनार्थ असे सांगितले जात आहे, की "आम्ही फक्त पर्याय सुचविला, याचा अर्थ जुनी पद्धत आम्ही बाद ठरवीत नाही'. पण पर्याय याचा अर्थच 'अमूकच्या ऐवजी तमूक वापरा' असा होतो. त्याऐवजी फक्त स्पष्टीकरण म्हणून या नव्या पद्धतीचा उल्लेख केला असता तर कदाचित विरोधाची धार बोथट झाली असती. 

पण या बदलाकडे तेवढ्यापुरते पाहून चालणार नाही. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि भाषिक अशा सर्वच दृष्टिकोनांतून तो तपासायला हवा. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 21 ते 99 या अंकांच्या संख्या कशा वाचाव्यात, याविषयीचा हा बदल आहे. उदाहरणार्थ, त्र्याऐंशी, चौऱ्याहत्तर, सत्तेचाळीस असे न वाचता ऐंशी तीन, सत्तर चार, चाळीस सात इत्यादी. आपण एखादा बदल घडवतो, तेव्हा तो तर्कसंगतरीत्या पुढच्या टप्प्यांवरही लागू करता यायला हवा. पुढच्या इयत्तांमध्ये मुलांचा मोठ्या संख्यांशी संबंध येणार, तेव्हा या पद्धतीने वाचन करता येणार नाही.

कोटी, शतकोटी, अब्ज अशा संख्या विद्यार्थ्यांपुढे येतील, तेव्हा त्या कशारीतीने वाचायच्या, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गणितज्ज्ञांनी भाषेच्या संदर्भातील एखादा बदल करणे हे अधिकारातिक्रमणही आहे. याचे कारण जो विषय भाषातज्ज्ञांचा आहे, तो त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय हाताळला जाऊ नये. गणित समजावून सांगताना सोपी भाषा वापरली पाहिजे, हे मान्यच आहे; पण एखादा मूलभूत बदल करायचा असतो, तेव्हा त्याच्या परिणामांविषयी साधकबाधक चर्चा आधीच होणे आवश्‍यक असते. 

'सतराशे साठ'वेळा सांगूनही... 
भाषा ही शिक्षणाशी, साहित्याशी, दैनंदिन व्यवहारांशी, संस्कृतीशी जोडलेली असते. भाषा हा संस्कृतीचा कणा असतो. त्यामुळे पाठ्यपुस्तकात केलेला एखादा बदल हा तेवढ्यापुरता राहत नाही. त्याचे अन्य क्षेत्रांवरही परिणाम होतात. ते घातकही असू शकतात. प्रत्येक भाषेची एक धाटणी असते. तिला आपण धक्का लावत नाही ना, हे पाठ्यपुस्तके तयार करताना, शिक्षणक्रम आखताना पाहायला हवे. अगदी संख्यांचा विचार केला, तरी प्रत्येक संख्यानामाला एक वेगळा अर्थही आहे. संख्या या केवळ संख्या नसतात, त्यांनाही विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला असतो. भाषेची तीच तर ताकद असते. 'सतराशे साठवेळा तुला सांगूनही लक्षात येत नाही' या वाक्‍यातील सतराशे साठ शब्दाला जो अर्थ आहे, तो दुसऱ्या कशातही येणार नाही.

जोडशब्द हे मराठीचे लेणे आहे. मराठी ही उच्चारानुसार लिहिली जाते. तिचे हे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे. सध्या मेंदूशी संबंधित संशोधन खूप पुढे गेले आहे. शिक्षणात त्या संशोधनाचा उपयोग करून घेणे आवश्‍यक आहे. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे. अनुभव घेऊन, कृती करून मेंदू शिकतो. त्या त्या अनुभवांची प्रतिमा मेंदूत निर्माण होते. विविध शब्द व त्यातून प्रतीत होणाऱ्या अर्थांचा आकृतिबंध मनात तयार होतो. ते शिकणे अधिकाधिक परिणामकारक, अर्थपूर्ण कसे करता येईल, हे पाहिले पाहिजे.

काठिण्य पातळी कमी करणे, सोपी करणे ही शिक्षणातील उद्दिष्टे कशी काय असू शकतात? मग आपण विद्यार्थ्यांना कधीतरी काठिण्याकडे नेणार की नाही? मुळात गणित विषय मुलांना अवघड वाटतो, आवडत नाही, हा निष्कर्षच सरसकट स्वीकारणे चूक आहे. तसा तो गृहीत धरल्याने असे बदल केले जातात. पण मुळात गणिताची नावड संख्यानामांमुळे निर्माण होते, असे नसून या नावडीचीदेखील विविध कारणे आहेत.

एखादी गोष्ट इंग्रजीत वापरली जाते म्हणून ती ग्राह्य मानणे हे आपण इंग्रजांच्या प्रभावातून मुक्त झालो नसल्याचे लक्षण आहे. धोतरावर टाय घालण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला, तरी "बालभारती'ने संख्यानामांमध्ये केलेला बदल समर्थनीय वाटत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the changing method of teaching Mathematics Written by Prof Ramesh Panse