भाषेविषयी बोलू काही...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

पुढच्या 50 वर्षांत आपल्या देशातील आणखी किमान 400 भाषा मृतप्राय होण्याची भीतीही गणेश देवी यांनी व्यक्‍त केली आहे आणि त्यास अर्थातच आपल्या देशातील वाढते नागरीकरण कारणीभूत आहे

एकीकडे गेल्या पाच दशकांत भारतातील किमान 250 भाषा मृतप्राय झाल्याची खंत प्रख्यात भाषाकोविद गणेश देवी व्यक्‍त करत असतानाच, कवी गुलजार यांनी मराठी, गुजराती, बंगाली, तमिळ या भाषाही आपल्या देशाच्या राष्ट्रभाषाच आहेत, असे प्रतिपादन केले आहे! खरे तर कोणत्याही देशाच्या संस्कृतीचा विकास हा त्या देशातील भाषांच्या विकासावरच अवलंबून असतो. भारतात मात्र अनेक भाषांनी नटलेली बहुविध संस्कृती असतानाही भाषा हा गेल्या काही वर्षांत उपेक्षेचा आणि विद्वेषाचाही विषय ठरत आहे. गणेश देवी असोत, की गुलजार; यांच्या प्रतिपादनाकडे या पार्श्‍वभूमीवर बघणे त्यामुळेच गरजेचे झाले आहे.

पुढच्या 50 वर्षांत आपल्या देशातील आणखी किमान 400 भाषा मृतप्राय होण्याची भीतीही गणेश देवी यांनी व्यक्‍त केली आहे आणि त्यास अर्थातच आपल्या देशातील वाढते नागरीकरण कारणीभूत आहे. "नागर भागातील उच्चवर्णीयांनी प्रमाणित भाषेचा आग्रह धरला आणि त्यापायी किनारपट्टीवर बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलीभाषा या काळाच्या उदरात गडप झाल्या,' असे देवी सांगतात. तर "मराठी असो की बंगाली आणि गुजराती असो की तमीळ या भाषांचे देशाच्या सांस्कृतिक उत्थानातील स्थान लक्षात घेऊन त्यांना "प्रादेशिक' असा शिक्‍का मारणे चुकीचे आहे,' असे गुलजार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हे मत महत्त्वाचे आहे आणि या उपेक्षेला वसाहतवादी काळात तयार झालेला न्यूनगंडही कारणीभूत आहे. तो झटकून टाकल्याशिवाय संस्कृतीतही जोमदार प्रवाह वाहणार नाहीत. विकास म्हणजे केवळ जीडीपी नव्हे; त्यामुळेच सरकार, शिक्षणसंस्था, पालकच नव्हे तर समाजधुरीणांनीही भाषांचे वैभव वर्धिष्णू कसे होईल, याविषयी चिंतन करायला हवे. उर्दू आणि हिंदी कवितेच्या क्षेत्रातील एक मातब्बर नाव असलेल्या गुलजार यांनी मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या कविता समजून घेऊन त्यांचा अर्थपूर्ण अनुवादही केलेला आहे. देवी असोत की गुलजार, त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे; अन्यथा एक एक भाषा नष्ट होत जाताना, शेवटी देशाची संस्कृतीच लयाला जाण्याचा धोका समोर उभा ठाकेल.

Web Title: article about language