आव्हान सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून त्यामागचे सूत्रधार आणि त्यांचे इरादे या सगळ्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याच्या पोलिसांच्या दाव्यामुळे हा तपास महत्त्वाच्या वळणावर आल्याचे स्पष्ट होते. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात यश आल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला असून, त्यामुळे या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात अथकपणे विवेकवादाचा जागर करणारे दाभोलकर यांच्या हत्याकटामागे हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या गटाचा किंवा संघटनेचा हात असावा, असा संशय सुरवातीपासूनच व्यक्त करण्यात येत होता. त्या संशयाला पुष्टी मिळत असल्याचे तपासयंत्रणांना मिळालेल्या माहितीवरून दिसते. नालासोपारा येथे शस्त्रास्त्रे, तसेच बॉंब बनवण्याचे साहित्य जमा करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यास अटक केल्यानंतर चौकशीत जी माहिती मिळाली, त्याआधारे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे धागेदोरे सापडण्यास मदत झाली. सचिन प्रकाशराव अंदुरे या तरुणाचे नाव चौकशीनंतर पुढे आले.

दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी तो एक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता.20 ऑगस्ट) पाच वर्षे पूर्ण होत असतानाच ही कारवाई झाली, हा लक्षणीय योग म्हणावा लागेल. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात सकाळच्या वेळी पोलिस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या जातात, मोटारसायकलवरून आलेले मारेकरी जवळच नाकेबंदी असतानाही पसार होतात आणि महिनोन्‌महिने त्यांचा ठावठिकाणाही सापडत नाही, ही घटना राज्याच्या कायदा-सुव्यवस्था स्थितीविषयी गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी होती. या तपासास झालेला हा विलंब त्यामुळेच अस्वस्थ करणारा आहे. डॉ. दाभोलकर यांच्या पाठोपाठ विवेकवाद, तसेच बुद्धिवाद यांची कास धरणारे गोविंदराव पानसरे, प्रो. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याही त्याच पद्धतीने हत्या झाल्या होत्या. महाराष्ट्र पोलिस हा तपास अधिक नेटाने आणि वेगाने करते, तर त्यानंतरच्या काही दुर्दैवी घटना टळू शकल्या असत्या. 

पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वच जाती-धर्मांत बोकाळलेल्या बुवाबाजीच्या विरोधात डॉ. दाभोलकर यांनी "अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या माध्यमातून समाजजागृतीची मोठी मोहीम हाती घेतल्याने अनेकांची "संस्थाने' खालसा होत होती. त्यामुळेच त्यांना समाजाच्या विविध गटांतून शत्रूही निर्माण झाले होते. अशाच एका टोळक्‍याने त्यांची हत्या घडवून आणली असावी, असा कयास विविध स्तरांवर व्यक्त होत होता; परंतु वर्षभरात पोलिसांना तपासाच्या दृष्टीने काहीच ठोस हाती लागले नव्हते. त्याच काळात पुण्याच्या तत्कालिन पोलिस आयुक्तांनी तपासासाठी थेट "प्लॅंचेट'चाच वापर केल्याच्या आरोपाने तर आणखीनच खळबळ माजली. प्लॅंचेट आणि तत्सम बुवाबाजीच्या प्रकारांविरोधात जनजागृती करण्यासाठी डॉ. दाभोलकर यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. त्यांच्या हत्येच्या तपासासाठी तसल्याच गोष्टींचा आधार घेणे, हे डॉक्‍टर समाजात रुजवू पाहत असलेल्या विवेकवादालाच नख लावण्यासारखे होते. त्यानंतरच्या काळात डॉक्‍टरांची कन्या मुक्‍ता आणि पुत्र हमीद यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या बडग्यानंतरच या तपासाने वेग घेतला, हे खरे तर महाराष्ट्र पोलिसांच्या नाकर्तेपणावरच नेमके बोट ठेवणारे आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या पैसा-अडका, मालमत्ता आदी कोणत्याही वैयक्‍तिक कारणासाठी झालेली नव्हती. निव्वळ वैचारिक मतभेदांतून ही हत्या घडवून आणली गेली होती. लोकशाहीत मतभेद व्यक्‍त करण्याचा मार्ग म्हणून बंदुका वापरणे, ही विकृती आहे आणि ती फोफावता कामा नये, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने होऊन आरोपींना शिक्षा होण्यापर्यंत हे प्रकरण तडीस नेणे, ही बाब त्यादृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची

पुण्यासारख्या महानगरात गजबजलेल्या रस्त्यावर घडलेली ही घटना पोलिसांच्या वर्दीची तथाकथित ताठ मान शरमेने खाली झुकवणारी होती. त्यानंतरही पोलिसयंत्रणा न्यायालयाने बडगा उगारेपर्यंत सुस्त का राहिली, हाही एक प्रश्‍नच आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांच्या "एटीएस'ने काही महिन्यांत जे दुवे उकलले, त्या पार्श्‍वभूमीवर तर हे अधिकच अनाकलनीय वाटते. मात्र, आता अखेर डॉक्‍टरांच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर का होईना झालेल्या कारवाईमुळे अनेक पुरोगामी संघटनांनी उठवलेला "विवेकवादाचा आवाज' लूप्त होणार नाही, अशी आशा करायला जागा निर्माण झाली आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांनी हत्याकटाची पाळेमुळे खणून प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोचायला हवे, तरच पुरोगामी महाराष्ट्राला दिलासा मिळू शकेल. एकूणच पोलिस व अन्य तपासयंत्रणांची कार्यपद्धती, त्यांची स्वायत्तता, व्यावसायिक कौशल्य या सगळ्याच पैलूंची आमूलाग्र चिकित्सा करून मुळापासून काही काही सुधारणा घडविण्याची आवश्‍यकताही या एकूण घटनाक्रमामुळे प्रकर्षाने समोर आणली आहे. 
 

Web Title: article about narendra Dabholkar murder case