मर्म : नव्या नेत्यावर भिस्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

ब्रिटनमधील हुजूर पक्षाची मनःस्थिती काहीशी अशीच झाली असावी, असेच बोरिस जॉन्सन यांच्या निवडीवरून वाटते. जॉन्सन यांना 'ब्रिटनचे ट्रम्प' असे संबोधले जाते, यावरून काय ते स्पष्ट व्हावे.

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे अर्थात 'ब्रेक्‍झिट'चे कराराअभावी रुतलेले गाडे बाहेर काढण्यासाठी आता हुजूर पक्षाने बोरिस जॉन्सन यांना नेतेपदी आणले आहे. हुजूर पक्षाच्या सदस्यांनी मोठ्या मताधिक्‍याने त्यांना निवडले. अगदी लहान वयातच साऱ्या 'जगाचा राजा' व्हायचेय, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणारे बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर आरूढ झाले आहेत. मात्र, ज्या परिस्थितीत हे पद त्यांच्याकडे आले आहे, ती कमालीची आव्हानात्मक असून, त्याला ते कसे तोंड देतात, हे पाहायचे.

आक्रमक राष्ट्रवादी भूमिका घेऊन लोकप्रियता मिळवायची, या जगभर दिसणाऱ्या प्रवाहाशी ही निवड सुसंगतच म्हणायला हवी. चिघळणाऱ्या आणि साध्या औषधांना दाद न देणाऱ्या दुखण्यावर अधिक जालीम उपाय योजण्याची घाई होते; मग साइड इफेक्‍ट काहीही होवोत! ब्रिटनमधील हुजूर पक्षाची मनःस्थिती काहीशी अशीच झाली असावी, असेच बोरिस जॉन्सन यांच्या निवडीवरून वाटते. जॉन्सन यांना 'ब्रिटनचे ट्रम्प' असे संबोधले जाते, यावरून काय ते स्पष्ट व्हावे.

ते मूळचे पत्रकार. जन्म अमेरिकेत झाला असला, तरी तेथील नागरिकत्व सोडून ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द प्रदीर्घ होती. द टाइम्स, टेलिग्राफ, स्पेक्‍टेटर आदी नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केले. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा राजकीय मुद्दा जसजसा तापू लागला, त्या वेळी जॉन्सन यांनी ब्रेक्‍झिटच्या आवश्‍यकतेवर आक्रमक लिखाण केले. पत्रकारिता आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील त्यांची कारकीर्द संमिश्र स्वरूपाची राहिली. 2008 ते 16 या काळात लंडनचे महापौर म्हणून त्यांनी काम केले. मावळत्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात दोन वर्षे परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी काम केले. राजकीय अनुभवाच्या दृष्टीने ही महत्त्वाची संधी होती आणि तिचा त्यांनी फायदा उठवला, हे खरेच.

आजवरचा त्यांचा एकूणच प्रवास पाहता लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्यात ते माहीर आहेत, असे दिसते. हुजूर पक्षाच्या बाहेरही त्यांना मानणारे लोक आहेत, हेही खरे. परंतु, आताची त्यांच्यावरची जबाबदारी सोपी नाही. तिथे केवळ लोकप्रियता कामी येईल, असे नव्हे. उलट युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या तपशिलात जाताना आणि ही प्रक्रिया सुरळितपणे पार पडावी, यासाठी प्रयत्न करताना त्यांना अधिक व्यावहारिक भूमिका घ्यावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the new Prime Minister of Britan