सारांश : किल्ले रायगडची अवघड वाट

Raigad Fort
Raigad Fort

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड गाठण्यासाठी हजाराच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यावरून पाय घसरण्याची भीती असते. या मार्गावर पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे. बाटलीबंद पाण्यासाठी चारपट किंमत मोजावी लागते. तहानेने व्याकूळ होऊन रायगड सर करण्याची वाट किल्लेप्रेमींसाठी आजही बिकटच आहे, याची प्रचीती अलीकडेच राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आली. 

शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड. मागील दहा वर्षांपासून येथे साजऱ्या होणाऱ्या उत्सवांमध्ये वाढ झालेली आहे, करोडो शिवप्रेमींसाठी हे ठिकाण तीर्थक्षेत्रासारखे असल्याने या उत्सवांसाठी येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावर चढाई करणे जितके अवघड होते, तितकेच आजच्या काळातही आहे. चित्त दरवाजापासून चढाई करताना प्रत्येक पायरीवर महाराजांनी या गडाची राजधानीसाठी निवड का केली, याचे उत्तर मिळायला लागते. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले हे ठिकाण आहे. सागरी दळणवळणास हे ठिकाण जवळ आहे. हा गड पूर्वी जितका दुर्गम होता, तितकाच आजही आहे. उभ्या चढणीच्या पायऱ्या चढताना होणारी दमछाक, तरुणाईलाही लागणारी धाप, चक्कर आल्यास तोल जाऊन दरीत पडण्याची भीती चढाई करताना जाणवते.

रोप-वेने जाण्यासाठी प्रतीक्षा
गडावर चढण्यासाठी रोप-वेची सुविधा आहे; पण शिवजयंती, शिवराज्यभिषेकसारख्या सोहळ्यांसाठी येणाऱ्या लाखो शिवप्रेमींसाठी ही सोय अपुरी आहे. उत्सवादरम्यान ती व्हीआयपी व्यक्तींच्या दिमतीला असते. सकाळचे बुकिंग आदल्याच दिवसी करावे लागते. सकाळी 6 वाजता रोप-वेसाठी बुकिंग केली तर दुपारी बारा वाजेपर्यंत प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ येते. तोपर्यंत गडावरील कार्यक्रम संपलेला असतो. सोहळा संपल्यानंतर उत्साही तरुण गडावरून खाली उतरण्यासाठी शॉर्टकट मार्ग अवलंबतात. मागील वर्षी वाघ दरवाजावरून खाली उतरताना एकाचा मृत्यू झाला होता. रोप-वेने खाली उतरणे शक्‍य नसल्याने चिंचोळ्या पायवाटेने उतरताना गर्दी होते. यातूनच एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. गडावर दरवर्षी किमान सात ते आठ मोठे कार्यक्रम साजरे होतात. या कार्यक्रमांसाठी येणाऱ्या शिवप्रेमींची संख्याही मोठी असते. या सर्वांची व्यवस्था करणे हे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

रायगडचा पायथा ते जवळचे शहर असलेल्या महाडपर्यंतचा रस्ताही उत्सवादरम्यान तोकडा पडतो. गर्दीच्या वेळेला येथून मोठी वाहने निघू शकत नाहीत. यासाठी या मार्गाचे रूपांतर महामार्गात केले जाणार आहे. पाचाडपर्यंतचाही मार्ग काही प्रमाणात वाहनांसाठी योग्य आहे; पण पुढील टी पॉईंटपर्यंतचा घाटरस्ता धोकादायक वळणांचा आहे. घाटरस्त्याने वाहने फसण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. अपघात घडल्यास तिथपर्यंत पोहोचणेही पोलिस, वैद्यकीय पथकाला शक्‍य नसते. ही समस्या दरवर्षी जाणवत असल्याने या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रथमच चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली होती. गडाच्या पायथ्यापर्यंतचे हे 24 किलोमीटर अंतर पार करतानाही तितकीच कसरत करावी लागते. येथे संपर्कासाठी कोणतीही सुविधा नाही. मोबाईलची रेंज नसल्याने संपर्क साधता येत नाही.

जिल्हा प्रशासनाने 6 जून रोजीच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला शिवप्रेमींना गडावर सुखरूप पोहोचता यावे यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. काही प्रमाणात हा सोहळा मागील सोहळ्यापेक्षा सुरळीत झाला. मात्र, यामध्ये सातत्य आवश्‍यक आहे.

गडावर जिल्हा परिषदेने पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारलेली आहे; परंतु ती उत्सवादरम्यान अपुरी पडते. निवासाची तीच अवस्था आहे. रायगडावर टकमक पॉईंट, हिरकणी बुरूज, नगारखाना, होळीचे माळ, महाराजांची समाधी, राजमहाल, जगदीश्‍वराचे मंदिर, धान्याची कोठारे, राज्याभिषेक स्थळ, गंगासागर, अष्टप्रधान कार्यालय, वाघ दरवाजा, महाराज न्यायनिवाडा करायचे ते ठिकाण अशी अनेक स्थळे आहेत. सध्या किल्ले रायगडवरील या स्थळांच्या विकासाचे काम सुरू आहे. त्यासाठी तब्बल 607 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु पर्यटक, शिवप्रेमींसाठी पायाभूत सुविधांची वानवा कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com