दप्तराचे ओझे कसे कमी कराल?

सचिन उषा विलास जोशी
रविवार, 23 जून 2019

छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे, थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल.

दरवर्षी जून महिना आला, की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. दप्तरामध्ये काय असावे आणि काय नसावे हेसुद्धा सरकारने सांगितले; पण त्याचा अर्थ प्रत्येक शाळा, पालक वेगवेगळा काढतात आणि दप्तराच्या ओझ्याची समस्या निर्माण होते.

खरं तर ही समस्या ग्रामीणपेक्षा शहरी विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. त्यातही राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दुसऱ्या शैक्षणिक बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना ती जास्त भेडसावते. दप्तराचे वजन जास्त होण्याची कारणे काय यापेक्षा त्यावर उपाय काय, ते आपण पाहूया. 

- शाळेने विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची दोनशे पानी वही देण्यापेक्षा पहिल्या सत्रात शंभर पानी आणि दुसऱ्या सत्राला शंभर पानी वही विकत घ्यायला सांगावे. म्हणजे रोज पाच तासिकांच्या पाच विषयांच्या दोनशे पानी वही आणण्याऐवजी विद्यार्थी शंभर पानी वही आणतील; जेणेकरून वह्यांचे वजन निम्म्यावर येईल. जाड पुठ्ठा कव्हरच्या वह्या टाळाव्यात. 
- अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अधिकचे पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास शाळेने त्यांची संख्या कमीत कमी ठेवावी. 
- पाण्याच्या बाटलीमुळेसुद्धा बॅगेचे वजन वाढते. शाळेने शुद्ध पाण्याची सोय करावी. बहुतांशी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ही सोय असते. पालकांनीही अर्धी बाटलीच पाणी द्यावे. विद्यार्थ्यांनी शाळेमधील पाणी वापरावे. विद्यार्थ्यांनी दिवसभरात किमान दोन लिटर पाणी पिणे अपेक्षित असते.

- शिक्षकांनी गृहपाठाचे नियोजन करावे. त्यासाठी एकमेकांमध्ये वार वाटून घ्यावेत. गृहपाठ तपासण्यासाठी विषयनिहाय दिवस ठरवावेत. त्या दिवशी त्याच विषयाच्या गृहपाठाची वही मुलांनी आणावी. 
- इयत्ता पहिली, दुसरीचे विद्यार्थी लहान असतात. त्यांना गृहपाठ शक्‍यतो नसावा. अॅक्‍टिव्हिटी बेस्‌ शिकवण्याच्या पद्धती त्यांच्यासाठी ठेवाव्यात, बॅगचे‌ वजन खूप कमी होईल. 
- काही विषयांच्या वह्या, साहित्य शाळेतच ठेवावे. जसे कार्यानुभव, चित्रकला, संगणक, प्रयोगवही, काही वर्कबुक वर्गांमध्ये कपाटात ठेवावे. आठवड्यातून एकदाच ते घरी पाठवावे.

- शाळेत शक्‍य असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लॉकर द्यावे. त्यामध्ये खेळाचे साहित्य ठेवावे. 
- शाळेत ग्रंथालयासारखे ‘दप्तरालय’ सुरू करावे. ही सूचना सरकारचीच आहे. यात इयत्तानिहाय आवश्‍यकतेनुसार शैक्षणिक साहित्य विद्यार्थीनिहाय उपलब्ध करण्याची आवश्‍यक नोंदीसह व्यवस्था करता येईल. त्यासाठी कपाट किंवा रॅकची व्यवस्था करावी. 
- मुख्याध्यापकांनी वेळापत्रक बनवताना एकूण तासिकांमध्ये जास्तीत जास्त विषय घेणे टाळावे. त्याऐवजी ‘कमी विषय, जास्त तासिका’ या सूत्राने वेळापत्रक बनवावे. याला ब्लॉक पिरियड असेसुद्धा म्हणतात. म्हणजे एकाच विषयाचे त्या दिवशी दोन तास करणे म्हणजे रोज रोज ती पुस्तक आणायची गरज पडणार नाही.

- विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे वाढते, ते फक्त वही, पुस्तके यांच्यामुळे नव्हे; तर फॅन्सी वॉटर बॉटल, मोठा टिफिन, डिक्‍शनरी, रायटिंग पॅड, गाइड, शिष्यवृत्तीची पुस्तके, वजनदार कंपास बॉक्‍स, स्वेटर, रेनकोट, डेकेअरला जाणाऱ्या मुलांकडे साहित्याची वेगळी बॅग, काही विद्यार्थी शाळा संपल्यावर लगेच शिकवणीला जातात. त्या ट्युशनची वही, पुस्तके, अशा बऱ्याच गोष्टींमुळे वजन वाढते. त्यामुळे पालकांनीसुद्धा जे आवश्‍यक तेच बॅगेमध्ये पाठवावे. 
- पालक स्कूलबॅग अतिशय दणकट की, जी पुढील पाच वर्षे टिकावी, या हेतूने विकत घेतात. साहजिकच त्याचे वजन खूप असते. 
- शाळेमध्ये वर्कबुक, ड्रॉइंग बुक, काही वह्या, पुस्तके ठेवण्याची सोय असते पण आईचा हट्ट असतो की वही शाळेत ठेवू नको. घरी अभ्यास घ्यायचा असतो. पालकांनी याबाबतीत शाळेला मदत करावी. जे शक्‍य होईल ते शाळेत लॉकरमध्ये ठेवावे. याबाबतीत शिक्षक आणि पालकांनी एकत्र बसून वेळापत्रक बनवावे. कुठल्या वह्या केव्हा घरी येतील आणि त्या कशा तपासल्या जातील आणि त्याच हिशोबाने आई घरी अभ्यास घेईल. याबाबत योग्य नियोजन करावे.

- पालक आणि शाळा टिफिनबाबत अभिनव उपक्रम राबवू शकते. जेणेकरून रोज मुलांना टिफिन शाळेत आणण्याची गरज भासणार नाही. वर्गांमध्ये ३० विद्यार्थी असतील तर दररोज एका आईने वर्गातील ३० विद्यार्थ्यांचा टिफिन घरी बनवून गरमागरम मधल्या सुटीत आणावा. मग तिचा नंबर पुन्हा दीड महिन्याने लागेल. दुसऱ्या दिवशी दुसरी आई टिफिन बनवेल. नाशिकच्या इस्पॅलियर या प्रयोगशील शाळेत लहान विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू आहे. यासाठी पालक आणि मुख्याध्यापकांनी टिफिनचे मेनू ठरवून घ्यावेत. दप्तराचे वजन साहजिकच कमी होईल. इयत्ता दुसरी, तिसरीपर्यंत हा उपक्रम राबवता येईल. 
- पालकांनी रात्री मुलं घरी झोपण्याआधी वेळापत्रकानुसार बॅग भरली का हे स्वतः पाहावे. बऱ्याचदा विद्यार्थी रोज बॅग भरण्याचा कंटाळा करतात, सर्व वह्या, पुस्तके घेऊन जातात. किमान चौथीपर्यंत तरी ही तपासणी करावी. 

- खरंतर सीबीएसई, आयसीएसई किंवा केंब्रिज या बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन जास्त असते. या शाळांमधील बहुतांश मुलं स्कूलबसने येतात. बराच वेळा मुलगा/मुलगी घरातून निघते तेव्हा पालक त्यांची बॅग उचलतात. घराजवळ बस येते. स्कूलबस शाळेच्या गेटपर्यंत येते. विद्यार्थ्यांना गेटपासून वर्गात बॅग न्यायची असते. याचाही विचार करावा. 

वरील मार्ग अवलंबले तरी दप्तराचे वजन कमी होईल; पण खऱ्या अर्थाने दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अॅक्‍टिविटी बेस लर्निंग, अनुभवातून शिक्षण अशा संकल्पना रुजवाव्यात. महत्त्वाचं म्हणजे देशभरात एक अभ्यासक्रम ठेवावा. खासगी पुस्तकांना बंदी आणली पाहिजे आणि हे फक्त सरकारच करू शकते. खासगी शाळांना दोष देऊन चालणार नाही. पालकांनीसुद्धा स्पर्धेमागे न धावता मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करावा.

(लेखक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the school bag weight written by Sachin Joshi